कोकण रेल्वेसमोरील खडतर आव्हान !

By admin | Published: March 27, 2016 01:45 AM2016-03-27T01:45:01+5:302016-03-27T01:45:01+5:30

जम्मू व काश्मीरला जोडणारा दुवा म्हणजे चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेला सर्वांत उंच असा पूल. मात्र हा पूल बनविण्याचे खडतर आव्हान कोकण रेल्वेसमोर आहे.

Critical challenge ahead with Konkan Railway! | कोकण रेल्वेसमोरील खडतर आव्हान !

कोकण रेल्वेसमोरील खडतर आव्हान !

Next

प्रासंगिक : सुशांत मोरे

जम्मू व काश्मीरला जोडणारा दुवा म्हणजे चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेला सर्वांत उंच असा पूल. मात्र हा पूल बनविण्याचे खडतर आव्हान कोकण रेल्वेसमोर आहे. भूगर्भात होणाऱ्या हालचाली, प्रचंड प्रमाणात कोसळणारा पाऊस आणि थंडी यावर मात करत कोकण रेल्वेकडून जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच पूल बांधला जात आहे. या पुलाचे काम करतानाच १४ बोगदे तसेच काही छोटे पूल व रस्ते बांधण्याचे कामही कोकण रेल्वे करत आहे. मात्र काम करताना भूगर्भातील हालचालींच्या समस्या, आर्थिक अडथळे आणि पूल तसेच बोगद्यांच्या पुनर्रचनेमुळे २०१५ पर्यंत पूर्ण होणारे काम चांगलेच रेंगाळले. तरीही पुढील काही वर्षांत चिनाब पुलासह अन्य महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा निश्चय कोकण रेल्वेने केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास २० हजार कोटींची उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक योजना पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. ही योजना राबविण्यासाठी दुर्गम भागातील भौगोलिक स्थिती व समस्यांवर मात करतानाच तयार करण्यात येणारे बोगदे, पूल यांचे काम हे तीन संस्थांमध्ये विभागून देण्यात आले आहे. यात उत्तर रेल्वे व ‘इरकोन’ या कंपनीबरोबरच रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेलाही या योजनेत महत्त्वाचे काम दिले आहे. उधमपूर ते बारामुल्ला नवीन रेल्वेमार्ग जवळपास १ हजार ६७६ मिमी ब्रॉड गेज असेल. या योजनेतील बनिहाल ते बारामुल्ला आणि उधमपूर ते कटरा अशा पहिल्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. तर कटरा-रियासी-सलाल-संगलदान-धरम-बनिहाल या भागाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. याच भागात कटरा (जम्मू दिशेला) ते कौरी (श्रीनगर दिशेला)पर्यंत चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधण्याचे काम कोकण रेल्वेकडे सोपवण्यात आले आहे. चिनाब नदीच्या तळापासून जवळपास ३५९ मी. उंचीवर पूल बांधण्याचे हे मोठे शिवधनुष्य कोकण रेल्वेने पेलले आहे. साधारण २००२-०३ सालापासून पुलाच्या कामाला सुरुवात होऊनही पूल वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. काम करताना भूगर्भातील हालचालींचे होत असलेले अडथळे तसेच हवामानातील बदल आणि पुलाची झालेली पुनर्रचना यामुळे त्याचे काम वाढत जातानाच त्याची किंमतही वाढत गेल्याचे कोकण रेल्वेचे अधिकारी सांगतात. चिनाब पूल साधारणपणे २०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतानाच त्याची मुदत आता नव्याने २०१८-१९ अशी ठेवण्यात आली आहे. तर पुलाची मंजूर रक्कमही ५१२ कोटी रुपयांवरून १,२०० कोटी एवढी झाली आहे. चिनाब पुलाच्या कामावर गेली काही वर्षे मुख्य अभियंता आर.के. हेगडे हे देखरेख ठेवत आहेत. या कामाबाबत हेगडे यांनी पूल पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले. आयफेल टॉवर आणि कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेला पूल बांधताना हवामान आणि भूगर्भातील हालचालींचा मोठा अडसर ठरतो. भूकंपापासून कोणताही धोका या पुलाला होऊ नये, यासाठी सर्व शास्त्रीय दृष्टिकोनातूनही अभ्यास करण्यात आल्याची माहिती हेगडे यांनी दिली. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास १,५०० कर्मचारी-कामगार अहोरात्र काम करत आहेत. पूल बनल्यास जम्मू व काश्मीरला जोडणारा तो दुवाच असेल, अशी माहिती त्यांनी दिली. यात महत्त्वाची बाब म्हणजे पुलाला आधार देण्यासाठी कमान (आर्च) बांधण्यात येणार असून ही कमान बांधण्याचे आमच्यासमोर आव्हान असल्याचे हेगडे म्हणाले. या पुलाचा आर्च स्पॅन हा ४६७ मीटर एवढा असेल. आर्च स्पॅनचे काम पूर्ण झाल्यावर पुलाची अन्य किरकोळ कामे त्वरित पूर्ण केली जातील.

