Coronavirus: लुटारू इस्पितळांच्या मुसक्या आवळा!
By विजय दर्डा | Published: May 24, 2021 05:25 AM2021-05-24T05:25:45+5:302021-05-24T05:28:18+5:30
Coronavirus: डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी जिवाची बाजी लावत असताना वैद्यकीय क्षेत्राची इभ्रत डागाळणाऱ्या निर्मम इस्पितळांना सोडता कामा नये !
- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
कोरोना महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी यांची करावी तेवढी प्रशंसा कमीच होईल. परंतु हेच निमित्त करून ज्यांनी सामान्यांची लूट आरंभली, पूर्ण वैद्यकीय क्षेत्राची इभ्रत डागाळली; अशा इस्पितळांना कोणत्याही स्थितीत माफ करता कामा नये. त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.
आपल्या संस्कृतीत डॉक्टर हा देवाचा प्रतिनिधी मानला जातो. त्याच्याकडून सेवाभाव आणि मानवतेची अपेक्षा केली जाते. या महामारीच्या काळात डॉक्टर्स तसेच परिचारिकांनी मानवतेचे दर्शन घडवले. मला असे अनेक डॉक्टर्स, परिचारिका माहीत आहेत ज्यांनी गेल्या वर्षभरात आठवड्याची सुटीही घेतलेली नाही. महिना -महिना घरी गेले नाहीत. आपल्या मुलांना भेटले नाहीत. दोन-दोन तीन-तीन पाळ्यांत व मिळेल ते खावून काम केले. त्यांच्या नजरेसमोर एकच ध्येय होते काही झाले तरी रुग्णाचा जीव वाचला पाहिजे. अशा स्थितीत जेव्हा काही इस्पितळे रुग्णांची लूट करत असल्याच्या बातम्या येतात तेव्हा मन उद्विग्न होते. कोणी माणूस किंवा संस्था इतक्या खालच्या पातळीवर कसे उतरू शकतात, हा प्रश्न मनाला कुरतडू लागतो. ज्या डॉक्टरांनी जिवावर उदार होऊन या काळात काम केले त्यांच्या भावनाही या घटनांनी दुखावणे स्वाभाविक आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहवालानुसार, कोरोनाशी लढताना ४००हून अधिक डॉक्टरांनी जीव गमावला. पहिल्या लाटेतला आकडा यात मिळवला तर ही संख्या ९०० च्या घरात जाते. यावरून किती परिचारिका आणि अन्य कर्मचारी कोरोनाने गेले असतील याचा अंदाज करता येईल. हजारो डॉक्टर्स, परिचारिकांना कोरोनाची लागण झाली तरी न डगमगता त्यांनी रुग्णसेवा चालू ठेवली. तुम्ही थोडा वेळ पीपीई कीट अंगावर चढवून पाहा; घामाने अंग ओले होईल. हे लोक ८-१० तास हे किट घालून कसे काम करत असतील? आणि तेही थोडी चूक झाली तरी कोरोना झडप घालील अशा वातावरणात ! म्हणूनच मी खुल्या दिलाने सेवाभावी डॉक्टर्स, परिचारिकांना सलाम करतो. अशा सर्व लोकांबद्दल देश कायम ऋणी राहील. मात्र ज्यांनी या महामारीकडे लुटीचे, पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहिले, त्याना लोक माफ करणार नाहीत. तुम्ही खूप पैसा कमवाल, पण त्याचा उपभोग घ्यायला जिवंतच राहिला नाहीत तर उपयोग काय? कशाला ही लूट करता आहात?
