जगण्याचे धैर्य हवे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:16 AM2017-07-19T04:16:36+5:302017-07-19T04:16:36+5:30
परवा आयटी अभियंता गोपीकृष्ण गौडा, आज मन्मथ म्हैसकर, त्यापूर्वी आणखी एकजण व उद्याही पुन्हा असाच एखादा कोणीतरी!
परवा आयटी अभियंता गोपीकृष्ण गौडा, आज मन्मथ म्हैसकर, त्यापूर्वी आणखी एकजण व उद्याही पुन्हा असाच एखादा कोणीतरी! तारुण्यात नुकताच कोठे प्रवेश केलेल्या युवकांच्या अशा आत्महत्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढू लागले आहे. परदेशात होणाऱ्या विविध प्रकारच्या सर्वेक्षणातून भारताचा, त्यातही पुण्या-मुंबईचा सर्वाधिक आनंदी शहरे असा निष्कर्ष निघत असताना त्या पार्श्वभूमीवर अशा आत्महत्या मन विदीर्ण करतात. मरणाला कवटाळण्याचे धैर्य दाखवणारी ही तरुण मुले जगण्यासाठी ते धैर्य का दाखवत नाहीत हा मोठा गहन प्रश्न आहे. जगणे त्यांच्यासाठी असे छळणारे का होत असावे? असा कोणता मोठा पहाड त्यांच्यावर कोसळला असतो की त्यांना जगावेसेच वाटत नाही? गेल्या काही वर्षांत जीवनमान उंचावले आहे. पालक आपल्या पाल्यांना फुलासारखे सांभाळतात. लहानपणापासून त्यांना जे हवे ते लगेचच आणून दिले जाते. पैशांचा अशा पालकांच्या बाबतीत काही प्रश्नच नसतो. प्रश्न असतो तो वेळेचा. कामाच्या व्यापात मुलांना आपण वेळ देत नाही, त्याची भरपाई ते त्यांच्यासाठी असा हवा तेवढा, त्यांच्या मागणीनुसार खर्च करून करायचा प्रयत्न करतात. वय नसताना गाडी घेऊन देणे, हौस म्हणून चारचाकीही चालवायला देणे, पार्टी कल्चरमध्ये त्याला सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे असे अनेक प्रकार त्यांच्याकडून केले जातात. मुले त्यामुळे हट्टी होतात. नाही असे ऐकायची त्यांना सवयच होत नाही. मग एखादी मुलगी नाही म्हणाली, एखाद्या परीक्षेत अपयश आले, एखाद्या मित्राची बरोबरी नाही करू शकले की लगेचच त्यांच्या इगोला धक्का लागतो. एक तर डिप्रेशनमध्ये जातात किंवा मग आत्महत्येसारखा आततायी मार्ग अवलंबतात. उच्च मध्यमवर्गीय, नवश्रीमंत अशा कुटुंबांमध्ये या समस्यांनी कधीचे घर केले आहे. हे सगळे बदलत्या सामाजिक स्थितीचे बळी आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढायचे असेल तर सर्वप्रथम पालकांनी बदलले पाहिजे. आजकालच्या जमान्यात कोणीही मुलांवर छडी मारून संस्कार करा असे म्हणणार नाही, पण शालेय वयातील आपल्या मुलांना पालकांनी फक्त क्वॉलिटी टाइम दिला तर ती मानसिकदृष्ट्या खंबीर, कणखर बनतील व कोणत्याही परिस्थितीचा सामना करत जगण्याचे धैर्य त्यांच्यात येईल.