टीका हा तर लोकशाहीचा आत्मा!
By विजय दर्डा | Published: April 10, 2023 07:15 AM2023-04-10T07:15:21+5:302023-04-10T07:15:33+5:30
सत्तापक्षावर टीका करणे याचा अर्थ देशाला विरोध करणे असा नव्हे, हे सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले मत महत्त्वपूर्ण आहे!
डाॅ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
सत्तापक्षावर टीका करणे याचा अर्थ देशाला विरोध करणे असा नव्हे, हे सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले मत महत्त्वपूर्ण आहे!
भारत, अमेरिका, चीन, रशिया, अरब देश किंवा त्या प्रकारच्या अन्य देशांत काय फरक आहे? फरक आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दिसू शकतो. या देशांची आर्थिक शक्ती, लष्करी ताकद किंवा जनजीवनाची परिस्थिती लक्षात घेऊन व्याख्या करता येऊ शकते. परंतु, माझ्या मते, ‘लोकशाही असणे’ किंवा ‘नसणे’ ही या व्याख्येतली सर्वांत कळीची गोष्ट होय. भारत किंवा अमेरिकेत आपण आपल्या मनात जे असेल ते बोलू शकतो. देश किंवा राज्यातल्या सरकारशी आपला एखाद्या मुद्द्यावरून मतभेद असेल, तर तो आपण जाहीर करू शकतो. परंतु, चीन, रशिया, अरब देश किंवा हुकूमशाही सत्तापद्धत असलेल्या आफ्रिकी देशांमध्ये तुम्ही तुमच्या मनातले बोलाल, तर तुरुंगात जाल; किंवा गुपचूप तुम्हाला अशा ठिकाणी पाठविले जाईल की कुणाला पत्ताही लागणार नाही.
‘टीका’ हा लोकशाहीचा खरा प्राण, आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाने हेच सत्य पुन्हा एकदा स्थापित केले आहे.
मल्याळम भाषेतील एका टीव्ही वाहिनीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रतिबंध लावले गेले होते. केरळ उच्च न्यायालयाने सरकारच्या या आदेशास वैध ठरवले; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठाने तो आदेश अवैध ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की सत्य मांडणे हे माध्यमांचे कर्तव्यच आहे. कटू असली तरी माध्यमांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे. असे झाले तरच लोकशाहीला बळकट करणारे पर्याय त्यांना निवडता येतील. सामाजिक, आर्थिक, राजकारणापासून विविध विचारप्रणालींपर्यंत सगळीकडे एकसाची विचार असतील तर हा लोकशाहीला धोका होय! राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाने नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करता येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेचे दावे हवेत करता येणार नाहीत. ते सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे लागतील़!- सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या या सर्व मुद्द्यांचे मी अंत:करणपूर्वक स्वागत करतो.
मानवी संस्कृतीच्या विकासयात्रेच्या इतिहासात मी वाचले होते की टीकात्मक चिंतनामुळेच मनुष्य ही यात्रा करू शकला. चिंतनात स्वाभाविकपणे अनेक विचार प्रकट होतात. या विचारांचे विश्लेषण आपल्याला नवा रस्ता दाखवते. आपलीच विचारधारा सर्वांत चांगली आहे, असे एखाद्या माणसाने म्हटले तर जीवनात नवे विचार कसे उत्पन्न होतील? इतके सगळे धर्म, इतक्या सगळ्या परंपरा आणि इतक्या संस्कृतींच्या जन्माच्या मुळाशी विचारांची भिन्नताच आहे.
भारतात जवळपास १४० कोटी लोक आहेत. इतक्या सगळ्या लोकांचे विचार, श्रद्धा एकसारख्या कशा असू शकतील? आणि तसे समजा झाले, तर ती किती धोकादायक गोष्ट असेल! आपल्याकडे एक म्हण आहे : प्रत्येक १०-२० कोसांवर भाषा, वेशभूषा आणि बोली बदलत जातात. सर्वांचे आपले आपले विचार असतात आणि एकत्रित स्वरूपात तेच देशाला बळ पुरवत असतात.
