'वाचेदयाळां'चा देश!
By admin | Published: September 21, 2016 07:53 AM2016-09-21T07:53:02+5:302016-09-21T07:53:02+5:30
पाकिस्तानी लष्कराने ज्यांना पुरस्कृत केल्याचा भारताचा दावा आहे आणि जो नेहमीप्रमाणे पाकने फेटाळून लावला आहे
पाकिस्तानी लष्कराने ज्यांना पुरस्कृत केल्याचा भारताचा दावा आहे आणि जो नेहमीप्रमाणे पाकने फेटाळून लावला आहे, त्या दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे जम्मू-काश्मिरातील उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्याचे आणि या हल्ल्यात हकनाक आपले प्राण गमवावे लागलेल्या सतरा जवानांच्या मृत्यूचे शल्य दीर्घकाळपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचत राहील यात शंका नाही. जेव्हा केव्हा असे शल्य मनात दाटून येते तेव्हा संवेदनशील माणूस अंतर्मुख होतो, आत्मपरीक्षण करतो आणि भविष्यात पुन्हा तसे काही घडू नये यासाठी काय तजवीज करायची याचा शांतपणे विचार करतो; पण कोणत्याही स्थितीत तो वाचाळपणा मात्र करीत नाही. दुर्दैवाने आजवर जेव्हा जेव्हा पाकिस्तानने स्वत: किंवा पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात येऊन आगळीक केली तेव्हा तेव्हा भारतात उफाळून आली ती वाचाळता. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे', या सुभाषितवजा म्हणीची मग प्रकर्षाने आठवण होते. पाकी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला तेव्हा तो देशाच्या गंडस्थळावरील हल्ला मानला गेला. त्यानंतर मुंबई, पठाणकोट, उरी असे एकामागोमाग एक हल्ले झाले आणि देशाची एक नव्हे अनेक गंडस्थळे फोडली गेली. त्यावरील प्रतिक्रिया पुन्हा तीच, वाचाळवीरतेची. घातक्यांना त्यांच्या पापाची सजा दिली जाईल, ईट का जबाब पत्थर से दिया जायेगा, पाकिस्तानला हे खूप महागात पडेल, असे किंवा यासारखे इशारे पंतप्रधानांपासून निम्न स्तरावरील पुढार्यांपर्यंत सारे जणच जे देत असतात ते नेमके कोणाला उद्देशून असतात? आंतरराष्ट्रीय समुदायाला? आणि त्याचा लाभ काय? उलट असे इशारे किंवा अशी वक्तव्ये अकारण देशात एक उन्माद करतात आणि उन्मादात विवेक नेहमीच हरवून जात असतो. जे सतरा जवान मृत्युमुखी पडले त्यांच्या देहत्यागाचा पूर्ण आदर राखून जर असे म्हटले की, त्यांनी वास्तवात जे पत्करले ते वीरमरण नव्हते, तर तो अनास्थेने घेतलेला त्यांचा बळी होता, तर ते वावगे कसे ठरू शकेल? प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपासून हाकेच्या अंतरावर असणार्या आणि म्हणूनच अत्यंत संवेदनशील मानल्या जाणार्या उरी येथील लष्करी तळाचा जर कडेकोट बंदोबस्त करण्यात लष्कर आणि लष्कराचे कर्तेकरविते अपयशी ठरत असतील तर 'आम्हाला सरकारने आता परवानगी द्यावी, आम्ही सीमा पार करून पाकवर हल्ला करू' ही लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांची भाषादेखील एक वाचाळताच ठरत असते. येथे प्रमोद महाजन संरक्षणमंत्री असतानाचा एक प्रसंग आठवतो. एका दूरचित्रवाणीवरील चर्चा कार्यक्रमात त्यांना एका विदेशी पत्रकाराने वारंवार 'पाकने हल्ला केला तर तुमची भूमिका काय राहाणार' हा एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यावर महाजन म्हणाले, 'कोणत्याही सार्वभौम देशाच्या संरक्षण सज्जतेची आणि धोरणात्मक बाबींची चर्चा अशी चावडीवर बसून होत नसते;' पण दुर्दैवाने आज तसेच सुरू आहे. पाकी लष्कराने अशा उघड परवानग्या मागून आणि घेऊन आजवरचे भारतावरील हल्ले केले होते काय? लष्करात सेवारत असलेल्या अधिकर्यांची ही तर्हा, तर नवृत्तांचे बोलायलाच नको. आता भारताने पाकिस्तानात 'फिदाईन' पाठविले पाहिजेत असे एक नवृत्त लष्करी जनरल म्हणतो, तर दुसरा मुलकी तथाकथित सुरक्षा सल्लागार सल्ला देतो की, टाकाच एकदा पाकिस्तानवर अणुबॉम्ब. फार तर काय होईल, पाकही टाकेल आणि मरतील भारतातील दहा-पाच कोटी लोक; पण प्रश्न तर कायमचा निकाली निघेल! युद्ध काय असते, त्याचे परिणाम काय संभवतात, आज समोरासमोरच्या युद्धाचा काळ राहिलेला नाही; पण तरीही संघर्ष सुरू करायचा म्हटला की, त्याचे गंभीर आर्थिक परिणाम जनतेला भोगणे भाग असते, प्रचंड महागाईचा सामना करणे क्रमप्राप्त ठरत असते; पण कांदा पन्नास रुपये झाला की, लगेच कासावीस होणारे व सरकारे उलथवून टाकणारे लोक समाजमाध्यमांमधून सल्ले देत असतात, बेचिराख करा पाकिस्तानला. आपले जपावे आणि दुसर्याला यश द्यावे, अशी मराठीत एक म्हण आहे; पण भारतावर आजतागायत जितके म्हणून अतिरेकी हल्ले झाले त्या प्रत्येक हल्ल्याच्या वेळी कोणत्या ना कोणत्या यंत्रणेचा गाफीलपणाच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले; पण पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्यात तर केवळ गाफिलीच नव्हे, तर शत्रूशी हातमिळवणी करणार्यांची गद्दारी कारणीभूत असल्याचे दिसून आले; पण अशा प्रत्येक हल्ल्यानंतर कोणता धडा शिकला गेला आणि दक्षतेचे व सावधगिरीचे कोणते उपाय योजले गेले. संसदेवर हल्ला झाल्यानंतर तेथील सुरक्षाव्यवस्था अत्यंत चोख करण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगितले.