राष्ट्रपती निवडणुकीसाठी ‘काउंटडाउन’ सुरू! केव्हाही अधिसूचना जारी केली जाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 10:02 AM2022-06-09T10:02:21+5:302022-06-09T10:03:24+5:30

विधानसभेच्या काही जागा, लोकसभेच्या पोटनिवडणुका आणि राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक पुढच्या आठवड्यात संपत आहे. त्याच वेळी  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ‘काउंटडाउन’ सुरू होईल.

Countdown begins for presidential election A notification will be issued at any time | राष्ट्रपती निवडणुकीसाठी ‘काउंटडाउन’ सुरू! केव्हाही अधिसूचना जारी केली जाईल

राष्ट्रपती निवडणुकीसाठी ‘काउंटडाउन’ सुरू! केव्हाही अधिसूचना जारी केली जाईल

Next

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

विधानसभेच्या काही जागा, लोकसभेच्या पोटनिवडणुका आणि राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक पुढच्या आठवड्यात संपत आहे. त्याच वेळी  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ‘काउंटडाउन’ सुरू होईल. पुढच्या आठवड्यात केव्हाही निवडणूक आयोग या निवडणुकीची अधिसूचना काढू शकते.  राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक ती मतसंख्या भाजपकडे आहे. गेल्या आठ वर्षात पक्षाने आपले डझनभर मित्र गमावले असले तरी भाजप ही निवडणूक आरामात जिंकू शकतो. असे असले तरीही ‘रालोआ’मधल्या घटक पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पक्ष कसोशीने प्रयत्न करत आहे. बीजेडी आणि वायएसआर काँग्रेससारखे पक्ष त्यात येतात.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची पंतप्रधान मोदी यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली. त्याचप्रमाणे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्याशीही चेन्नईत त्यांची अत्यंत सलोखापूर्ण बैठक झाली. तामिळी भाषा अत्यंत समृद्ध असल्याचे मोदी म्हणाले, याचा अर्थ भाजप हिंदी लादण्याच्या पक्षाचा नाही असे त्यांनी सूचित केल्याचे मानले जात आहे.

भाजपने मित्रपक्षांशी अनौपचारिकपणे सल्लामसलत याआधीच सुरू केली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना काही जणांशी बोलणी करायला सांगितले गेले. प्रधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी बोलण्याकरिता पाटण्यात आले. या पहिल्या प्राथमिक फेरीत काही विशिष्ट नावांची चर्चा झालेली नाही असे समजते. अर्थात, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी भाजप सर्व बाजूंनी विचार करील हे उघडच आहे. विरोधी पक्षांचे घर विभागलेले आहे, तर भाजप मैदानात पाय रोवून उभा आहे.

अफवांना ऊत   
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येत चालली असताना अफवांना ऊत आला आहे. सर्वांच्या नजरा पंतप्रधान कार्यालयावर खिळलेल्या दिसतात. कारण तेथे बरेच काही घडते आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील दलित नेते आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत पंतप्रधानांना भेटले. असे म्हणतात की, अजिबात वादग्रस्त नसलेले, खाली मान घालून चालणारे या अर्थाने मोदींच्या गणितात ते बसतात. जर निवडले गेले तर ते ‘कॉपी बुक’ राष्ट्रपती ठरतील. मोदींशी ते बराच काळ बोलत होते. त्यातूनच दिल्लीत त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. 

पंतप्रधान मोदी यांनी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या घराला भेट दिली, त्यातून नवी बातमी उगवली. गोविंद यांना पुन्हा संधी देण्यात येणार की काय? परंतु पंतप्रधानांचे हे मावळत्या राष्ट्रपतींबद्दल केवळ एक सद्भावपूर्ण वागणे होते, असे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रे सांगतात. अशी जोरदार बोलवा आहे की, पुढचे राष्ट्रपती इतर मागासवर्गीयांतून निवडले जातील. दक्षिणेतून निवड होण्याची शक्यता अधिक असून महिलेला प्राधान्य दिले जाऊ शकते.

तेलंगणाच्या  राज्यपाल सुंदरराजन तामिलसाई यांचे नाव घेतले जात आहे. त्या तामिळनाडूतून आल्या  असून नाडर समाजाच्या आहेत. के. कामराज या समाजाचे होते. तामिलसाई उमेदवार असतील तर त्याना पाठिंबा देणे  द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना भाग पडू शकते. भाजपमधले पुष्कळ जण पुढचे राष्ट्रपती आदिवासी समाजातून असतील असे सांगत आहेत. असे झाले तर ४७  लोकसभा मतदारसंघात आणि ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात भाजपचे बळ वाढेल असा युक्तिवाद केला जातो. 

पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मागच्याच महिन्यात आदिवासींचा एक मोठा मेळावा भरवला होता, तर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. आदिवासी वारसा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. अर्थात, आदिवासी व्यक्तीला राष्ट्रपतीपद देणे जरा दूरचे वाटते.

गोंधळलेले विरोधक
विरोधी पक्षात सध्या यापूर्वी कधीही नव्हता असा केविलवाणा गोंधळ आहे. काँग्रेस पक्ष अंतर्गत कुरबुरी दूर करण्यात मग्न असून  एका अर्थाने तो अस्तित्वाची लढाई लढत आहे. डाव्या पक्षांचा भ्रमनिरास झाला आहे. टीआरएस, आप आणि तृणमूल काँग्रेस थोडे उड्या मारत आहेत. 

बाकीचे पक्ष काय करावे हेच सुचत नसल्याने विंगेत थांबून आहेत. २०१७ साली झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत १७ विरोधी पक्ष नेत्यांच्या समितीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात आले होते. परंतु यावेळी विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रपती निवडणुकीबाबत अगदी प्राथमिक स्वरूपाचीही काही बोलणी झालेली नाहीत. भ्रमनिरास झालेले सीताराम येचुरी परदेशात निघून गेले आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीवर असलेले शरद यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे आराम करत आहेत. लालू यादव हेही न्यायालयीन प्रकरणे आणि प्रकृती अस्वास्थ्य याच्याशी झुंजत आहेत. टीआरएस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे एचडी देवेगौडा यांनी विरोधकांची मोट बांधावी म्हणून त्यांची मनधरणी करत आहेत. 

ममता बॅनर्जी काँग्रेस आणि डाव्यांचा हिशेब चुकता करण्यात गुंतलेल्या  आहेत. या पार्श्वभूमीवर बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस बहुधा  भाजपबरोबर जाईल. विरोधी पक्षांकडे चवीपुरताही दाखवायला उमेदवार नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. २०१७ साली मीरा कुमार यांच्याविरोधात मागे पडलेले गोपाळकृष्ण गांधी हेच काय ते एक नाव पुसटसे घेतले जाते. यावेळी कोणीही काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी स्वीकारणार नाही.

Web Title: Countdown begins for presidential election A notification will be issued at any time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.