वाचाळांची ‘संस्कृती’
By admin | Published: September 14, 2016 05:02 AM2016-09-14T05:02:40+5:302016-09-14T05:02:40+5:30
नित्यनेमाने नवनवीन वादग्रस्त विधाने करीत मोदी सरकारला अडचणीत आणण्याचे त्यांच्याच सरकार आणि पक्षातील काही तथाकथित संस्कृतिरक्षकांचे कारनामे थांबत नसताना आता त्यात नव्याने भर घातली आहे
नित्यनेमाने नवनवीन वादग्रस्त विधाने करीत मोदी सरकारला अडचणीत आणण्याचे त्यांच्याच सरकार आणि पक्षातील काही तथाकथित संस्कृतिरक्षकांचे कारनामे थांबत नसताना आता त्यात नव्याने भर घातली आहे ती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी. परदेशी महिला पर्यटकांनी भारतात स्कर्ट परिधान करू नये, असा अनाहूत सल्ला त्यांनी दिला आहे. पण तो देताना आपल्या देशात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट संकेत आपण देत आहोत याचे साधे भानही त्यांना राहिले नाही. नंतर सारवासारव करताना आपली सूचना केवळ धार्मिक स्थळांपुरती मर्यादित असल्याचे शर्मा यांनी म्हटले. पण त्यावर कोण विश्वास ठेवणार? याआधीही शर्मा यांनी महिलांबाबत अविचारी विधाने करण्याचा असांस्कृतिकपणा दाखविला होता. रात्रीच्या वेळी मुलींचे बाहेर फिरणे ही भारतीय संस्कृती नसल्याचा जावईशोध त्यांनी लावला होता. शर्मा यांच्या स्कर्टबाबतच्या सूचनेचे पडसाद उमटले आणि अमिताभ बच्चन यांनी आपल्या नातींना लिहिलेल्या पत्रात शर्मांंना काही शालीजोडीतले ठेऊन दिले. ‘तुमच्या स्कर्टची लांबी तुमचे चरित्र ठरवत नाही. समाज तुमच्यावर व तुमच्या विचारांवर काही मर्यादा घालण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही मात्र तुम्हाला योग्य वाटेल, पटेल तेच करा’ असा प्रेमाचा सल्ला एक आजोबा या नात्याने त्यांनी दिला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर वैदिक काळातील महिलांना वस्त्रप्रावरणाबाबत मोदी राजवटीपेक्षा अधिक स्वातंत्र्य होते, असा सणसणीत टोलाच लगावला. मुलींच्या परिधानाला दोष देणारे कधी पुरुषांमधील विकृती कशी दूर सारता येईल, याचा सल्ला देताना मात्र दिसत नाहीत. केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून तर असल्या वाचाळवीरांना उधाणच आले आहे. व्ही.के.सिंह, गिरीराजसिंह, साध्वी निरंजन ज्योती, सुब्रह्मण्यम स्वामी यांसारख्या नेत्यांच्या बेलगाम व्यक्तव्यांमुळे सरकार व भाजपावर अनेकदा नामुष्कीची वेळ आली. पण त्यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही, हेही तेवढेच खरे!