CoronaVirus News: ‘कोरोना माय’च्या पूजेने काय साधणार भक्त?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:04 AM2020-06-16T02:04:59+5:302020-06-16T02:08:23+5:30

देशातील काही भागांत लोक कोरोनाला अंधश्रद्धेची वेणी गुंफण्याचे विचित्र काम करताना दिसत आहेत. त्यांनी कोरोना देवीची साग्रसंगीत पूजाअर्चा आरंभली आहे.

CoronaVirus What willdevotee achieve by worshiping Corona | CoronaVirus News: ‘कोरोना माय’च्या पूजेने काय साधणार भक्त?

CoronaVirus News: ‘कोरोना माय’च्या पूजेने काय साधणार भक्त?

googlenewsNext

- सविता देव हरकरे, उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर

गेल्या चार महिन्यांपासून देश कोरोना महामारीशी लढा देतोय. आजवर हजारो लोक याचे बळी गेलेत. या महामारीपासून लोकांचे जीव वाचविण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारे जिवाचे रान करीत आहेत. डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ अहोरात्र जागून यावर रामबाण औषध आणि लस शोधण्याच्या कामी लागले आहेत. अख्ख्या जगात हेच चित्र आहे. तूर्तास तरी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क हेच यापासून बचावाकरिता विश्वासार्ह उपाय मानले जात आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचेही हेच मत आहे. असे असताना देशातील काही भागांत मात्र लोक या कोरोनाला अंधश्रद्धेची वेणी गुंफण्याचे विचित्र काम करताना दिसत आहेत. त्यांनी कोरोना देवीची साग्रसंगीत पूजाअर्चा आरंभली आहे. ही ‘कोरोना माय’ म्हणे काहींच्या स्वप्नात आली होती. गाईचे रूप धारण करून मग हळूहळू तिचे स्त्रीत रूपांतर झाले. ती छान बोललीसुद्धा. भारतातील लोकांनी माझी पूजा प्रारंभ केल्यास मी येथून निघून जाईन, अशी ग्वाहीही तिने दिली. मग काय? साक्षात कोरोना देवीचाच आदेश मिळाल्याने तिच्या भक्तांनी मनोभावे तिचे पूजन सुरू केले. बघता बघता उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आदी राज्यांमध्ये कोरोना देवीच्या भक्तांचे हे लोण पसरत गेले. या भक्तांनी कोरोना देवीला प्रसन्न करण्यासाठी स्वत:च्या भक्तीची कसोटी लावली आहे. देशात कोरोनाची साथ मुळात अंधविश्वासाचे मोठे पॅकेजच घेऊनच आली होती. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्प्यापासूनच आरत्या ओवाळणे सुरू झाले होते. पुढेपुढे तर फारच धक्कादायक आणि मजेदार किस्से समोर येत गेले. उत्तर प्रदेशच्या प्रतापगड, सुलतानपूर आणि अयोध्येसह अनेक गावांमध्ये लोकांनी घरांच्या दारापासून ते पुरुषांच्या पाठीपर्यंत सर्वत्र हळद, मेहंदी आणि शेणाचे छापे मारणे सुरू केले. यामुळे कोरोना देवीचा प्रकोप शांत होईल असे त्यांना वाटत आहे. तिकडे गुजरातमध्ये सध्या गोमूत्राची मोठ्या प्रमाणात विक्री होते आहे. गोमूत्र जर प्रभावी असते, तर शासनाने यापूर्वीच तसे सांगितले नसते का? फार पूर्वी श्रीगणेश दूध पीत होते, आता बिहारच्या समस्तीपुरात अनेक मंदिरांमध्ये नंदी दूध पीत आहेत असे कळले.



नंदीला दूध पाजण्यासाठी लोकांनी एवढी गर्दी केली की, पोलिसांना पाचारण करावे लागले. या अंधविश्वासामुळे कोरोनापासून बचावाच्या उपायांवर चक्क पाणी फेरले जातेय. त्याच्याशी या भक्तांना काही सोयरसुतक नाही. बरेलीत बायका बादली-बादली पाणी नेऊन विहिरीत ओतताना दिसत आहेत, तर पुरुष नाणी टाकत आहेत. राजस्थानातील जयपूरजवळच्या काही गावांमध्ये महिला समूहात सूर्यपूजन करून पाच वेळा कपाळावरील भांग भरत आहेत. काही ठिकाणी सात घरांमध्ये पैसे मागून बांगड्या भरल्या जात आहेत. मध्य प्रदेशच्या भिंड-मुरैनात यमदीप लावले जात आहेत. हे दिवे बघून यमराज आपला मार्ग बदलेल याची खात्री येथील भाबड्या अंधश्रद्धाळू लोकांना आहे. कर्नाटकातील एका गावात तर चक्क एका महिलेच्या अंगात कोरोनादेवी आली होती. गाव सोडून गेले तर जीव वाचतील, असे तिने सांगितले.

गावकऱ्यांनी काय करावे? गावातील ६० कुटुंबे गावच्या वेशीवर तंबू ठोकून राहिली. परंतु एवढे करूनही कोरोना देवीचा प्रकोप काही शमला नाही. सांगायचा मुद्दा हा की, जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर उपचार केव्हा मिळतील या प्रतीक्षेत असताना कोरोना देवीचे भक्त मात्र ती केव्हा नवसाला पावते याची वाट बघत आहेत. अंधश्रद्धा, त्यातून निर्माण होणाºया अफवांचा बाजार आणि सामूहिक उन्माद भारतवंशासाठी काही नवखा नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने जगभरात आपला झेंडा रोवला असला, तरी येथील मोठा समूह अजूनही अंधश्रद्धेच्या बेड्यांमध्ये अडकला आहे. जादूटोणा, तंत्रमंत्र, करणी, पिशाच्च त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. अंधश्रद्धा आणि सामूहिक उन्माद हे दोन्ही एकमेकांना पूरक असून, यातून निर्माण होणाºया अफवांच्या बाजारांनी सारे जनजीवन ढवळून निघत असते. येथे अजूनही बैलांविना बंड्या चालतात, श्रीगणेशाची मूर्ती अचानक दूध प्यायला लागते अन् समुद्राचे पाणीही गोड होते. काही वर्षांपूर्वीचा ‘चोटी गँग’चा उन्माद स्मरणात असेलच. ‘मंकी मॅन’, ‘मूंह नोचवा’ आणिक काय काय! ही अंधश्रद्धा लोकांना पार वेडीपिशी करते. विचार परिवर्तन, सुधारणा यापासून हे लोक अजूनही कोसो दूर आहेत.



चंद्रवारी करणाºया देशात अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या संशयावरून लोकांचे जीव घेतले जातात. पैसा आणि अघोरी शक्ती प्राप्त करण्याच्या लालसेने नरबळी दिले जातात. अंधश्रद्धेसंदर्भात समाजात जागरूकतेचा अभाव हा त्यामागील एक महत्त्वाचा पैलू आहे. कोरोना महामारी रौद्ररूप धारण करत असताना शासकीय दिशानिर्देशांचे पालन करणे ही देशवासीयांची महत्त्वाची जबाबदारी आहे, तरच या संसर्गापासून स्वत:चा आणि इतरांचाही बचाव करता येऊ शकतो; पण लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, विनाकारण घराबाहेर पडणे, रस्त्यावर थुंकणे हे सगळे प्रकार बघायला मिळताहेत. अशात केवळ कोरोना देवीची पूजा करून काहीच साधणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

Web Title: CoronaVirus What willdevotee achieve by worshiping Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.