क्रिकेटची ‘पृथ्वी’ कवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:07 AM2018-02-05T00:07:04+5:302018-02-05T00:07:10+5:30
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत चौथ्यांदा बाजी मारत भारताने विश्वविक्रमासह जगज्जेतेपद पटकावले.
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत चौथ्यांदा बाजी मारत भारताने विश्वविक्रमासह जगज्जेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहताना पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली युवा संघाने दिमाखात जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे आतापर्यंत वरिष्ठ भारतीय संघालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या काही वर्षांतील १९ वर्षांखालील क्रिकेटमधील कामगिरीवर नजर टाकल्यास या युवा स्पर्धांमधून मोहम्मद कैफ, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, विराट कोहली यासारखे अनेक दमदार खेळाडू भारताला लाभले आहेत. त्यामुळेच युवा क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीवर सर्वांचेच बारीक लक्ष असते. या स्पर्धांमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीचे फळ युवा खेळाडूंना नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्येही मिळाले. पृथ्वी शॉ, शुभमन गिल, मनज्योत कारला यासारख्या गुणवान खेळाडूंना करोडो रुपयांची लॉटरीच लागली आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल असून ते अधिक भक्कम होणार आहे, यात वाद नाही. परंतु, सध्या मिळत असलेली प्रसिद्धी आणि होणारी घसघसीत कमाई याकडे लक्ष विचलित होऊ न देण्याचे मुख्य आव्हान युवा खेळाडूंपुढे आहे. यासाठीच प्रशिक्षकाची कठोर भूमिका खेळाडूंच्या कारकिर्दीमध्ये निर्णायक व अत्यंत महत्त्वाची ठरते. हीच जबाबदारी राहुल द्रविडने अत्यंत चोखपणे बजावली. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामना झाल्यानंतर राहुलने सर्व खेळाडूंवर ‘मोबाईलबंदी’ लावली होती. हे केवळ एक उदाहरण आहे, अशा अनेक गोष्टींबाबतीत कठोर निर्णय घेतल्यानेच आज भारताला पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाची चव चाखायला मिळाली. यासाठीच भलेही प्रशिक्षक मैदानावर खेळत नसला, तरी त्याची भूमिका संघासाठी खूप महत्त्वाची ठरत असते. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय युवांनी थेट जेतेपदाला गवसणी घातली. यावरून त्यांनी भारतीय क्रिकेटचे भविष्य किती मजबूत आहे, हे दाखवून दिले. असे, असले तरी आता या संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडू पुढील विश्वचषक खेळू शकणार नसल्याने, आतापासूनच प्रशिक्षक राहुलला गुणवान खेळाडूंचा शोध घ्यावा लागेल. खेळाडू नक्कीच या शानदार कामगिरीसाठी कौतुकास पात्र आहेत. मात्र, याहून जास्त कौतुक करावे लागेल ते भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेटविश्वातील ‘दी वॉल’ असे बिरुदावली मिरवणारा राहुल द्रविड याचे. क्रिकेटविश्वातील सर्वात शांत, संयमी आणि ‘जंटलमन’ अशी ओळख असलेल्या राहुलने खेळाडू म्हणून बाळगलेले स्वप्न अखेर प्रशिक्षक या नात्याने पूर्ण केले. राहुलसाठी युवा विश्वचषक वरिष्ठ विश्वचषकाहून अधिक महत्त्वाचे ठरते. कारण, वरिष्ठ स्पर्धेत संपूर्ण संघ हा परिपक्व असतो, तर युवा संघातील खेळाडू अननुभवी आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात. अशा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून विश्वविजेतपद पटकावणे सहजसोपे काम नक्कीच नाही. याआधी २०१६ मध्ये विश्वचषक अंतिम सामन्यात राहुलच्या युवा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यानंतर त्याचा पूर्ण संघच बदलला होता आणि २०१८ च्या विश्वचषकासाठी राहुलला पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करावी लागली. दखल घेण्यासारखी बाब म्हणजे हे चक्र आता असेच सुरू राहणार असल्याने दर दोन वर्षांनी होणारी विश्वचषक स्पर्धा प्रशिक्षकांसाठी मोठे आव्हान ठरेल. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांच्या सल्लागार समितीने सुरुवातीला राहुलचे नाव वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सुचविले होते. परंतु, त्यावेळी राहुलने नम्रपणे नकार देताना माझी सर्वाधिक गरज युवा खेळाडूंना असून, यामुळे भारतीय क्रिकेटचा पाया भक्कम करण्यात योगदान देता येईल, असे सांगितले होते. आज राहुलचा तो निर्णय किती अचूक होता, याची प्रचिती येते. त्यामुळेच ही विश्वविजयाची ‘भिंत’ असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.