coronavirus: हे पाऊल सशक्त भारतासाठी उपयुक्त ठरणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:37 AM2020-05-16T04:37:13+5:302020-05-16T04:39:23+5:30

राज्यातील लष्करी प्रशिक्षण संस्था किंवा विंग्ससारख्या संस्थांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लष्करी प्रशिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयात एनसीसीमध्ये सहभाग घेतलेले अनेकजण कालांतराने अन्य क्षेत्रात जातात. मात्र, लष्करी सेवेकडे वळत नाहीत. ही उणीव यामुळे दूर होईल.

coronavirus: This step will be useful for a strong India ... | coronavirus: हे पाऊल सशक्त भारतासाठी उपयुक्त ठरणार...

coronavirus: हे पाऊल सशक्त भारतासाठी उपयुक्त ठरणार...

Next

भारतीय तरुणांना आयुष्यात कुठल्या क्षेत्रात करिअर करायला आवडेल, असा सवाल केला, तर बहुतांश तरुण आयटी, कॉर्पोरेट, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आयएएस होणार, अशी उत्तरे देतील. ज्या कुटुंबात लष्करी सेवेची, त्यागाची पार्श्वभूमी आहे अशा कुटुंबातील तरुण किंवा मनापासून लष्करी सेवेची आवड जोपासलेले हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच लष्करी सेवेचा मार्ग स्वखुशीने पत्करतील. कोरोना हे जर जगावर लादले गेलेले युद्ध असेल, तर याच काळात लष्कराच्या वतीने २० वर्षांखालील तरुणांना तीन वर्षांकरिता लष्करी सेवेची संधी देणारा ‘टूर आॅफ आर्मी’ हा उपक्रम जाहीर करणे, हा निव्वळ योगायोग नाही. भारतीय तरुणांची अव्यवस्थित जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जंक-फास्टफूडची जडलेली सवय, शारीरिक कष्टाचा मनस्वी कंटाळा, अशा अनेक बाबींमुळे कोरोनाने तरुणाईला म्हणजेच देशाच्या भवितव्याला फटका दिलेला आहे. आता प्रत्येक युद्ध हे सीमेवर किंवा रणभूमीवर लढण्याची गरज नाही. शत्रू राष्ट्रात अमली पदार्थांचे साठे धाडून किंवा त्यांना अन्य कुठल्याही मोहपाशात गुरफटून टाकणे, हाही युद्धनीतीचा भाग असू शकतो. कोरोनामुळे भारतीय तरुणांची शारीरिक व मानसिक कमजोरी अधोरेखित झाली आहे.

केंद्रातील सरकारचा राष्ट्रवादाचा ‘ज्वर’ किती तीव्र आहे आणि त्याचा फैलाव ते किती प्रभावीपणे करु शकतात, हे लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानवरील हल्ल्यातून दिसून आले आहे. केंद्र सरकार व इस्रायल यांच्या मैत्रिसंबंधाचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. त्या इस्रायलमध्ये किंवा अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये तरुण-तरुणींना लष्करी प्रशिक्षण अनिवार्य केलेले आहे. लष्करी प्रशिक्षणातील परेड, घोडसवारी, नेमबाजी वगैरे प्रकारांमुळे तरुणाईमधील आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. भय नष्ट होते व नेतृत्वक्षमता विस्तारते. स्वरंक्षणाचे बाळकडू मिळालेली तरुणाई कुठल्याही संकटाचा सक्षमपणे मुकाबला करते. वागण्या-बोलण्यातील शिस्त, खाण्या-पिण्यातील संयम यामुळे लष्करी प्रशिक्षण घेतलेला आणि न घेतलेला यांच्यातील फरक दिसून येतो. आतापर्यंत टेरिटोरिअल आर्मीच्या माध्यमातून लष्करी सेवेची संधी तरुणाईला दिली जात होती. महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंÞडुलकर ही अशी काही नावे लष्करी सेवेशी जोडली गेली आहेत. मात्र, आता देशातील जास्तीत जास्त तरुणांनी लष्करी सेवेचा पर्याय स्वीकारावा, असाच या उपक्रमाचा हेतू दिसतो.

लष्कर, नौदल किंवा हवाई दल येथे सैनिक पदापेक्षा अधिकारी पदाची कमतरता सर्वाधिक आहे. कारण, अत्याधुनिक यंत्र-यंत्रणांमुळे या अधिकारी पदाकरिता पात्र ठरविण्याचे निकष बदलता येत नाहीत. मात्र, संरक्षण दलातील सर्वोच्च पद हे एकाच व्यक्तीला प्राप्त होणार असल्याने अन्य काही अनुभवी अधिकारी सेवानिवृत्ती स्वीकारुन बड्या कंपन्या, उद्योगांमध्ये उच्चपदस्थ होतात. ‘टूर आॅफ आर्मी’ या माध्यमातून तरुणाईमधील टॅलेंट लष्करी सेवेत येईल, अशी अपेक्षा आहे. काश्मीर किंवा ईशान्येकडील काही राज्यांमध्ये लष्करी अंमल असल्याने लष्कराबाबतचा दृष्टिकोन वेगळा आहे. या राज्यांमधील तरुणाईला आवर्जून लष्कराने आपले दरवाजे खुले केले, तर कदाचित कटुता नष्ट होईल आणि आपले तरुणही लष्कराचा एक भाग असल्याची भावना निर्माण करून परकीय शक्तींच्या कारवायांना सुपीक जमीन उपलब्ध करून देणार नाहीत. अर्थात याकरिता सरकारमध्ये बसलेल्या आणि सरकारला वैचारिक पाठबळ देणाऱ्या संघटना, व्यक्ती यांनीही व्यापक दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे. इस्रायलसारख्या देशात लष्करी प्रशिक्षण अनिवार्य आहे. भारतात ते ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे युवांच्या प्रतिसादाबाबत साशंकता वाटत असेल, तर देशाला आपल्या उमेदीच्या काळातील तीन वर्षे देणाºया तरुणांना सरकारने काही सोयी-सवलती दिल्यास अनेकजण ‘टूर आॅफ आर्मी’करिता तयार होतील. भविष्यात स्पर्धा परीक्षांकरिता वयाची किंवा अन्यत्र प्रवेशाकरिता टक्केवारीची अट शिथिल करणे, असा पर्याय नक्की असू शकतो. देशाच्या सशक्त भवितव्याकरिता लष्करी प्रशिक्षण ही निश्चित गरज आहे. भविष्यात कुठल्याही स्वरूपाच्या युद्धाचा समर्थपणे मुकाबला करण्याच्या दिशेने पडलेले हे पाऊल ठरावे, हीच अपेक्षा.

Web Title: coronavirus: This step will be useful for a strong India ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.