नागपूरमधला एक किस्सा सांगतो. कोरोनावर उपचार घेण्यासाठी एक रुग्ण इस्पितळात भरती झाला. चार-पाच दिवसांतच घरी जाता येईल इतकी त्याची प्रकृती सुधारली, पण इस्पितळाने त्याला सांगितले की तुम्ही पॅकेजमध्ये भरती झालेले असल्याने १४ दिवसांचे पैसे भरावे लागतील !! महामारी शिगेला पोहोचली तेव्हा काही इस्पितळांनी पॅकेज तयार केले. जागा मिळत नसल्याने लोकांनी इस्पितळे सांगतील ती किंमत मोजली. ही परिस्थिती केवळ नागपुरात नाही तर उभ्या देशात होती. नॉयडात तर काही इस्पितळांनी बेकार तरुणांना खोटे कोविड अहवाल तयार करून इस्पितळात भरती करून घेतले ज्यातून सगळ्या खाटा भरल्या आहेत असे दृश्य दिसले. त्या तरुणांना या कामाचे पैसेही दिले गेले. जेव्हा खरा रुग्ण यायचा तेव्हा त्याच्या नातलगांशी वाटाघाटी करून पैसे उकळले जायचे आणि मग एक रुग्ण घरी पाठवला जायचा. अधिकाऱ्यांनी छापा मारला असता हे भांडे फुटले. पण त्या इस्पितळाविरुद्ध काय कारवाई झाली हा खरा प्रश्न आहे.
अशा इस्पितळाच्या संचालकांना तुरुंगात धाडले पाहिजे.
मौत का मेला लगा है
लुटेरोंकी किस्मत खुली है
बडे बेखौफ है ये लुटेरे
कोई है जो इन्हे रोके?
लूट कशी होत आहे हे जर सामान्य लोकांना दिसत असेल तर सरकारात बसलेल्यांना ते कळत नसेल का? म्हणजे, सगळे सगळ्यांना कळते पण आरोग्य सेवा आपल्या प्राधान्यक्रमात येतच नाहीत.
...आजवर झाले ते विसरून नवी सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला डॉक्टर घडवण्याची प्रक्रिया कमी खर्चाची आणि सोपी करावी लागेल. अधिक वैद्यकीय महाविद्यालये उघडून आपण जास्त डॉक्टर्स तयार का करत नाही? आज जर कोट्यवधी रुपये खर्चून कोणी डॉक्टर होत असेल, यंत्रणा खरेदी करत असेल तर ही गुंतवणूक लवकर वसूल कशी होईल असाच विचार तो करणार. एखादे यंत्र महाग असेल तर चार डॉक्टर मिळून ते का खरेदी करत नाहीत? यातून रुग्णांचे भले होईल. भांडवली गुंतवणूक १०० कोटींची असेल तर ती काय एका दिवसात वसूल करणार का, हा माझा प्रश्न आहे. सरकारला संपूर्ण धोरण तयार करावे लागेल. औषध कंपन्यांचेही ऑडिट झाले पाहिजे.
याशिवाय सरकारी आणि खासगी क्षेत्रातील सर्व इस्पितळांना आधुनिक सुविधांनी सज्ज केले पाहिजे. गरीब असो वा श्रीमंत, सर्वांना सारखे उपचार मिळाले पाहिजेत. भले तुम्ही श्रीमंतांकडून जास्त आणि गरिबांकडून कमी पैसे घ्या, पण सेवा सुविधा सर्वांना सारख्याच मिळाल्या पाहिजेत. जगातल्या प्रगत देशांनी नागरिकांना आरोग्यसेवांच्या बाबतीत आश्वस्त केले आहे तसे आपल्याकडे झाले पाहिजे. तिकडे इतर करांबरोबरच विम्याची रक्कम घेतली जाते आणि सर्वांना सारखा इलाज मोफत मिळतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट : कोरोना मृतांचे आकडे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतातील मृतांचे जे सरकारी आकडे आले आहेत त्यापेक्षा वास्तव आकडे तीन पट जास्त असू शकतील. भारतात तर ही गोष्ट काही महिन्यांपासून बोलली जात आहे. सरकार सांगते त्यापेक्षा जास्त लोकांना अग्नी दिला गेला किंवा दफन करण्यात आले. ज्यांच्या नशिबात हेही नव्हते त्यांचे मृतदेह सरळ गंगेत सोडून देण्यात आले किंवा रेतीत गाडून टाकण्यात आले. सगळीकडे हाहाकार माजला आहे. मन खिन्न आहे.. भावना गोठून गेल्या आहेत... परमेश्वरा, ही परिस्थिती लवकर सुधारू दे !