हे जाणकार की अपराधी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:05 AM2018-07-09T05:05:11+5:302018-07-09T05:05:38+5:30
ज्यांनी याचा आरंभ करू नये त्यांनीच तो केल्यानंतर मागाहून येणाऱ्या बावळटांनी त्याची री ओढली आणि ती ओढताना आपण धर्मरक्षण करीत असल्याचा भक्तिभाव मनात आणला तर तो त्यांचा दोष कसा म्हणायचा?
ज्यांनी याचा आरंभ करू नये त्यांनीच तो केल्यानंतर मागाहून येणाऱ्या बावळटांनी त्याची री ओढली आणि ती ओढताना आपण धर्मरक्षण करीत असल्याचा भक्तिभाव मनात आणला तर तो त्यांचा दोष कसा म्हणायचा? माणसाच्या देहावर हत्तीचे मस्तक लावून त्याचा गणपती करणारी पहिली प्लास्टिक सर्जरी भारतात झाली असे पंतप्रधान मोदीच म्हणाल्यानंतर त्यांच्या निष्ठावंत भगतांना त्यांचे मूर्खपण मोकळे करायला सारे रानच सापडले. मग माणसाच्या देहावर माकडाचे डोके लावून हनुमान तर मगरीचे डोके लावून मकरध्वज तयार झाला आणि नागाचा फणा लावून नागलोकांची निर्मिती झाली अशा पौराणिक शस्त्रक्रियांचे वर्णन त्यांचे पक्षीगण व मंत्रीगणही करू लागले. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देब आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी महाभारताच्या काळातच देशात संगणक, दूरचित्रवाणी आणि अण्वस्त्रे होती असे सांगितले. त्याखेरीज संजयाने धृतराष्टÑाला कुरुक्षेत्रावरील युद्धकथा कशा ऐकविल्या असतील असा पुरावा त्यांनी पुढे केला. अग्न्यास्त्र किंवा पर्जन्यास्त्र ही खरोखरीची आधुनिक अस्त्रे होती व त्यांनीच ते युद्ध लढविले गेले असेही त्या शहाण्यांनी सांगितले. तशा समजुतींना शहाणपण मानणाºयांची संख्या त्यांच्या पक्षात व देशातही लहान नाही. त्यांची ही वक्तव्ये जाहीर होण्याआधी देशातील ‘वैज्ञानिकांनी’ जागतिक परिषदांसमोर ‘रामायणकालीन पुष्पक विमानावर’ प्रबंध वाचले आणि हनुमानाचे उड्डाण हे शास्त्रीय सत्य असल्याचेही सांगून टाकले. या शस्त्रक्रिया व शस्त्रांचे शोध यांना पूरक ठरणारे वैैद्यकही मग पुढे आले. गायीचे शेण खाल्ल्याने (त्याला श्रावणी म्हणायचे) वा मूत्र प्राशन केल्याने कर्करोग बरा होतो असे सांगणारे वैदू मग प्रगट झाले. त्या पार्श्वभूमीवर संभाजी मास्तरांनी ‘माझ्या शेतातील आंबे खा आणि पोरांना (पोरींना नव्हे) जन्म द्या’ असे सांगून पुरुषांची संख्या वाढवण्याचा संदेश आपल्या अनुयायांसह समाजाला दिला असेल तर तो त्यांचा दोष न मानता त्यांच्या देशभक्तीचा आविष्कार मानला पाहिजे. गोव्यात विजय सरदेसाई नावाचे एक मंत्री आहेत. शेतातील पीक वाचवायला त्यात मृत्युंजय मंत्राचा जागर करण्याचा सल्ला त्यांनी शेतकºयांना दिला आहे. मृत्युंजयाचा मंत्र माणसांसाठी वापरण्याची श्रद्धा लोकात आहे. आता ती पिकांवरील प्रयोगासाठी करून पाहण्याची बुद्धी या सरदेसायाला झाली असेल तर तो त्याच्या प्रयोगशीलतेचा नमुनाच मानायचा की नाही? श्रद्धांचे साम्राज्य मोठे आहे. ते मोडून काढणे विज्ञानाला अजून जमले नाही. मात्र ज्या श्रद्धा आपल्याएवढ्याच आपल्या समाजाला हास्यास्पद बनवतील त्याबाबत न बोलण्याचे किमान तारतम्य जनतेचे नेते व प्रतिनिधी यांनी बाळगावे की नाही? कर्करोगाविषयीची जगातली सगळी प्रगत संशोधने अजून त्याच्या परिणामकारक उपायांपर्यंत पोहचली नाहीत. अशावेळी शेण खावून तो रोग बरा होतो असे म्हणणाºयांना जाणकार समजायचे की गुन्हेगार? देशात व महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे आहेत. त्यांना विरोध करणाºया ‘शेणवाल्या’ लोकांचा वर्गही मोठा आहे. त्यांच्या श्रद्धांपायी स्त्रियांचा होणारा छळ, अनेकांना आलेले आंधळेपण आणि देवीला मुरळी म्हणून सोडलेल्या बायका यांची या कायद्यांतर्गत कधी तपासणी व सर्वेक्षण करायचे की नाही? की तसे न करता या मृत्युंजयवाल्यांची आणि शेणाचे गुणवर्णन करणाºयांची छायाचित्रे वर्तमानपत्रात छापून आणायची? देश स्वतंत्र झाला तेव्हा एका विदेशी पत्रकाराने नेहरूंना प्रश्न विचारला, ‘तुमच्यासमोरची सर्वात बिकट समस्या कोणती?’ नेहरू म्हणाले ‘एका धर्मश्रद्ध समाजाला विज्ञाननिष्ठ व धर्मनिरपेक्ष बनविण्याची’. नेहरूंची ती समस्या गेल्या ७० वर्षात सैल झाली की घट्ट? आणि तशी ती करणारे कोण? जेव्हा सरकारच अंधश्रद्धांना खतपाणी घालते तेव्हा त्यांचा समाजाभोवतीचा विळखा सुटायचा कधी? दिल्लीसारख्या शहरात एकाचवेळी एक डझन माणसे अशा अंधश्रद्धेपायी सामूहिक आत्महत्या करीत असतील तर त्याचा दोष अशा श्रद्धा पसरविणाºयांचा की त्याविरुद्ध लढणाºयांचा?