देश की खेळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:00 AM2019-02-25T06:00:44+5:302019-02-25T06:00:54+5:30
क्रीडा क्षेत्रात पाकिस्तानशी असलेले संबंध सुरळीत ठेवूनही भारताच्या पदरात काय पडले, हा इतिहास जगासमोर आहे. त्यामुळे खेळ महत्त्वाचा की देशाभिमान हे ठरवण्याची वेळ आली आहे. त्याबाबत देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत.
पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतात प्रत्येक स्तरातून संताप व्यक्त होत आहे. भारतात याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही पाकिस्तानचा सहभाग असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. मात्र, तरीही चर्चेचा मार्ग खुला ठेवत भारताने विविध माध्यमांतून संबंध ठेवले. मात्र पुलवामा घटनेनंतर व्यापार, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांतून पाकविरोधी भावना उमटत असून त्या देशाशी कोणत्याही प्रकारचे संबंध भारताने ठेवू नयेत, असा सूरही उमटतो आहे. हे अपेक्षितच होते.
याआधीही व्यापार, सांस्कृतिक, कला अशा क्षेत्रातील पाकशी असलेले संबंध तोडण्यात आले होते. मात्र क्रीडा क्षेत्राचा अपवाद केला गेला. क्रिकेट वगळता अन्य खेळांतील खेळाडू दोन्ही देशांत येऊन-जाऊन खेळत होते. वस्तुत: कारगिल युद्धानंतर २००२-०३ च्या काळात दोन्ही देशांतील क्रिकेट संबंध पुन्हा जुळले होते. दोन्ही देशांतील मैत्रीलाही काही प्रमाणात बळकटी येत होती. क्रिकेट हा एकमेव खेळ दोन्ही देशांच्या मैत्रीला सांधत होता. सर्व काही सुरळीत झाल्याचे वाटत असतानाच २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हे संबंधही संपुष्टात आले. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धा म्हणजेच विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांव्यतिरिक्त कधीही आमनेसामने आले नाहीत. परंतु, पुलवामा हल्ल्यानंतर आयसीसीच्या स्पर्धेतही भारताने पाकसोबत खेळू नये, असा सूर उमटत आहे. केवळ क्रिकेटच नाही, तर कोणत्याही खेळात भारताने पाकसोबत खेळू नये, असा एकत्रित सूर उमटत असल्यानेच नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पाक नेमबाजांना भारतीय व्हिसा नाकारण्यात आला.
याशिवाय आशियाई स्नूकर स्पर्धेतील भारतीय दौराही पाकिस्तानी खेळाडूंसाठी अडचणीचा ठरला आहे. खेळांमध्ये राजकारण आणले जाऊ नये असाही एक मतप्रवाह आहे. तो आपल्या जागी योग्य असला, तरी ४४ जवानांच्या बलिदानाची जाणीव ठेवून जोरदार प्रत्युत्तर देण्याची भाषा देशभर तीव्र होत असताना खेळांच्या मैदानातही पाकला दूर ठेवले तर काय चुकीचे आहे? कारण या जवानांच्या बलिदानापेक्षा खेळ नक्कीच मोठा नाही. एक क्रीडाप्रेमी किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण स्वत: सीमेवर जाऊन शत्रू राष्ट्राशी दोनहात करू शकत नाही. पण तीच भावना आपण खेळांच्या मैदानांवर नक्कीच प्रकट करू शकतो. राहिला प्रश्न पाकसोबत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळायचे की नाही? हा. पण पाकमुळे भारताला किती मोठी हानी पोहोचली आहे याची चिंता क्रिकेटची आंतरराष्ट्रीय संस्था वाहात नाही. त्यामुळेच ते आपल्या नियमावलीत किंवा स्पर्धेच्या रचनेत कोणताही बदल करणार नाहीत. त्यामुळे भारतापुढे दोनच पर्याय उरतात, एक म्हणजे १६ जूनच्या लढतीत पाकविरुद्ध खेळावे किंवा त्या सामन्यातून माघार घेत पाकला सरळ दोन गुण बहाल करावे. यातही दोन तट आहेत. एका गटानुसार पाकला फुकटचे दोन गुण देण्यापेक्षा सामना खेळून त्यांना नमविले पाहिजे, तर दुसऱ्या म्हणण्यानुसार पाकविरुद्ध न खेळताही स्पर्धेत शानदार आगेकूच करण्याइतका भारतीय संघ मजबूत आहे. मूळ मुद्दा खेळण्याचा किंवा न खेळण्याचा नसून देशाच्या स्वाभिमानाचा आहे.
भारताने क्रीडा स्पर्धांमध्ये पाकसह खेळल्यास दोन्ही देशांतील संबंध पुन्हा सुधारतील, अशी आशा जरी व्यक्त होत असली, तरी आजवरचा इतिहास त्यापेक्षा वेगळा आहे हे लक्षात घ्यायला हवे. याआधीही दोन्ही देशांतील शांततेसाठी भारतानेच वारंवार पुढाकार घेतल्याचे काय झाले? पाकिस्तानला खरोखरीच शांतता हवी आहे का? जर तशी इच्छा असती, तर ती कृतीत दिसली असती. आताही या हल्ल्याचा निषेधही न करता पाकिस्तानने युद्धाच्या तयारीचा पवित्रा उचलला आहे. एवढेच नव्हे, तर दहशतवादाबाबत भारतावर दुगाण्या झाडण्याचेच काम तेथील राजकीय नेते, लष्करी अधिकारी करीत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची वेगवेगळ््या मार्गाने कोंडी करतानाच क्रीडा क्षेत्रातही त्या देशाला माती चारण्याची वेळ आल्याची देशवासीयांची भावना योग्य मानायला हवी आणि ती कृतीत आणायला हवी.