राजकीय पर्यावरणाचाही चिंताजनक ऱ्हास
By admin | Published: February 26, 2017 11:21 PM2017-02-26T23:21:04+5:302017-02-26T23:21:04+5:30
‘पर्यावरण’ हा शब्द संस्कृतमधील ‘परि’ (चहुबाजूंना) आणि ‘आवरण’ या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.
‘पर्यावरण’ हा शब्द संस्कृतमधील ‘परि’ (चहुबाजूंना) आणि ‘आवरण’ या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. थोडक्यात सांगायचे तर आपल्या आजूबाजूला जे काही आहे ते सर्व पर्यावरणामध्ये मोडते. यात निसर्ग तर आहेच, शिवाय समाज, संस्कृती व आपली जीवनशैलीही येते. खरे तर पृथ्वीचे आरोग्य आणि मानवी सभ्यता टिकून राहून ते अधिक उन्नत होण्यासाठी लागणाऱ्या सर्व तत्त्वांचे संरक्षण करणे म्हणजे पर्यावरण रक्षण, असा अर्थ आपण गृहीत धरायला हवा.
आपली भारतीय संस्कृती प्राचीन आणि प्रगल्भ अशी आहे. आपल्या संस्कृतीत धरतीला मातेचा दर्जा दिलेला आहे, वृक्षराजींची येथे पूजा केली जाते व जल, वायू आणि अग्नी या निसर्गतत्त्वांना देवतुल्य मानून त्यांची पूजा केली जाते. ‘वसुधैव कुटुंबकम’ हा संदेश आपल्या संस्कृतीची दूरदृष्टी पटविणारा आहे. संपूर्ण विश्वाला आपलेच कुटुंब मानण्याची आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. अशा देशात हल्लीच्या काळात जेव्हा सार्वजनिक जीवनात बेताल वाचाळपणा पाहायला मिळतो तेव्हा दु:ख होणे स्वाभाविक आहे. राजकारणाची हवा एवढी का बरं तापावी, काही समजेनासे होते. राजकीय हवामानाची चर्चा करण्याआधी जरा पृथ्वीची खबरबात घेऊ या. गेल्या १३५ वर्षांत पृथ्वीचे तपमान ०.८ अंश सेल्सिअसने वाढल्याचा निष्कर्ष ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी काढला आहे. याचे आणखी विश्लेषण केले तर असे दिसते की, यापैकी दोन तृतीयांश तपमानवाढ गेल्या अवघ्या ४० वर्षांत झाली आहे. राजकारणाकडे पाहिले तर मला तेथेही साधारणपणे असाच ‘ट्रेण्ड’ दिसतो. आपले राजकारण जगातील इतर बहुसंख्य देशांच्या तुलनेत शालीन असायचे. इंग्रजांच्या अनन्वित छळाविरुद्ध महात्मा गांधीजींनी पुकारलेला सत्याग्रह याहून शालीन राजकारणाचे जगात दुसरे उदाहरण नसेल. इतिहासाची पाने चाळून पाहिली तर दिसेल की, पंडित जवाहरलाल नेहरू व समाजवादाचे प्रवर्तक राम मनोहर लोहिया यांचे विचार दोन ध्रुवांप्रमाणे भिन्न होते. पण या दोघांनी कधी एकमेकांचा अपमान केला नाही की दुसऱ्याचे मन दुखावेल, असा शब्द उच्चारला नाही. वयाने ३५ वर्षांनी लहान असूनही अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी पंडित नेहरूंच्या मनात कमालीचा आदर होता. इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले व बांगलादेशाचा जन्म झाला तेव्हा अटलजींनी इंदिराजींना ‘दुर्गे’ची उपमा दिली. आणीबाणीच्या काळात इंदिराजींविरुद्ध जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण देशात जनजागृती केली. परंतु इंदिराजींनी कधी त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला नाही; मात्र सत्तेवर आल्यानंतर जनता पार्टीच्या सरकारने इंदिराजींची व्यक्तिगत निंदानालस्ती केली, त्यांना त्रास देऊन आपले खुजेपण दाखविले तेव्हा जनतेने अवघ्या पावणेतीन वर्षांत जनता सरकारला सत्तेवरून खाली उतरविले. याचे कारण असे होते की, भारतीय जनतेला व्यक्तिगत हल्ले व निंदानालस्ती पसंत नाही. मला राजकारणाचा फार जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली. माझे बाबूजी, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा काँग्रेसमध्ये होते. पण आमच्या घरी सर्वच पक्षांच्या नेत्यांचे येणे-जाणे