शवविच्छेदनच की ते
By admin | Published: June 2, 2016 02:00 AM2016-06-02T02:00:53+5:302016-06-02T02:00:53+5:30
तो घात होता की निव्वळ अपघात, याची आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी केली जाईल. चौकशीचे निष्कर्ष यथावकाश जनतेसमोर येतील वा येणारही नाहीत
तो घात होता की निव्वळ अपघात, याची आता वरिष्ठ पातळीवरुन चौकशी केली जाईल. चौकशीचे निष्कर्ष यथावकाश जनतेसमोर येतील वा येणारही नाहीत. पण हे सारे एकप्रकारे शवविचेछदनासारखेच असेल. देशातील लष्करास आवश्यक दारुगोळा साठवून ठेवल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील पुलगावच्या लष्करी भांडारास अचानक आग लागावी आणि या आगीने मोठ्या प्रमाणावरील दारुगोळा भस्मसात करतानाच त्याहून अधिक क्लेषकारक आणि दु:खद म्हणजे लष्करातील वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांसमवेत लष्कराच्या आणि अग्नी प्रतिबंधक तुकडीतील जवानांचा बळी घ्यावा ही बाब दुर्लक्षिण्यासारखी आणि सहजभावाने घेण्यासारखी नाही. आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात असताना तेथील एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि दक्षता याबाबत काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीच शंका बोलून दाखविली आहे. देश पारतंत्रात असताना ब्रिटिशांनी या भांडाराची निर्मिती केली होती आणि त्यांनी सुरक्षेची जी काही यंत्रणा तयार केली होती, तीच आजदेखील कायम असल्याचेही या निवृत्तांनी म्हटले आहे. वस्तुत: जिथे लष्कराचा वास आहे किंवा जो भूभाग संरक्षण यंत्रणेच्या तीक्ष्ण नजरेखाली आहे तिथे झाला तर केवळ अपघातच होऊ शकतो, घातपात नव्हे अशी स्थिती कोणे एकेकाळी असेल, पण आज ती तशी नाही, हे नाकारता येत नाही. देशातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान आणि अत्यंत रास्तपणे ज्याला देशातील लोकशाहीचे गंडस्थळ मानले जाते असे संसद भवन अतिरेक्यांच्या घातपाती कारवायांपासून सुरक्षित राहू शकत नाही आणि केवळ तितकेच नव्हे तर भारतीय हवाई दलाच्या मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या पठाणकोट हवाई तळात अतिरेकी घुसतात तेव्हां पुलगावसारखी घटना घडल्यानंतर जनसामान्यांच्या मनात घातपाताची शंका डोकावली तर त्यात आश्चर्य नाही. पण जेव्हां हा नि:संशय घातपात नाही असे काही लोक अगदी नि:संदिग्धपणे सांगतात आणि ते सांगतानाच या दारुगोळा भांडाराच्या विस्तीर्ण परिसरात वाढलेल्या आणि आता वाळलेल्या गवताकडे अंगुलीनिर्देश करतात तेव्हां चिंता आणखीनच खोलवर जाते. या वाळलेल्या गवतावर एखादी अज्ञात ठिणगी पडून पुढील हाहाकार माजला असेल तर मग आपत्ती निवारण कार्यक्रमात कोणत्या बाबींचा समावेश होत असतो आणि संभाव्य आपत्तींचे धोके म्हणून कशाकशाचा समावेश केला जातो हा गंभीर उत्सुकतेचा विषय ठरतो. या घात वा अपघाताची चौकशी झाल्यानंतर आता तिथे भविष्यात असा कोणताही प्रकार घडणार नाही याची ग्वाही देणारी वक्तव्ये केली जातील. केवळ तितकेच नव्हे तर देशातील सर्व संवेदनशील आणि संरक्षक दलांच्या दृष्टीने मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या वास्तू तसेच परिसरात आता कसा चोख बंदोबस्त तैनात केला गेला आहे याचा तपशीलदेखील जाहीर केला जाईल. पण जनसामान्यांना या तपशीलात नव्हे तर देशाच्या सुरक्षेत स्वारस्य असते आणि जेव्हां केव्हां अशा घटना घडतात तेव्हां मन कातर होऊन जाते.