भारतीय लोकशाहीच्या विचारयात्रेत वाद-विवादांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी आणीबाणी लावण्याची गरज आहे, असे इंदिरा गांधीना वाटले परंतु जनतेने त्यांचा हा विचार पूर्णपणे बाजूला सारला. ए. आर. अंतुले आणि जगन्नाथ मिश्रा यांनी टीकेचे स्वर रोखण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण देशात आंदोलन पसरले; कारण विचारांवर बंदी लादण्याचा साधा अर्थ लोकशाहीला कुलूप ठोकणे होय.
स्वातंत्र्य आंदोलनातले नेते या गोष्टी जाणून होते. त्यामुळे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य दिले. वृत्तपत्रांना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात एक प्रसंग मला आठवतो. पंडित नेहरूंच्या वाढदिवसानिमित्त हरिवंशराय बच्चन यांनी एक कविसंमेलन आयोजित केले होते. बच्चनजींना भेटायला त्याचवेळी जनकवी बाबा नागार्जुनही आले. इंदिराजींनी त्यांनाही कविसंमेलनाचे आमंत्रण दिले. पण नागार्जुन म्हणाले, ‘इंदू, माझ्या कविता तुझे वडील ऐकू शकणार नाहीत.’ इंदिराजी म्हणाल्या, ‘आपण जरूर या, ते नक्की ऐकतील.’
- त्या कविसंमेलनात बाबा नागार्जुन यांनी नेहरूंवर कठोर टीका करणाऱ्या कविता वाचल्या आणि कमाल म्हणजे नेहरूजींनी शांतपणे त्या कविता ऐकल्याही. वास्तवात या कविता सत्तेच्या विरुद्ध जनआक्रोशाची अभिव्यक्तीच होती. या आक्रोशाला शब्द देण्याचे काम अखेर कुणी कवी, शायर, लेखकच करील ना! हे टीकेचे स्वर अखेर माध्यमेच समाजापुढे मांडतील ना!मला एक घटना आठवते. लोकमत टाइम्सच्या उद्घाटनासाठी ए. आर. अंतुले औरंगाबादला (आता छत्रपती संभाजीनगर) आले होते. नेमके त्याच दिवशी “लोकमतने अंतुले यांच्यावर एक व्यंगचित्र छापले. अंतुले आधी नाराज झाले; परंतु नंतर शांतही झाले. त्यावेळी अंतुलेंच्या मंत्रिमंडळात माझे वडील श्री. जवाहरलाल दर्डा उद्योगमंत्री होते. त्याआधी आणिबाणीच्या विरुद्ध लोकमतने काही बातम्या छापल्या तेव्हा लोकांनी इंदिराजींकडे तक्रार केली.
इंदिराजींनी माझ्या बाबूजींना विचारले, ‘लोकमत हे काय करत आहे?’ बाबूजींनी अत्यंत शालीनतापूर्वक उत्तर दिले, ‘लोकमत वर्तमानपत्राची भूमिका बजावत आहे.’
- कोणत्याही परिस्थितीत टीकेचा प्रत्येक स्वर हा शालीनच असला पाहिजे. एकमेकांबद्दल कुठलाही वैरभाव असता कामा नये. आणि हो, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे देशाच्या विरोधात बोलणे नव्हे! त्याबाबतीत मर्यादेची एक रेषा नक्कीच असली पाहिजे.
सत्तेवर भले कोणीही असेल, आपण एका ठरलेल्या वेळेपुरते रखवालदार आहोत, हे त्याने समजून असले पाहिजे. देशाची खरी सत्ता जनतेच्या हातात असते. टीकेचा अधिकार लोकांकडे आहे. लोकशाहीची हीच ताकद आहे. आपल्या लोकशाहीचा अभिमान बाळगा. लोकशाहीला धक्का लागेल असे कोणतेही काम कुणीही करता कामा नये!