असायचे, हे मी पाहिले. राजकीय व वैचारिकदृष्ट्या परस्परांचे घोर विरोधी असूनही बाबूजी आणि या नेत्यांमध्ये नेहमीच शालीन भाषेत बोलणे व्हायचे व प्रत्येकाच्या व्यक्तित्वाच्या वेगळेपणाचा आदर केला जायचा, हे मी अनुभवले. बाबूजी म्हणायचे, वैचारिक मतभेद होणारच; पण मनभेद कधीही होऊ देता कामा नये. एखाद्याच्या विचारसरणीवर टीका केली जाऊ शकते. पण त्यासाठी भाषा अशी वापरावी की, आपले म्हणणेही मांडले जावे; पण समोरच्याचे मनही दुखावले जाऊ नये. मी १८ वर्षे राज्यसभेचा सदस्य होतोे व या काळात मी शेकडो मुद्द्यांवर माझी मते मांडली. इतरांवर प्रसंगी टीकाही केली. पण ज्याने दुसऱ्याचा अपमान होईल असे वक्तव्य माझ्याकडून केले गेल्याचा एकही प्रसंग मला आठवत नाही. वडिलांनी हेच संस्कार माझ्यावर केले; मात्र सध्याच्या काळात राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांनी मी फार चिंतित आहे. राजकारणाची भाषा एवढी कडू व्हावी याने केवळ मीच नव्हे तर संपूर्ण देशालाही चिंता लागली आहे. एकमेकांच्या अबू्रची लक्तरे वेशीवर टांगण्याची हल्ली जणू या नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसते. यापैकी काही नेत्यांनी केलेली काही वक्तव्ये येथे वाचकांसमोर मांडायचाही मला संकोच वाटतो. कोणी विरोधी पक्षाच्या नावाचा नवा अर्थ शोधत आहे, कोणी कोणाच्या तरी कौमार्यावर शंका घेत आहे तर आणखी काही जण इतर कोणाचे डोके ठिकाणावर नसल्याचे सांगत आहे. फार विचित्र परिस्थिती आहे.
खरं सांगायचं तर राजकारणाचे सर्व पर्यावरणच बिघडल्यासारखे वाटतेय. समाजमाध्यमांमध्ये परस्परांच्या चारित्र्यहननाचे एक वेगळेच युद्ध सुरू आहे. यासाठी राजकीय पक्षांसोबत अनेत तज्ज्ञांचे समूह कार्यरत आहेत. तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जे काही घडले ते निकोप लोकशाहीसाठी योग्य म्हणायचे का? विधानसभेत अध्यक्षांचा अंगरखा फाडणे हा माझ्या मते आमदारांवर मोठा कलंक आहे. यापूर्वी इतरही काही राज्यांमध्ये असे किळसवाणे प्रकार घडलेले आहेत. देशाच्या लोकशाहीचे भले व्हावे असे वाटत असेल तर सर्वच पक्षांच्या लोकांनी एकत्र बसून भाषेचा स्तर काय असावा यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे संपूर्ण श्रेय केवळ राज्याचे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी चांगली कामे केली त्यावर मतदारांनी या निवडणुकांमध्ये पसंतीची मोहोर उमटवली. फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळेच भाजपाला शिवसेनेची घट्ट पाळेमुळे हलविणे शक्य झाले. त्यांनी निवडणूक प्रचारात केलेला हल्ला प्रशंसनीय होता. सत्तेत असतानाही काँग्रेसला हे करणे कधी जमले नाही. खरे तर मुंबई महापालिकेत भाजपा १००चा आकडाही पार करू शकली असती. परंतु पक्षातीलच काही जणांना ते नको होते ! पक्षातील घरभेद्यांनी बेईमानी केली नसती तर बृहन्मुंबई महापालिकेत भाजपाला शिवसेनेहून जास्त जागा जिंकणे सहज शक्य झाले असते. कुशल रणनीतिकार फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील दिग्गज भाजपा नेते नितीन गडकरी यांचे भरपूर आशीर्वाद व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची संपूर्ण साथ मिळाली. हे आशीर्वादही कामाला आले. या निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत झाले. लागोपाठ निवडणुकांमध्ये दारुण पराभव होऊनही काँग्रेस नेते त्यावरून धडा घेताना दिसत नाहीत. काँग्रेस दिवसेंदिवस दुबळी होत आहे व काँग्रेस नेत्यांमध्ये काही बदल होताना दिसत नाही, हे दुर्दैवी आहे.
-विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)