देश स्वतंत्र झाला अन् आम्ही शहामृगासारखे वाळूत डोके खुपसून बसलो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 04:52 PM2019-12-19T16:52:19+5:302019-12-19T16:56:21+5:30
राजकीय, सामाजिक परिस्थितीवर डॉ. श्रीराम लागू यांचे चिंतन
( शब्दांकन : धर्मराज हल्लाळे )
१९४२ च्या चळवळीत अनेक राष्ट्रीय नेते पुण्याला येत असत. त्यावेळी मी लहान होतो. पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल अशी मोठी माणसे येत असत. त्यांची भाषणे ऐकायला आम्ही जात होतो. मौलाना आझाद यांचे उर्दू फारसे कळत नसले, तरी आम्ही ते ऐकायला आवर्जून जायचो. ते सर्व नेते आम्हाला सांगायचे, आपला देश अडाणी आहे. गरीब आहे. अंधश्रद्धा आहे, असे खूप दोष आहेत. परंतु, हे सर्व काही ब्रिटिश राज्यामुळे निर्माण झाले आहे. आणि एकदा आपणास स्वातंत्र्य मिळाले की हे सर्व दोष क्षणात बाजूला जातील. त्यावर आमचा विश्वास बसला, त्यामुळे आम्ही १९४२ च्या चळवळीत हिरीरीने सहभागी झालो. विद्यार्थीदशेत असताना या सहभागाला घरच्यांची परवानगी नव्हती. वडील काँग्रेसचे पुढारी होते. ते तुरुंगात गेले. ते परत आले. स्वातंत्र्यही मिळाले. आम्हाला वाटले आता सर्वकाही मिळाले. त्यावेळी आम्ही कॉलेजात होतो. पुढे शिकत राहिलो. नाटकात भाग घेतला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. अगदी शहामृगासारखे वाळूत डोके खुपसून बसलो. गाफील पिढीचे प्रतिनिधित्व केले. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला आमची पिढीच जबाबदार आहे.
खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरी सुरुवात होणार होती. मात्र आम्ही निवांत झालो होतो. आणि हे सर्व काही १९७५ पर्यंत तसेच चालू राहिले. जेव्हा आणीबाणी पुकारली गेली, तेव्हा सारेच खडबडून जागे झाले. फक्त युद्धकाळातच आणीबाणी पुकारली जाते. शांततेच्या काळात आणीबाणी पुकारण्याचे काय? आणि त्यावेळी लक्षात आले याला आमची गाफील पिढी जबाबदार आहे. मी आता ८० वर्षांचा आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा २० वर्षांचा होतो. एकूणच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वकाही आबादीआबाद झाल्याचा भास निर्माण केला गेला. आणि आपले काही कर्तव्य आहे, याची जाणीवच झाली नाही अन् करूनही दिली नाही. त्याची फळे आम्ही भोगतोय.
आता आहे ती परिस्थिती बदलणे एकेका देशाच्या हाती राहिलेले नाही. तुम्ही जगाबरोबर फरफटत जाणार आहात. आपल्या देशाची संपत्ती पुष्कळ आहे. ज्ञानाची संपत्ती खूप आहे. माणुसकीची संपत्ती खूप आहे. केवळ त्या संपत्तीचा योग्य विनियोग करणे अजूनही बाकी राहिले आहे. हे काम पुढच्या पिढ्यांना करावे लागणार आहे. मात्र ते जोमाने होताना दिसत नाही. अजूनही आमची सरकारे डोळ्याला झापडे लावून चालली आहेत. तरुण पिढीला तर विचार करायला सवडच दिली नाही. ते ैचैनीमध्ये गुरफटलेली आहे. ४० कोटींची लोकसंख्या १०० कोटींवर गेली आहे. आता उत्पन्नही १०० कोटींवर वाढली आहे. त्यामुळे आता विचार कसला करायचा, अशी भावना तरुणांमध्ये निर्माण होताना दिसते.
साधे नागरिकत्वाचे नियमसुद्धा पाळत नाही. रस्त्याच्या कडेने जाताना शिस्तीत जायला पाहिजे, अशा साध्या साध्या गोष्टीसुद्धा आम्हाला शिकविल्या जात नाहीत. सगळा बकालपणा माजला आहे. अस्वच्छा, अज्ञान, बेशिस्त, अप्रामाणिकपणा याची सगळीकडे चलती आहे. आदर्श कशाला पाहिजे. गांधीजींचे नाव तुम्ही उठ-सूठ घेता. गांधीजी एक वंदनीय माणूस म्हणून जगभर मानले जातात. आईनस्टाईनने एकदा म्हटले होते, काही पिढ्यानंतर असा माणूस होऊन गेला यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. आईनस्टाईन आणि गांधीजींची कधीही भेट झालेली नव्हती. इतक्या मोठ्या योग्यतेचा माणूस आमच्याकडे होता आणि आम्ही त्याचे काय केले, तर गोळ्या घालून त्यांचा खून केला. असे सगळे करंटेपणा आहे. त्यामुळे आता उगाच रडण्यात काय अर्थ आहे. जे समोर येईल, त्याचा सामना करायचा. त्यातून योग्य तो मार्ग, तोही ज्याने-त्याने वैयक्तिक स्तरावर काढायचा. प्रत्येकाने मानले पाहिजे की, ही माझी जबाबदारी आहे.
आज आम्ही काय म्हणतो तर हे काम पालिकेचे आहे, ते काम सरकारचे आहे, मी वाट्टेल ते करणार, बेशिस्त वागणार, अस्वच्छता करणार, जबाबदारी मात्र पालिका आणि सरकारची. हे बरोबर नाही. आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. मनमोहनसिंग यांच्यासारखे जाणकार अर्थतज्ज्ञ देशाचे पंतप्रधान राहिले. आर्थिक उन्नती दिसते आहे. अशावेळी तरुणांच्या खांद्यावरच उद्याचे ओझे आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून स्वत:च्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करावे तरच चित्र बदलेल.
(प्रख्यात सिनेअभिनेते तथा विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांनी १५ आॅगस्ट २००७ रोजी लोकमतला दिलेल्या मुलाखतीचा सारांश)