बेताल नेत्यांना आवरा; जग एका धर्माने नव्हे तर अनेक धर्मांच्या अस्तित्वानेच चालणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 09:59 AM2022-06-07T09:59:19+5:302022-06-07T09:59:44+5:30
संस्कृती, राजकारण, समाजकारण आणि धार्मिक आचरण यांचेही जागतिकीकरण झाले आहे. त्या-त्या क्षेत्रातील विषयांवर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य जसे देशांतर्गत आहे, तसेच ते जागतिक पातळीवर आहे याचे भान भाजपमधील अनेक बेताल, उथळ नेत्यांना नाही.
आपला विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा असेल ती जीवनपद्धती धर्माच्या आधारे स्वीकारावी, त्याचवेळी इतर धर्मांचा आदर करावा. यासाठीच भारताने धर्मनिरपेक्षता तत्त्व म्हणून स्वीकारले आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धार्मिक टिप्पणी करण्याचे कोणते परिणाम असू शकतात, याचे प्रत्यंतर नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्या वक्तव्याने लक्षात आले असेल. जागतिकीकरणाने केवळ आर्थिक व्यवहारांचे विश्वव्यापी रूप धारण केलेले नाही.
संस्कृती, राजकारण, समाजकारण आणि धार्मिक आचरण यांचेही जागतिकीकरण झाले आहे. त्या-त्या क्षेत्रातील विषयांवर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य जसे देशांतर्गत आहे, तसेच ते जागतिक पातळीवर आहे याचे भान भाजपमधील अनेक बेताल, उथळ नेत्यांना नाही. कायद्याचा अभ्यास केलेल्या आणि जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्रातील सत्तारूढ पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला काय बोलावे याचे भान राहू नये, याचे आश्चर्य वाटते. मुस्लीम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या तत्त्वातील जीवनपद्धतीचा संदर्भ देऊन टीव्ही चॅनेलवरील वायफळ बडबडीत केलेल्या वक्तव्याचे जागतिक पडसाद उमटू शकतात, याचे भान प्रवक्तेपदाची जबाबदारी घेणाऱ्यांना असायलाच हवे.
नवीनकुमार जिंदाल यांच्यावरदेखील दिल्ली प्रदेश भाजपच्या माध्यमप्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यांनीही असाच उन्माद केला आहे. कोणत्याही धर्मांबद्दल अपमानकारक वक्तव्य करण्याची गरज नाही. या दोघांच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशातील कानपूर वगळता इतरत्र फारसे उमटले नाहीत, पण आखातातील अनेक राष्ट्रांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. मुस्लीम हा एका राष्ट्रापुरता धर्म नाही. जगातील अनेक देशांतील कोट्यवधी लोक या धर्मावर श्रद्धा बाळगतात. त्यानुसार जीवन जगतात. कुवेत, कतार, सौदी अरेबिया, बहारिन, ओमान, इराण आणि संयुक्त अरब अमिरात या राष्ट्रांनी तेथील भारतीय राजदूतांना पाचारण करून निषेध नोंदविला. हा धार्मिक वादाचा विषय नाही.
या राष्ट्रांपैकी इराण वगळता इतर राष्ट्रांचे ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’ आहे. त्यांच्याबरोबर भारताने अलीकडच्या काळात व्यापार वाढविला आहे. परिणामी मागील आर्थिक वर्षांत या कौन्सिलबरोबर झालेला व्यापार ९० हजार कोटी डॉलर्सचा आहे. तो भारतीय चलनात ६७ लाख ५० हजार कोटी होतो. ही मोठी जमेची बाजी आहे. या सर्व राष्ट्रांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय लोक रोजगारासाठी गेले आहेत. नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल या दोघांच्या वक्तव्याने आखाती देशात जी प्रतिक्रिया उमटली त्यावर भारत सरकारला खुलासा करावा लागला. पक्षीय राजकारण करणाऱ्यांनी भारताच्या प्रतिष्ठेला वेठीस धरले.
ऐंशी टक्के हिंदू ज्या देशात आहेत, त्यांनी साडेचौदा टक्के मुस्लिमांचा टोकाचा द्वेष करण्याचे कारण काय आहे? या विश्वाच्या पाठीवरील मानवाच्या सर्व व्यवहारांचा संदर्भ लक्षात घेऊन आपणास देशाचा कारभार चालवावा लागणार आहे. शिवाय आपला पक्ष सत्तारूढ आहे, याची जाणीव ठेवायला हवी. पक्षांनी राजकीय भूमिका जरूर घ्यावी, पण धार्मिक विषयात लुडबूड करण्याचे कारण नाही. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हांपासून धर्मनिरपेक्षता हे तत्त्व स्वीकारून सर्वच धर्मांचा आदर, आचरण आणि स्वीकार करण्याचा सर्वांना समान अधिकार बहाल करण्यात आला.
जागतिक पातळीवर शीतयुद्धाची परिस्थिती होती तेव्हा अलिप्ततावादाचा पुरस्कार भारताने केला होता. जगाला पुन्हा महायुद्धाचा धोका बसू नये, यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा स्वीकार करण्यात आला. या सर्व इतिहासाशी देणे-घेणे नसणारे हे उथळ प्रवक्ते आपोआप तयार झाले नाहीत. गहू पेरल्यावर गहूच उगवतो, तसे राजकीय पक्षांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन धार्मिक उन्माद केल्यास त्याचे असे परिणाम जाणवत राहतात. आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच एक मुलाखत देताना सुंदर उत्तर दिले आहे.
युरोपच्या समस्या समोर ठेवून जगाकडे पाहण्याची पाश्चिमात्य माध्यमांची सवय आहे. ते म्हणाले, युरोपच्या समस्या या जगाच्या समस्या आहेत, या मानसिकतेतून युरोपने बाहेर यायला हवे! जयशंकर यांनी संपूर्ण विश्वाच्या राजकारणाचा अर्थ त्यातून सांगितला. ही भूमिका भाजपने एक राजकीय पक्ष म्हणून स्वीकारायला हवी. भाजपने या दोघांची हकालपट्टी केली ते बरे झाले. सरकारने त्यांच्या भूमिकेशी असहमती दर्शविली आहे. जग एका धर्माने नव्हे तर अनेक धर्मांच्या अस्तित्वानेच चालणार आहे. त्यासाठी धर्मनिरपेक्षता हा समान धागा आहे!