क्रशिंग ब्लो की ब्लशिंग क्रो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 08:03 AM2021-09-04T08:03:43+5:302021-09-04T08:04:50+5:30

घाईगडबड, निष्काळजीपणा किंवा थकव्यामुळे गफलत होऊन वाक्यातील जवळपासच्या दोन स्वरांची किंवा व्यंजनांची अदलाबदल होते तेव्हा...

Crushing Blow's Blushing Crow? pdc | क्रशिंग ब्लो की ब्लशिंग क्रो?

क्रशिंग ब्लो की ब्लशिंग क्रो?

Next

- शशी थरुर

मी जवळजवळ विसरूनच गेलो होतो की, २२ जुलैला रेव्हरंड विल्यम आर्किबाल्ड स्पूनर यांची १७७वी जयंती होती. ते ऑक्सफर्ड  विद्यापीठात प्राध्यापक आणि धर्मोपदेशकही होते. इंग्लिश भाषेतील सर्वात  मजेदार गफलतींना अगदी अहेतुकपणे त्यांनी  आपले नाव बहाल केले आहे. गेली सव्वाशे वर्षे या गफलती  स्पूनरिझम्स म्हणूनच ओळखल्या जातात.

रेव्हरंड स्पूनर हे काहीसे विचलचित्त असत. त्यांचे  भवतालाचे भान बऱ्याचदा हरपलेले असे. त्यामुळे वाक्यातील जवळपासच्या दोन स्वरांची किंवा व्यंजनांची त्यांच्या तोंडून बऱ्याचदा अदलाबदल होई. एकदा आपल्या भाषणात ‘The rate of wages will press hard upon the employer.’ (वेतनाच्या या दराचा मालकवर्गावर मोठा ताण पडेल.) असे म्हणायचे असताना ते म्हणाले, ‘The weight of rages will press hard upon the employer.’ ) क्रोधाच्या अशा जोरदार आविष्काराचा मालकांवर मोठाच ताण पडेल!) Conquering kings हा एका प्रसिद्ध ईशस्तोत्रातील शब्दप्रयोग त्यांनी Kingering Congs असा उच्चारला.

खरे म्हणजे शब्दारंभाच्या अदलाबदलीची अशी वाक्ये  प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून येत असत  असे साक्षीपुराव्यानिशी म्हणता येईल, अशी ही दोनच उदाहरणे उपलब्ध आहेत. परंतु ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांच्या तासाला आणि प्रवचनांना उपस्थित राहणाऱ्या  खट्याळ विद्यार्थ्यांनी आपण स्वतःच घडवलेल्या स्पूनरिझमचा जणू एक  लघुउद्योगच चालवून  त्यांच्या  या अपकीर्तीचा सर्वदूर प्रसार केला.हे सारे स्पूनरिझम्स त्या विचलचित्त प्राध्यापकाकडून झालेले अहेतुक शब्दबदल नव्हते. ते निव्वळ विनोदनिर्मितीसाठी इतरांनी जाणीवपूर्वक घडविलेले होते. त्यातला एक सर्वाधिक प्रसिद्धी पावला. कारण तो अगदी शक्य कोटीतलाही होता आणि कमालीचा हास्यस्फोटकही होता.

राणी व्हिक्टोरियाला दिलेल्या एका मेजवानीप्रसंगी टोस्टनिदर्शक (सदिच्छा मद्यपान) प्याला उंचावताना, “Three cheers to our dear old queen!” असे म्हणत उपस्थितांना मद्यपानाचे आवाहन करण्याऐवजी रेव्हरंड स्पूनर म्हणाले, “Three cheers to our queer old dean!”  आणखी एका प्रसंगी या आमच्या धर्मगुरूंनी “The Lord is a loving shepherd.” असे म्हणावयाचे असताना “The Lord is a shoving leopard.” असे उद्गार काढले. (देवाला प्रेमळ मेंढपाळ बनविण्याऐवजी त्यांनी चक्क जोराचा रेटा देणारा बिबळ्या करून टाकले.)  या स्पूनरसाहेबांना एका लग्नात वधूवरांना विचारावयाचे होते,  “Is it customary to kiss the bride?” प्रत्यक्षात त्यांनी विचारले म्हणे, “Is it kisstomary to cuss the bride?” (वधूचे चुंबन घेण्याची पद्धत तुमच्यात आहे का असे न विचारता वधूला शाप देण्याची पद्धत आहे का, असे ते विचारते झाले.) - अशा अनेक कथा विद्यार्थ्यांनी स्वतःच प्रसवल्या व प्रसृत केल्या. एकदा ते crushing blow (सणसणीत तडाखा) न म्हणता blushing crow ( लाजणारा कावळा) म्हणाले. cosy little nook (कोपऱ्यातील निवांत आरामशीर जागा) त्यांच्या मुखातून येताना nosey little cook (बारकुली चोंबडी आचारी) बनून आली. अशा खूपच.

