राजकारणातील गुन्हेगारी अन् नवी मुंबई! गुंडांचा बंदोबस्त करण्यात यश येईल?

By नारायण जाधव | Published: August 21, 2023 10:51 AM2023-08-21T10:51:43+5:302023-08-21T10:52:15+5:30

एका वक्तव्यानंतर नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत

Crime in politics and Navi Mumbai! Will it succeed in settling the gangsters? | राजकारणातील गुन्हेगारी अन् नवी मुंबई! गुंडांचा बंदोबस्त करण्यात यश येईल?

राजकारणातील गुन्हेगारी अन् नवी मुंबई! गुंडांचा बंदोबस्त करण्यात यश येईल?

googlenewsNext

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

नवी मुंबई शहरात ३० टक्के राजकारणी गुंड प्रवृत्तीचे असून व्हाइट कॉलर म्हणून वावरणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन माजी मंत्री आणि ऐरोलीचे विद्यमान आमदार गणेश नाईक अर्थात नवी मुंबईकरांचे लाडके दादा यांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबेसह बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, पनवेलचे प्रशांत ठाकुरांसह उरणचे महेश बालदी यांच्या साक्षीने केले. त्यांच्या वक्तव्यानंतर नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दादांच्या या आवाहनाचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. काहींना मिरच्या झोंबल्याने ते नाके मुरडत आहेत.

गणेशदादांनी पहिल्यांच असे वादळी वक्तव्य केलेले नाही. यापूर्वी त्यांनी हातभट्टीचे बळी टाळण्यासाठी देशीचे परवाने द्या, राज्यावरील कर्ज फेडण्यासाठी मुंबईतील मोकळ्या जागा, महालक्ष्मी रेसकोर्स विकण्यासह समुद्रात कृत्रिम बेट बांधा, अशा सूचना केल्या होत्या. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र, आज मुंबईतील मोकळ्या जागा झोपडपट्टीदादा, भूमाफियांनी घशात घातल्या आहेत. समुद्रात, खाडीत भराव टाकून झोपड्यांसह सी लिंक, कोस्टल रोड, बंदरे बांधली जात आहेत. हे चोरीचोरी, चुपकेचुपके समुद्रातील भराव टाकून बेट बांधून विकण्याचाच प्रकार आहे.

आताही त्यांनी नवी मुंबईतील ३० टक्के राजकारणी गुंड असल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता आर्थिक राजधानी मुंबई लगतचे ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरात एकेकाळी गुंडांचा बोलबाला होता. दादागिरी करणारे यातील अनेक जण पुढे आमदार, मंत्री झाले. कधीकाळी मुंबईत अरुण गवळी, ठाण्यात पिंट्या दादा, भिवंडीत जयंत सूर्यराव, उल्हासनगरला पप्पू कलानी, वसईला भाई ठाकूर यांचे साम्राज्य होते.

नवी मुंबईतही त्यांचे अनुयायी आहेत. किंबहुना एमआयडीसी, सिडको, जेएनपीटी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आल्यावर भौतिक सुब्बत्तेबरोबरच गुंडांची संख्या कैक पटीने वाढली. यातूनच शहरात सोमनाथ म्हात्रे, बबन पाटील, पप्पू सावंत, मीना मोरे, आनंद काळे, सुनील चौगुले अशा अनेक राजकीय हत्या, एपीएमसीचे सदस्य सचिव अण्णाराव तांभाळेंसारख्या अधिकाऱ्याच्या हत्येसह ऐरोलीत भंगारमाफियांनी पोलिसांचा बळी घेतला आहे. यात कथित माथाडी नेत्यांसह नवी मुंबईतील काही राजकीय नेत्यांकडे त्यावेळी संशयाची सुई वळली होती. अशाच गुन्हेगारांमधील काही जण आजही नवी मुंबईत दादा, भाई, अण्णा, नाना म्हणून वावरत आहेत. हेच लोक फेरीवाले, एमआयडीसीत वसुलीचे रॅकेट चालवत आहेत. यात मुक्तार अन्सारीला कधीकाळी दादांनीच अभय दिले होते.

...तरच गुंडांचा बंदोबस्त

  • नवी मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत एडीआरच्या रिपोर्टनुसार अर्ज भरलेल्या राष्ट्रवादीच्या १०१ पैकी १७, काँग्रेसच्या ८५ पैकी सात, शिवसेनेच्या ६१ पैकी ११ आणि भाजपचे ४२ पैकी पाच उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते.
  • आश्चर्याची बाब म्हणजे कुणाचा का दबाव असेना, दादांनीच राष्ट्रवादीच्या तिकीट वाटपात त्यांना तेव्हा प्राधान्य दिले होते. यावेळी अख्खी राष्ट्रवादीच भाजपवासी झालेली आहे.
  • भाजपमध्ये तर गुंड, आरोप असलेल्यांना पवित्र करून घेतले जात आहे. यामुळे नवी मुंबईतील ३० टक्के गुंडांचा बंदोबस्त करायचा असेल तर पक्षाच्या या धोरणाला फाटा देऊन गेल्या वेळी तिकीट दिलेल्यांच्या पेकाटात या खेपेला लाथ मारण्याची हिंमत दादांना दाखवावी लागेल. तरच पोलिस आयुक्त भारंबे हे राजकारणातील ३० टक्के गुंडांचा बंदोबस्त करू शकतील.

Web Title: Crime in politics and Navi Mumbai! Will it succeed in settling the gangsters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.