सांस्कृतिक संशोधन पोरके झाले!

By admin | Published: July 2, 2016 05:36 AM2016-07-02T05:36:00+5:302016-07-02T05:36:00+5:30

ज्येष्ठ संशोधक, समीक्षक, लेखक, विचारवंत व प्रेमळ हृदयी शिक्षक प्रा. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या निधनाने सांस्कृतिक संशोधनाचे क्षेत्र पोरके झाले

Cultural research became inferior! | सांस्कृतिक संशोधन पोरके झाले!

सांस्कृतिक संशोधन पोरके झाले!

Next


साहित्य, संस्कृती, इतिहास, मानववंशशास्त्र, वारसा आणि लोकजीवन या साऱ्यांच्या तळापर्यंत जाऊन सत्याचा शोध घेणारे आणि त्याविषयीची व्यापक जाण समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे ज्येष्ठ संशोधक, समीक्षक, लेखक, विचारवंत व प्रेमळ हृदयी शिक्षक प्रा. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या निधनाने सांस्कृतिक संशोधनाचे क्षेत्र पोरके झाले आहे. गेले काही दिवस अंथरुणाला खिळले असण्याच्या काळातही त्यांची संशोधक दृष्टी व वृत्ती पूर्वीएवढीच तल्लख व तजेलदार होती. त्याही काळात श्री बालाजी या दैवताचे मूळ, वाढ व विकास यांचा वेध घेण्यात ते गुंतले होते. सारे आयुष्य देशभरातील प्राचीन मंदिरांचा, त्यातील चित्रविचित्र मूर्तींचा आणि त्यामागे दडलेल्या गूढ अर्थांचा शोध घेणारे ढेरे आपले अध्ययन खात्रीपूर्वक पूर्ण केल्याखेरीज त्याविषयी लिहिण्याचे टाळत. तरीही त्यांची ग्रंथसंपदा मोठी व कोणत्याही चांगल्या अभ्यासकाला दिपवून टाकणारी आहे. जे डोळ््यांना दिसते व अनुभवाला येते त्याहूनही न दिसणारे व प्रत्यक्ष अनुभवाला न येणारे जग मोठे आहे आणि त्याचे आयुष्यही वर्तमानाहून मोठे आहे. हे अज्ञाताचे जग कोणा ईश्वरा-परमेश्वराचे नसून ते केवळ आपल्याला अज्ञात आहे ही त्यांची धारणा होती व या अज्ञाताला ज्ञाताच्या जगतात आणणे ही त्यांची प्रेरणा होती. आजच्या वर्तमानाची व उद्याच्या भविष्याची सगळी उत्तरेही या न दिसणाऱ्या अज्ञात जगात दडली आहेत असा ध्यास घेणारे व त्या जगाचा शोध घेणारे रा.चिं. सर साऱ्या महाराष्ट्राच्या अभिमानाएवढेच अभिवादनाचेही ऋषीतुल्य विषय होते. आचार्य विनोबा, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, दुर्गाबाई, इरावती कर्वे, दामोदर कोसंबी आणि नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या निर्लेप व मर्मग्राही संशोधक समीक्षकांची दृष्टी असलेल्या रा.चिं.नी ‘श्री विठ्ठल एक महासमन्वय’ हा ग्रंथ सिद्ध करून पंढरीच्या विठोबाच्या जन्मकुळाचा, प्रवासाचा आणि त्याच्या पंढरीत स्थायिक होण्याचा समग्र इतिहासच महाराष्ट्राला सांगितला. त्यांच्या संशोधनयात्रेतील महत्त्वाचे टप्पे ‘चक्रपाणी’ ते ‘लज्जागौरी’, ‘श्री विठ्ठल एक महासमन्वय’ ते ‘शिखर शिंगणापूरची शोधयात्रा’ असे सांगता येतील. आपल्या चक्रपाणी या ग्रंथात त्यांनी एका नव्या व अपरिचित ऐतिहासिक जगाला स्पर्श केला. १३ व्या शतकातील धर्मसंप्रदाय, धर्मेतिहास आणि वाङमय या साऱ्यांविषयी नव्याने विचार करायला त्यांनी आपल्या वाचकांना प्रवृत्त केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा व लोकजीवनाचा संबंध उत्तरेशी कमी व दक्षिण भारताशी अधिक असल्याचेही त्यात त्यांनी नोंदविले. श्री विठ्ठल एक महासमन्वयमध्येही या संबंधांचा उलगडा त्यांनी कमालीच्या विस्ताराने व सप्रमाण केला. लज्जागौरी या त्यांच्या ग्रंथाला साऱ्या जगात मान्यता मिळाली. भारतातच नव्हे तर साऱ्या जगात आढळणाऱ्या योनीमातृकांकडे मातृदेवता म्हणून नव्याने व आदराने सृजनाच्या देवता म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांनी अभ्यासकांना दिली. मंदिरे, मूर्ती व स्मारके या साऱ्यांमागे केवळ मानवी व्यवहार वा पराक्रम दडला नसून समाजाची श्रद्धादृष्टीही त्यामागे असते. या दोहोंचा वेगळा अभ्यास होण्याची व त्यातून ऐतिहासिक सत्यापर्यंत जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. हा सारा व्यासंग त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत सन्मानाने उभे राहून केला. साऱ्या वाङ्मयीन प्रवाहांपासून दूर व तटस्थ राहिलेल्या रा.चिं.समोर त्यांच्या कर्तृत्वाखातर सारे प्रवाहमात्र नम्र झालेले महाराष्ट्राने पाहिले. सरकार, साहित्य संस्था, वाचक आणि सांस्कृतिक संस्था त्यांच्या सन्मानासाठी अहमहमिकेने पुढे आल्या. त्यांनी रा.चिं.च्या पुरस्कारांचे व सन्मानांचे सोहळे उभे केले. मात्र या साऱ्या सन्मानांमुळे रा.चिं.ची अभ्यासू वृत्ती जराही विचलित झाली नाही आणि त्यांना अहंतेनेही कुठे स्पर्श केला नाही. संशोधनाच्या कार्यात गढले असताना संशोधित सत्य आणि लोकश्रद्धा यात विसंगती आढळली की ते संशोधनाच्या बाजूने उभे राहायचे. त्यांच्या संशोधनाविषयी मतभेद असणारे व त्यांच्यावर टीका करणारेही अनेकजण होते. मात्र त्यातल्या कोणालाही त्यांची अभ्यासू वृत्ती व संशोधकीय नजर याविषयी वाद करता आला नाही. रा.चिं.चे अध्ययन बहुआयामी होते. इतिहास, सांस्कृतिक मानववंशशास्त्र, मौखिक व कंठस्थ परंपरा, धर्माचे समाजशास्त्र आणि संस्कृतीचा सर्वांगीण अभ्यास अशा सर्व अंगांनी त्यांनी सत्याचा शोध घेतला व तेवढ्या साऱ्या कसोट्यांवर उतरणारेच निष्कर्ष त्यांनी स्वीकारले. आयुष्याची सुरुवात अतिशय खडतर परिस्थितीत करीत असतानाही संशोधन हे आपले जिवीतकार्य आहे याची जाण त्यांना आली होती. संशोधनात अडकलेल्या रा.चिं.ना एक चांगली सामाजिक दृष्टीही होती. बहुजन समाजाने विठ्ठल रामजी शिंद्यांचा मार्ग अनुसरला असता तर त्याचे अधिक भले झाले असते असे ते म्हणत. माझा ईश्वर मी वाचकांत पाहातो अशी श्रद्धा ते बाळगत आणि संशोधन व साहित्य हा माझा धर्म आहे असे ते म्हणत. रा.चिं.ना आमचे अभिवादन.

Web Title: Cultural research became inferior!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.