संगीत नाटकांचा मानदंड : सौभद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:38 AM2017-11-16T00:38:51+5:302017-11-16T00:39:55+5:30

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत... मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे.

 Criterion of musical plays: Sauhadhar | संगीत नाटकांचा मानदंड : सौभद्र

संगीत नाटकांचा मानदंड : सौभद्र

Next

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत...
मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे. यातूनच मराठी नाटकाचा उगमही झाला. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग करून मराठी रंगभूमीची सुरुवात केली. या मराठी रंगभूमीने नुकतेच ५ नोव्हेंबरला १७५ व्या वर्षात पदार्पण केले. संगीत हाच आत्मा असलेलं गद्य म्हणजे ‘संगीत नाटक’. नांदीनं प्रारंभ, भरतवाक्याचा सुरेल शेवट आणि दरम्यान ठिकठिकाणी पदं हे संगीत नाटकाचं बाह्यरूप. पूर्ण नाटकात संगीताचा अखंड प्रवाह वाहत राहणं, गद्याचा प्रभाव संगीतानंच वाढवणारं नाटक म्हणजे संगीत नाटक. या संगीत नाट्यपरंपरेतील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले ‘संगीत सौभद्र’ हे एक महत्त्वाचं नाटकं. त्याच्या पहिल्या प्रयोगास १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. पुण्यातील फरासखान्याजवळील पूर्णानंद नाट्यगृहात हा पहिला प्रयोग सादर झाला. ‘सौभद्र’ नाटक लिहून अण्णासाहेबांनी संगीत नाटक अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. आजतागायत सौभद्र नाटकाची, त्यातील पदांची मोहिनी मराठी रसिकांवर कायम आहे. म्हणूनच संगीत रंगभूमीच्या इतिहासात व वर्तमानातही या नाटकाचे मोल अधिक आहे.
‘सौभद्र’ हे संगीत नाटकाचा मानदंड ठरून एक नाट्यशैली म्हणून मान्य झाले. या नाटकाचे यश केवळ त्यातील संगीतावर निर्भर राहिलेले नाही, तर या नाटकातील पात्रांचे मानवी पातळीवरचे परस्परसंबंध, नातेसंबंध लोभसवाणे वाटतात. वरकरणी ही सुभद्रेच्या विवाहाची कथा. पण केवळ पुराणकाळातील कुणा एका सुभद्रेची विवाहकहाणी म्हणून ती राहत नाही, ती कुणाही मध्यमवर्गीय घरातील एखाद्या मुलीच्या विवाहाची कहाणी ठरते. दर्शनी पौराणिक कथानक घेऊनही तसे हे सामाजिक नाटक आहे. सुभद्रा, अर्जुन, कृष्ण, बलराम, रुक्मिणी, नारद इत्यादि परिचितांमधून ही कहाणी उभी राहिलेली आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग, संवाद, संघर्षबिंदू या साºया गोष्टी मराठी प्रेक्षकाला जवळच्या वाटल्याने आज इतक्या वर्षांनंतरही ‘सौभद्र’ नाटकाची रसिकप्रियता कमी झालेली नाही. अण्णासाहेब किर्लोस्कर आपण लिहिलेले नाटक रंगमंचावर कसे व्हावे यासाठी जे म्हणून काही करावे लागते ते जाणणारे होते. किर्लोस्कर कंपनीतील बाळकोबा नाटेकर तर पिढीजात गवई. यातील गीतांच्या चालींमध्ये पारंपरिकतेबरोबरच टप्पा, कर्नाटकी रागदारीप्रधानही पदं होती. ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’ या पदाची पूर्वीची लावणी ढंगाची चाल बदलून पुढे बालगंधर्वांनी ती भीमपलास रागात गायली. ‘वद जाऊ कुणाला’ या पदाच्या सध्याच्या ढंगाचं योगदान हिराबाई बडोदेकरांचे आहे. अशा अनेक कहाण्यांसह सुभद्रेची भूमिका बालगंधर्वांप्रमाणेच अनेकांनी स्त्रीपार्टी‘ नट तसेच गायक अभिनेत्रींनी अजरामर केली. तीनच कलावंतांचा समावेश असलेले त्रिपात्री सौभद्र नाटकाचा अनोखा प्रयोग लता व कीर्ती शिलेदार या भगिनींनी साकारला तसेच सौभद्रच्या पहिल्या प्रयोगास १२५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा ‘मराठी रंगभूमी’ पुणे संस्थेने पुढाकार घेऊन पुण्यातील पूर्णानंद थिएटर पासून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत रथयात्रा काढून सौभद्र नाटकाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवही साजरा केला. संगीत नाटकाबद्दल बोलताना प्रा. शिवाजीराव भोसले एकदा म्हणाले होते, ‘प्रत्यक्ष अनुभवाला येणारं ज्ञान, सामर्थ्य, अस्तित्व या गुणांचं कल्पनारूप संगीत नाटकाला मिळालं आहे. संगीत नाटक हे एक मनोनिर्मित पण मनोरम कल्पनाशिल्प आहे.’ संगीत सौभद्रचे स्मरणरंजन म्हणूनच महत्त्वाचे व हवेहवेसे आहे. 

- विजय बाविस्कर (vijay.baviskar@lokmat.com)

Web Title:  Criterion of musical plays: Sauhadhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.