Coronavirus: ओमायक्रॉनचे काय करावे? कोरोनाच्या संसर्गामुळे जग पुन्हा चिंतेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 01:21 PM2021-11-30T13:21:30+5:302021-11-30T13:23:01+5:30

Coronavirus: आधीच्या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनचा प्रसार किती तरी पट वेगाने होत असल्याने सगळ्याच देशांनी सावधगिरी बाळगण्याचा सूचनावजा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या नव्या अवताराने बाधित रुग्ण दक्षिण आफ्रिकेबाहेर इंग्लंड, इस्रायल, जर्मनीसोबतच  हाँगकाँगमध्ये सापडले आहेत.

Coronavirus: What to do with Omycron? Corona infection worries the world again ... | Coronavirus: ओमायक्रॉनचे काय करावे? कोरोनाच्या संसर्गामुळे जग पुन्हा चिंतेत...

Coronavirus: ओमायक्रॉनचे काय करावे? कोरोनाच्या संसर्गामुळे जग पुन्हा चिंतेत...

Next

यापुढे विषाणूसाेबतच जगण्याची सवय करून घ्यावी लागेल, हे वाक्य पुन्हा उच्चारण्याची वेळ आली आहे. कारण कोविड-१९ या विषाणूचे अनेक अवतार एका मागोमाग येत राहतील, असे अंदाज सुरुवातीपासून दिले जात आहेत.  कोविडच्या डेल्टा व्हेरिएंटने भारतासह अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला. आताही युरोपमधील अनेक देशांमध्ये किंवा रशियात महामारीच्या लाटेचा कहर सुरूच असताना दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथी-सातवीपर्यंतच्या शाळा किंवा देशात सुरू होणारी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची उड्डाणे या सगळ्यांचा फेरविचार सुरू झाला आहे. काल-परवापर्यंत महाराष्ट्रात चर्चेत असलेले आर्यन खान, एनसीबी, नवाब मलिक, परमबीर सिंह वगैरे विषय ओमायक्रॉनच्या बातमीनंतर मागे पडले आहेत. आधीच्या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनचा प्रसार किती तरी पट वेगाने होत असल्याने सगळ्याच देशांनी सावधगिरी बाळगण्याचा सूचनावजा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या नव्या अवताराने बाधित रुग्ण दक्षिण आफ्रिकेबाहेर इंग्लंड, इस्रायल, जर्मनीसोबतच  हाँगकाँगमध्ये सापडले आहेत. अर्थात, विषाणूचा हा नवा अवतार नेमका किती घातक असेल, त्याचा प्रसार कसा होईल किंवा लसीकरणाचे कवच भेदून तो प्राणघातक ठरेल का, या प्रश्नांची उत्तरे देणारी पुरेशी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेसह कोणाकडेच नाही. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेले दोघे जण बंगळुरूमध्ये डेल्टा विषाणूने बाधित आढळले, तर महाराष्ट्रात ठाणे परिसरातही तिकडूनच परत आलेल्यांचा शोध सुरू आहे. थोडक्यात, ओमायक्रॉनचे कुणी बाधित अद्याप भारतात आढळलेले नाहीत. तेव्हा लोकांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, केंद्र सरकारकडून कोरोना महामारीच्या सुरुवातीला दिसलेला गोंधळ आता दिसत नाही. ओमायक्रॉनची बातमी येताच स्वत: पंतप्रधानांनी दिल्लीत तज्ज्ञांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला, तर गृहसचिवांनी काल रविवार असूनही एक बैठक घेतली व राज्य सरकारांनी राबवावयाच्या उपायांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केंद्र सरकारने इतक्या तातडीने पावले उचलण्यामागे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी देशाच्या वाट्याला आलेली नामुष्की आहे. बहुतेक सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये रोज हजारोंच्या संख्येने बाधित रुग्ण निष्पन्न होत असताना ऑक्सिजनचा तुटवडा होता, इस्पितळांमध्ये पुरेसे बेडस् नव्हते, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झाला होता. मृत्यूनंतरही अनेकांच्या वाट्याला नरकयातना आल्या.  मोठ्या शहरांमधील स्मशानभूमीत एका वेळी अनेकांचे दहन झाल्याची किंवा गंगा नदीत वाहून जाणाऱ्या हजारो प्रेतांची छायाचित्रे मन विषण्ण करणारी होती. केंद्र व राज्य सरकारांनी त्यावर कितीही पांघरूण घालण्याचा  प्रयत्न केला तरी ही यंत्रणेची दशा जगभर पोहोचलीच. लसीकरणाचा वेग हा अजूनही देशात चिंतेचा विषय आहे. सगळ्याच गोष्टींचा उत्सव साजरा करण्याची सवय आपल्याला लागली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे शंभर कोटी दिल्याचाही आपण उत्सव केला. आता हा प्रवास एकशे वीस कोटी डोसच्या घरात गेलेला आहे. प्रत्यक्षात दोन्ही डोस घेतलेल्यांचे भारतीयांचे प्रमाण जगात खूप खालच्या स्थानावर स्थितीत आहे. जगातील इतर देश  अगदी ऐंशी टक्के जनतेला दोन्ही डाेस देत असताना भारतात मात्र हे प्रमाण अवघे ३२ टक्के आहे.  या जागतिक महामारीचा सामना करताना देश अनेक आघाड्यांवर चाचपडताना दिसला. ते साहजिकही आहे. अशा संकटांचा अलीकडच्या काळात मोठा अनुभव यंत्रणांना नाही. तरीदेखील किमान इतिहासातील अशा महामारीचा अनुभव लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, लस वितरणाची योग्य व्यवस्था याबाबतीत बरेच काही करता आले असते. असो. आता तरी या नव्या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट देशात येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महामारीच्या सुरुवातीला ज्या प्रकारे आपले विमानतळ सताड उघडे होते, तसे होऊ नये. परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावरच तपासणी, संशयास्पद रुग्णांचे विलगीकरण, त्यांच्यावर उपचार या मार्गानेच जावे लागेल. मग पुढे ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट याचा अर्थ संपर्कातील व्यक्तींचा शोध, चाचणी व उपचार हेच या नव्या भीतीमधून लोकांना बाहेर काढण्याचा उपाय आहेत. सोबतच तातडीने लसीचे दोन्ही डोस, दुहेरी मास्क, सॅनिटायझर ही दक्षता लोकांनी घेतली तर ओमायक्रॉनचा धोका नक्की टळेल.

Web Title: Coronavirus: What to do with Omycron? Corona infection worries the world again ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.