कोकण रेल्वेचे १४ बोगदे
या कामाबरोबरच १४ बोगदे तयार करण्याचे कामही कोकण रेल्वे करत असून यातील बारा बोगद्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. तर दोन बोगदे हे डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होतील. बोगद्यांची कामे करतानाही मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अडथळ्यांचा
सामना करावा लागत आहे.

१६ गावांमध्ये १२८ किलोमीटरचे रस्ते
बोगदे आणि चिनाब पूल बांधण्यासाठी लागणारे साहित्य त्या भागापर्यंत पोहोचणे गरजेचे होते. मात्र रस्त्यांची असलेली दुरवस्था पाहता तिथपर्यंत साहित्य पोहोचणे अशक्य होते. हे पाहता कोकण रेल्वेने १६ गावांमधून १२८ किलोमीटरचे रस्ते बांधले. महत्त्वाची बाब म्हणजे धरमकुंड या भागात असलेला जुनाट पुलावरून साहित्य नेणे कठीण असल्याने ४० टन वजन नेता येईल, अशा प्रकारचा नवीन पूल बांधण्याची किमयाही कोकण रेल्वेने साधली आहे.

आतापर्यंत २,८२९ कोटी खर्च : चिनाब पूल आणि बोगद्यांसह अन्य कामांसाठी २००२-०३ पासून आतापर्यंत कोकण रेल्वेने एकूण २ हजार ८२९ कोटी रुपये खर्च केले आहेत. २०१५-१६ मध्ये ४२२ कोटी ४० लाख रुपये खर्च केले. आता कोकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून आणखी ६ हजार १२७ कोटी रुपये मिळणार आहेत.

स्थानिकांना रोजगार : पूल आणि बोगद्याच्या कामात १६ पेक्षा अधिक गावांतील स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. काही स्थानिक कुशल कामगार बरीच वर्षे हे काम करत असल्याने त्यांना सामावून घेण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे.

भूकंप आणि दहशतवाद्यांपासून धोका नाही
चिनाब पूल आणि बनवण्यात येत असलेले बोगदे यांना भूकंपापासून कोणताही धोका नाही. ही दोन्ही कामे सुरू असलेल्या कटरा आणि कौरी परिसरात भूकंपाचे छोटे धक्के काही प्रमाणात बसत असतात. तरीही
त्यापासून न डगमगता हे काम सुरूच ठेवण्यात येते. पूल आणि बोगदे बनल्यानंतर ते सुरक्षित राहतील, अशी ग्वाही कोकण रेल्वेकडून देण्यात आली. त्यानुसार सर्व अभ्यास करूनच यंत्रणा राबविण्यात आली आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांपासूनही कोणता धोका
होऊ नये, यासाठीही खबरदारीचे उपाय कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहेत.
40
किलोग्रॅम स्फोटक जरी या पुलावर टाकण्यात आले तरी पुलाला फारसा धक्का न लागता यावरून ट्रेन धावू शकते, असा दावा कोकण रेल्वेकडून करण्यात आला आहे. सध्या पूल आणि बोगद्यांच्या सुरक्षेसाठी १३० जवान तैनात आहेत. तर चिनाब पुलाचे काम होत असल्याने त्याच्या दोन्ही बाजूला मिळून आठ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

Web Title: Critical challenge ahead with Konkan Railway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.