समाजमनातील अस्वस्थतेचे हुंकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 07:00 PM2020-02-07T19:00:32+5:302020-02-07T19:03:22+5:30
एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, हत्या, आत्महत्या यासंबंधी नेहमी चर्चा होत असते
मिलिंद कुलकर्णी
हिंगणघाटातील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून भररस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न, जळगावातील मानसी बागडे या तरुणीने समाजात घेतले जात नाही आणि त्यामुळे विवाह होत नसल्याने केलेली आत्महत्या, वयोवृध्द आईला घरात डांबून बाहेरगावी निघून गेलेले दोंडाईचातील निवृत्त मुख्याध्यापकाचे कृत्य...या आणि अशा प्रकारच्या सगळ्या घटना समाजमन घुसळून टाकणाऱ्या आहेत. हिंगणघाट, वर्ध्यात रोज निषेधाचे मोर्चे निघत आहेत. मानसी बागडे हिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाºया कंजरभाट समाजातील पंच, आजोबा या नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पहिल्या दिवसापासून या प्रकरणात लक्ष घातले असून प्रशासकीय कार्यवाहीकडे डोळ्यात तेल घालून निरीक्षण, पर्यवेक्षण केले जात आहे.
या घटना का घडल्या, त्यांच्या कारणांचा शोध, आरोपी व्यक्ती, समूहाची मानसिकता, अनिष्ट रुढी व परंपरांचा असलेला बोजा अशा वेगवेगळ्या मुद्यांवर आता विचारमंथन सुरु आहे. या चिंतन, मनन आणि मंथनाचे स्वागत करायला हवे. निकोप समाजासाठी अशा चर्चेची आवश्यकता आहेच. जेवढ्या खुलेपणाने, मोकळेपणाने ही चर्चा होईल, त्यात समाजातील सर्व घटक सहभागी होतील, तेवढे त्या चर्चेतून निघणारे नवनीत म्हणजे निष्कर्ष हे समाजोपयोगी असे राहतील.
एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, हत्या, आत्महत्या यासंबंधी नेहमी चर्चा होत असते. बहुसंख्य मंडळींचा आक्षेप हा चित्रपट, दूरचित्रवाहिनीवरील मालिकांवर असतो. तेथे अशा गोष्टी वारंवार दाखविल्या जातात, त्याचा प्रभाव समाजावर होत असतो, असा आक्षेप घेणाºया मंडळींचा दावा असतो. त्यात तथ्य असेलही. पण पूर्णत: दोष मनोरंजन करणाºया माध्यमांना देता येणार नाही. ‘कीर्तनाने समाज घडत नाही आणि तमाशाने बिघडत नाही’ असे जे म्हटले जाते, त्यात तथ्य आहे. सभोवताली असे प्रकार घडत असताना समाज म्हणून आम्ही मूकदर्शक राहतो, हे मान्य करायला हवे. केवळ दुसºयाकडे बोट दाखवून आपली दोषारोपातून सुटका होणार नाही, हे समाजातील सर्वच घटकांनी लक्षात घ्यायला हवे. शाळकरी मुलांवर संस्कार नाही, उद्याने, मोकळ्या जागा, आडोशाच्या जागांच्याठिकाणी नको त्या गोष्टी सुरु असतात असा सर्वसाधारण चर्चेचा सूर असतो. पोलिसांनी लक्ष द्यायला हवे, निर्भया पथक काय करते, मुलांचे पालक केवळ नोकरी-व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करतात, मुलांकडे लक्ष नसते असा लोकमानसातील सूर असतो. असा प्रकार घडत असेल तर जबाबदार नागरिक म्हणून आम्ही ते रोखणार नाही का? एकट्याला शक्य नसेल, दोन-पाच व्यक्ती जमवून आम्ही अशा गोष्टींना अटकाव करु शकतो. मुळात तसे करण्याची इच्छाशक्ती हवी. ‘मला काय त्याचे’ अशी बेपर्वावृत्ती धोकेदायक असून अशी वृत्ती असणाऱ्यांचे प्रमाण समाजात वाढत आहे. असा प्रकार आपल्यासोबत किंवा कुटुंबियांसोबत घडला तर मात्र आम्हाला समाजाची मदत अपेक्षित असते. माणुसकी लयाला गेली हो, असा कंठशोष तेव्हा आम्ही करतो. परंतु, दु:खिताच्या, पीडिताच्या जागी स्वत:ला कल्पून आम्ही धावून जायला हवे. परोपकार हा तर आमच्या अध्यात्माचा, संतांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा आहे. दुर्देवाने हा विचार केवळ पुस्तक, कीर्तन आणि भाषणापुरती उरला आहे, व्यवहारात आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.
मानसी बागडे या तरुणीने समाजाच्या अशाच प्रवृत्तीला कंटाळून अखेर जीवनयात्रा संपवली. सर्वसामान्य मुलीसारखे तिचे भावविश्व होते. संसार थाटावा, कुटुंब फुलावे, अशी छोटी अपेक्षा तिची होती. तिचा गुन्हा काय, का तिला आत्महत्या करायला भाग पाडले गेले, या प्रश्नांनी सुन्न व्हायला होते. आई-वडिलांनी आंतरधर्मीय विवाह केला. वडिलांचे नाव लावले, मात्र त्यांनी नंतर स्वजातीय महिलेशी दुसरे लग्न केल्याने मानसी व तिच्या कुटुंबियात अंतर आले. वडिलांच्या जातीने स्विकारले नाही. स्वत: आजोबा पंच होते. विवाह निश्चित होत असताना जात पंचायतीने आडमुठी भूमिका घेतली आणि तिचे भावविश्व उध्वस्त झाले.
तिकडे दोंडाईचाला वयोवृध्द आईला घरात डांबून निवृत्त मुख्याध्यापक व त्यांची पत्नी दोन दिवस बाहेरगावी निघून गेले. शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर आजीबार्इंची सुटका झाली. किती भीषण घटना आहे. मुलाच्या जन्मासाठी आग्रह धरणाºया समाजाच्या कानशीलात लगावणारी ही घटना आहे. कुठल्या थराला आम्ही जातोय, हे पाहून थरकाप उडतो. वेळीच हे रोखले गेले नाही तर ‘मी माझे’ करणाºया प्रत्येकाच्या दारापर्यंत अशा घटना टकटक करत येतील, हे लक्षात घ्यायला हवे.