क्रिकेट: इट्स अ जंटलविमेन्स गेम....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 07:48 AM2022-03-08T07:48:25+5:302022-03-08T07:48:37+5:30

सहा महिन्यांच्या ‘फातिमा’चे लाड करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू मावशा... आणि सामना गमावूनही या प्रेमळ कोंडाळ्यात हरखून उभी फातिमाची आई!

Cricket: It's a gentlewoman's game .... 6 months baby girl of pakistan captain and Indian Players | क्रिकेट: इट्स अ जंटलविमेन्स गेम....

क्रिकेट: इट्स अ जंटलविमेन्स गेम....

Next

‘बायकांना काय क्रिकेट कळतं का? क्रिकेट हा बायकांचा खेळच नाही..’-  इथून सुरुवात होती. आज  विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान अटीतटीचा सामना खेळवला जात असतानाही चर्चा नेहमीप्रमाणे विखाराची नाही, तर अतिशय प्रेमळ क्षणांची होते. फरक एवढाच की तो सामना पुरुष संघात नाही, तर महिला संघात खेळविण्यात आलेला असतो. 

सामना जिंकल्यावर नेहमीचा ‘दुश्मन का खातमा’ टाइप्स विखारी जल्लोष न होता, पाकिस्तानी कप्तानाच्या लेकीच्या भोवती भारतीय संघ जमा होतो.  सहा महिन्यांच्या ‘फातिमा’ बाळाचे लाड ‘मावशी’च्या मायेनं भारतीय क्रिकेटपटू करत असतात. आणि त्यांची आई, पाकिस्तानची कप्तान सामना गमावूनही आपल्याभोवती जमलेल्या या प्रेमळ कोंडाळ्यात हरखून उभी असते. खेळ आणि राजकारण या दोन गोष्टी फक्त ‘जिंकण्यासाठीच’ खेळायच्या असतात, जिथं इर्षा नाही तिथं सन्मान नाही, अशी आजवरची मांडणी. 

भारत-पाक या पारंपरिक       संघातल्या या सामन्यातही ‘प्रेशर’ दोन्ही संघांवर होतं. पारडं इकडून तिकडे झुकत होतं. कॉमेण्ट्री करणाऱ्या भारताच्या अंजूम चोप्रा आणि पाकिस्तानच्या सना मीरमध्येही खटके उडाले, इतका ताण होताच; पण  खेळणारे दोन संघ मात्र सामना संपल्यावर एक वेगळं ‘क्रिकेट’ सांगत होते. ते होतं जंटलविमेन्स क्रिकेट.
आजही भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात मुलींनी क्रिकेट खेळणं इतकं सोपं नाही. त्यांच्या खेळण्याला कुणी गांभीर्याने घेत नाहीत.  पुरुष क्रिकेटसाठी उपलब्ध सुविधा  महिला क्रिकेटसाठी नाहीत आणि तरीही या मुली खेळतात. आता  आयसीसीने धोरणात्मक निर्णय म्हणूनही महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणं सुरू केलं आहे. 

 कोरड्या प्रोत्साहनाने गोष्टी बदलत नाहीत, त्या बदलतात सजग धोरणाने. पाकिस्तानसारख्या पुरुषवर्चस्ववादी देशातल्या क्रिकेट संघटनेनं स्वीकारलेल्या बदलामुळे कालच्या सामन्यातलं हृद्य दृश्य दिसू शकलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड-पीसीबीने संघाची कप्तान बिस्माहला १२ महिने पगारी मातृत्व रजा दिली. तिचा करार कायम राहील, असं आश्वासन दिलं. एवढंच नाही, तर न्यूझीलंड दौऱ्यावर जाताना आईला सोबत न्यायची परवानगी देऊन त्याचा खर्चही पीसीबीने उचलला. 
डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बिस्माह सांगते की, ‘एप्रिल २०२१ मध्ये मी ब्रेक घेतला. मला आई व्हायचं होतं. त्यानंतर आपलं क्रिकेट भवितव्य काय? असा प्रश्न मलाही होता. मी पीसीबी व्यवस्थापनाशी बोलले. प्रशिक्षक डेव्हिड हेम्प मला म्हणाले की, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आणि इंग्लंड देशात अनेक खेळाडू मातृत्व रजेनंतर मैदानात परततात, तुलाही जमेल. पीसीबीने जमवलं म्हणून मला जमलं नाही तर पाकिस्तानात आजही मूल नाही तर करिअर यापैकी बाईला काहीतरी एकच निवडावं लागतं..’
सुदैवानं बिस्माहला एकच निवडावं लागलं नाही. २००९ पासून ही खेळाडू विश्वचषक सामने खेळली आहे. २०० हून अधिक सामने खेळत  एकदिवसीय सामन्यात एक हजार धावा करणारी ती पहिली पाकिस्तानी खेळाडू. २०१३ आणि पुढे २०२० पासून ती कप्तान आहे. आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या अशा ‘ऑलराऊण्डर’ खेळाडूला पीसीबीने विश्वचषकापासून दूर केलं नाही. त्याचा परिणाम म्हणून काल-परवा व्हायरल झालेलं तिची लेक फातिमा आणि भारतीय संघाचं छायाचित्र-व्हिडिओ ही वेगळी ‘प्रेमाची’ कहाणी सांगू शकलं.

सचिन तेंडूलकरनेही ते छायाचित्र ट्विट करत लिहिलं, ‘मैदानात क्रिकेटला बाऊण्ड्री असतात; पण मैदानाबाहेर क्रिकेट साऱ्या बाऊण्ड्री तोडते.’ 
अशाच काही बाऊण्ड्री बिस्माह, पाकिस्तान संघ, व्यवस्थापन आणि भारतीय संघानेही सामन्यानंतर तोडल्या. ‘खेळ नव्हे युद्ध’ हेच बाजूला टाकून त्यांनी  परस्परांवर प्रेमाचा वर्षाव केला. बायकांच्या हाती सत्ता आली, त्या निर्णयप्रक्रियेत असल्या की, दगडी सरकारच्या निर्णयांना ‘मानवी’ चेहरा लाभतो, असा जगाचा ताजा अनुभव आहे.  विखार आणि वैर यापलिकडे जाऊन बहुसंख्य स्त्रिया जगणं आणि रुजणं प्राधान्यक्रमावर आणतात. भारत - पाकिस्तानच्या मावशांसोबत फातिमाचं हे छायाचित्र तरी वेगळं काय सांगतं?

Web Title: Cricket: It's a gentlewoman's game .... 6 months baby girl of pakistan captain and Indian Players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.