खरं सांगायच तर स्पूनरिझम म्हणून प्रख्यात असलेले हे बहुतेक सारे शब्दप्रयोग म्हणजे अविश्वासार्ह वदंता आहेत. हे सारे स्पूनरनेच म्हटले असे खात्रीलायकरीत्या मुळीच म्हणता येणार नाही.  या साऱ्या घडविलेल्या, बेतलेल्या स्पूनरिझम्सचे उगमस्थान ऑक्सफर्ड हेच आहे हे त्यांच्या आशयातूनच स्पष्ट होते. रेव्हरंड साहेबांना “Is the Dean busy?” (अधिष्ठातासाहेब कामात आहेत का?) हे पाहावयाचे असते तेव्हा ते “Is the bean dizzy?” (कॉफीचे बी भोवळलेय का?) असा प्रश्न विचारतात. कॉलेजच्या चौकात कुणा विशिष्ट विद्यार्थ्यानेच जाळ केल्याचे त्यांना त्या विद्यार्थ्याला रागाने सांगायचे असते तेव्हा, “You were lighting a fire in the quadrangle.” असे म्हणण्याऐवजी ते म्हणतात, “You were fighting a liar in the quadrangle.”  ( तू एका खोटारड्याशी चौकात मारामारी करीत होतास.) 

या सगळ्यात हास्यस्फोटक किस्सा असा. एका विद्यार्थ्याने सगळे तास चुकविल्यामुळे स्पूनर सर फारच रागावले होते. ते त्याला म्हणाले, “You have hissed all my mystery lectures. You have tasted a whole worm. Please leave Oxford on the next town drain.” त्यांना म्हणावयाचे होते, “You have missed all my history lectures. You have wasted a whole term. Please leave Oxford on the next down train.” स्पूनरिझम ही विनोदाची खाणच असते, यातच त्याची खरी मजा आहे.

समजा एखादे grilled cheese sandwich अगदीच खराब झालेय. मग त्याला chilled grease sandwich म्हणण्यात चुरचुरीत गंमत ही आहे आणि सत्यदर्शनसुद्धा. वॉशिंग्टनमध्ये Capitol Steps या नावाचा एक राजकीय प्रहसने सादर करणारा ग्रुप आहे.  अमेरिकन निवडणुकीचे वर्णन त्यांनी picking their leaders ऐवजी Licking their Peaders असे केले होते. हल्लीच इंटरनेटवरच मला आढळले की ब्रायन पी. क्लिअरी या कवीने Translation या आपल्या कवितेत एका मुलाचे वर्णन केले आहे. हा मुलगा बोलताना सतत स्पूनरिझमच्या गफलती करीत असतो. I took a shower म्हणण्याऐवजी तो I shook a tower असे म्हणतो. या कवितेच्या अखेरीस वापरलेला spoonerism अफलातून आहे. 

ते शेवटचे कडवे असे :
He once proclaimed, “Hey, belly jeans’ 
When he found a stash of jelly beans. 
But when he says he ‘pepped in stew’ 
We will tell him he should wipe his shoe. 

लेखकाच्या अनुमतीने प्रकाशित, 
मूळ इंग्रजी लेख : खलीज टाइम्स
मराठी अनुवाद : अनंत घोटगाळकर

Web Title: Crushing Blow's Blushing Crow? pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.