चुंबनाचा विश्वविक्रम करणारं जोडपं विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 07:59 IST2025-03-08T07:57:58+5:302025-03-08T07:59:30+5:30
हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे.

चुंबनाचा विश्वविक्रम करणारं जोडपं विभक्त
या जगात ध्येय‘वेड्या’ लोकांची काही कमी नाही. काेणत्या वेळी, कोण, कशासाठी, काय करेल, याचा खरोखरच काहीही भरवसा नाही. आता थायलंडच्या या जोडप्याचंच बघा. एक्काचाई आणि लक्साना टिरानाराट असं या दाम्पत्याचं नाव. दोघांचंही एकमेकांवर अपार प्रेम. सगळेजण त्यांच्याकडे पाहून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे इतकं त्यांचं गाढ प्रेम. हे जेाडपं जगप्रसिद्ध झालं त्याचीही एक अनोखी कहाणी आहे.
एकमेकांवर प्रेम असणं, जवळीक असणं ही गोष्ट समजू शकते, पण या जोडप्यानं काय करावं? दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या जोडप्यानं एका अनोख्या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा होतीच तशी एकदम हटके. जे जोडपं जास्तीत जास्त वेळ चुंबन घेईल त्यांना भलं मोठं बक्षीस जाहीर झालं होतं. केवळ पैशासाठी नाही, पण आपण हे नाजूक आव्हान पेलू शकतो का या उत्सुकतेपोटी एक्काचाई आणि लक्साना यांनी मोठ्या हौसेनं या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा त्यांनी जिंकलीही.
२०१३मध्ये झालेल्या या स्पर्धेत त्यांनी सलग ५८ तास ३५ मिनिटे एकमेकांचं चुंबन घेतलं. या स्पर्धेची एक प्रमुख अट होती.. कारण काही का असेना, पण तुम्ही तुमची चुंबनभेट सोडली, तर स्पर्धेतलं तुमचं आव्हान, अस्तित्व संपेल!
एक्काचाई आणि लक्साना यांच्याप्रमाणे आणखीही अनेक प्रेमवीरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांचंही एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं. ही स्पर्धा आपणच जिंकू असं अनेक जोडप्यांना वाटत होतं, पण बऱ्याच जणांना हे नाजूक आव्हान काही पेलता आलं नाही. अगदी मनापासून प्रयत्न करुनही या जोडप्यांनी अखेर हार मानली आणि ते परस्परांपासून दूर झाले, तसे स्पर्धेतूनही लगेच बाहेर फेकले गेले.
एक्काचाई आणि लक्साना मात्र त्याला अपवाद ठरले. सर्वांत दीर्घ चुंबनाचा जागतिक विक्रम त्यांनी केला. त्यांचा हा अनोखा विक्रम गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंदवला गेला! त्यावेळी ही स्पर्धा खूपच गाजली होती आणि ‘एकमेकांवर गाढ प्रेम असलेलं जोडपं’ म्हणून त्यांचं नाव जगभरात गाजलं होतं. आजही त्यांचं नाव त्याचसाठी घेतलं जातं.
...पण ही कहाणी इथेच संपलेली नाही. या कहाणीत नुकताच आता एक वेगळा ट्विस्ट आला आहे. चुंबनाचा विश्वविक्रम करुन प्रेमाच्या दुनियेत आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरलेल्या या जोडप्यानं आता घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
२०११मध्ये झालेल्या अशाच एका चुंबन स्पर्धेतही या जोडप्यानं भाग घेतला होता. ती स्पर्धाही त्यांनीच जिंकली होती. २०१३ला मात्र त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडून विश्वविक्रम केला होता. या बक्षिसाच्या रकमेतून ते मालामाल झाले होते. लाखो रुपयांच्या हिऱ्यांच्या दोन अंगठ्याही त्यांनी स्पर्धेत जिंकल्या होत्या. आता मात्र ही सारी ‘प्रेमकहाणी’ संपुष्टात आली आहे.
त्या दोघांना परस्परांपासून वेगळं करण्यामागे काय कारण आहे? हे दोघे म्हणतात, ‘आमच्या विभक्त होण्यामागे आवर्जून सांगावं असं एकच एक, फारसं मोठं कारण नाही, पण काळाच्या ओघात शरीर-मनानं आम्ही एकमेकांपासून दूर होत गेलो.’ अर्थात, एक्काचाई आणि लक्साना टिरानाराट हे दोघं आता विभक्त झाले असले, तरी मुलांचं पालनपोषण मात्र ते सोबतीनंच करणार आहेत..