नालस्ती की प्रशस्ती

By admin | Published: November 25, 2015 11:05 PM2015-11-25T23:05:18+5:302015-11-25T23:05:18+5:30

नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे

Credibility Cards | नालस्ती की प्रशस्ती

नालस्ती की प्रशस्ती

Next

नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे की त्यांना प्रशस्ती बहाल करणारी आहे, याचा निवाडा होऊ शकतो. सध्या जगभर हैदोस घालीत असलेल्या इस्लामीक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरीया (इसीस) या अत्यंत जहाल दहशतवादी संघटनेची सध्या जगभर ‘सैन्यभरती’ सुरु आहे. भारतात आणि खुद्द महाराष्ट्रातदेखील अशा काही भरती ठिकाणांचा छडा लावला गेला आहे. केवळ भारताचा विचार करायचा तर मुस्लिमांमधील साक्षरतेचे अल्प प्रमाण लक्षात घेता या समाजातील तरुणांना ‘गुमराह’ करणे म्हणजे बहकविणे तुलनेने बरेच सोपे असल्याने काही तरुणांचा इसीससारख्या संघटनांकडे ओढा असल्याच्या बातम्याही अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. पण त्यांना अशा संघटनांमध्ये अत्यंत तुच्छ वागणूक दिली जात असल्याचा एक अहवाल तपासी यंत्रणांनी पाहणीअंती तयार केला आहे. आशिया खंडातील तसेच नायजेरीया आणि सुदानसारख्या देशांमधील मुस्लीम तरुण अरबी तरुणांसारखे कडवे नसतात आणि त्यामुळे त्यांना केवळ ‘हरकामे’ म्हणून राबवून घेतले जाते, असा हा अहवाल म्हणतो. केवळ तितकेच नव्हे तर या तरुणांना पायदळात वापरले जाते आणि कोणतेही संवेदनशील (?) काम म्हणे दिले जात नाही. आत्मघातकी सैनिक म्हणून त्यांचा वापर करतानाही त्यांना तशी पूर्वकल्पना दिली जात नाही. म्हणजे धर्मासाठी आपण कुर्बानीला तयार आहोत यासारखी जी भावना एरवी आत्मघातकी पथके बोलून दाखवीत असतात तसा काहीही प्रकार यांच्याबाबतीत नसतो. परिणामी त्यांना घातपाताच्या कामगिरीवर पाठविले जाते. तिथून विशिष्ट क्रमांकावर फोन करायला सांगितले जाते आणि फोन लागताच होणाऱ्या भीषण स्फोटात त्यांच्या शरीरीच्या चिंधड्या होऊन जातात. इसीसला आशियातील म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगला देशातील मुस्लिम तरुण बेभरवशाचे किंवा बिनकडवे वाटत असतील तर या देशातील आणि विशेषत: भारतातील सर्वसाधारण वातावरणाचाच तो परिणाम मानावा लागेल आणि ही बाब नक्कीच स्वागतार्ह म्हणावी लागेल. आता प्रश्न इतकाच की इसीससारख्या संघटना आपल्याला काय आणि कशी किंमत देतात याचा या देशातील मुस्लीम तरुणांमध्ये जितका परिणामकारक प्रचार आणि प्रसार होईल तितका दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या मानवी रसदीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकेल व काही प्रमाणात का होईना त्यांना पायबंद बसेल.

Web Title: Credibility Cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.