सुसंस्कृतता, संपन्नतेला का दृष्ट लागली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:30 AM2020-03-04T00:30:40+5:302020-03-04T00:31:41+5:30
भुसावळ शांत झालेले नाही, महिन्यातून दोन-तीन निर्घृण खून होत आहेत.
मिलिंद कुलकर्णी
भुसावळ शहर हे संमिश्र संस्कृतीचे प्रतिक म्हणून अनेक वर्षांपासून ओळखले जाते. रेल्वेचे विभागीय कार्यालय, आयुध निर्माणी कारखाना, दीपनगरचे औष्णिक विद्युत केंद्र यामुळे देशभरातील विविध भाषिक, प्रांतिक नागरिक याठिकाणी आले आणि पुढे स्थायिक झाले. शहराजवळून वाहणारी तापी नदी, कॉन्हेंट स्कूलपासून तर नवोदय, केंद्रीय विद्यालय आणि सैनिकी विद्यालयापर्यंत शैक्षणिक आलेख चढता राहिला आहे. हिंदी, सिंधी भाषिकांसाठी स्वतंत्र शाळा आहेत. विठ्ठल मंदिर, जामा मशीद, मराठी ते कॅथालिक चर्च, पारशी बांधवांची अग्यारी अशी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे हे शहराचे वैशिष्टय आहे. अजिंठा लेणी चित्रबध्द करणाऱ्या रॉबर्ट गिलची समाधी याठिकाणी आहे. सौंदर्यवतीची स्मृती अजून भुसावळकर जागवतात. सांस्कृतिकदृष्टया संपन्न असे हे शहर आहे. अलिकडे मनुदेवी पायी वारी असो की, मॅरेथॉन स्पर्धा असो भुसावळकरांमधील सळसळता उत्साह वाखाणण्यासारखा आहे.
अशा सुसंस्कृत, संपन्न शहराला का दृष्ट लागली, असे विचारावेसे वाटते. गुन्हेगारीने कळस गाठला आहे. २०-२१ वर्षांची तरुण मुले जीवावर उदार होत सराईत गुन्हेगारासारखी मुडदे पाडू लागले आहेत. भरदिवसा, भररस्त्यावर हे प्रकार घडत असल्याने सामान्य नागरिकाचा जीव धोक्यात आला आहे. डोळ्यासमोर या घटना घडत असताना कोणीही रोखण्यासाठी पुढे धजावण्याची हिंमत करीत नाही, याचे कारण या गावगुंडांची दहशत प्रचंड आहे. त्यांच्या मागे राजकीय आणि खाकीचा आशीर्वाद आहे, याची कल्पना सामान्यांना असल्याने कोणाचा जीव वाचविण्याचा प्रयत्नदेखील होताना दिसत नाही.
रेल्वे स्टेशन म्हटले म्हणजे, गुन्हेगारी आपसूक आलीच, त्याबद्दल दुमत नाही. काही टोळ्या कुप्रसिध्द आहेत. पोलीस आणि रेल्वे पोलीस त्यांचा बंदोबस्त करीत असतात. पण गेल्या काही वर्षांत राजकीय पाठिंब्यामुळे गुन्हेगारीचे स्वरुप आमुलाग्र बदलले. एकेका नेत्याकडे २०-२५ गुंडांची टोळी आहे. घरे रिकामी करणे, व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करणे, रेती, रॉकेल, औष्णिक वीज केंद्राची राख, गावठी दारु, सट्टा, केबल अशा व्यवसायांमध्ये पंटरमंडळी स्थिरावली. सत्तेतील गॉडफादरने मग त्यांना सन्मान, प्रतिष्ठा देण्यासाठी राजकारणात आणले. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये गावगुंड शिरले. व्हाईट कॉलर म्हणून वावरु लागले. विश्वस्थ संस्था, धर्मदाय संस्था स्थापन करुन कुणी मंदीर उभारले, कुणी उत्सव साजरे करु लागले. सामान्यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी जे काही करता येईल, त्याचा खटाटोप केला गेला. राजामहाराजांना लाजवेल अशा पध्दतीने वाढदिवस साजरे होऊ लागले. चित्रपटाप्रमाणे आलिशान गाड्या उधळल्या जात असतात. सत्तेत राहण्यासाठी राज्यात ज्या कोणत्या पक्षाची सत्ता येईल, त्याच्याशी जुळवून घेण्याची हातोटी या मंडळींना आणि त्यांच्या गॉडफादर असलेल्या नेत्यांना जमू लागली. जिल्हा नेते, राज्य स्तरीय नेतेदेखील या स्थानिक नेत्यांचे उपद्रवमूल्य, आर्थिक ताकद लक्षात घेऊन सांभाळू लागले. त्यातून धाडस वाढले आणि गुन्हेगारीने डोके वर काढले. त्यातून क्रौर्याची परिसीमा गाठणारे कृत्य होऊ लागले.
सहा महिन्यांपूर्वी एका हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या पाठीमागून येऊन गुंड तरुणाने गळा चिरला आणि विजयश्री मिळविल्यासारखा सुरा नाचवत तो बाहेर पडला. कॅमेºयात कैद झालेला हा क्षण हृदयाचा थरकाप उडविणारा असा होता. त्यानंतर रवींद्र खरात व त्याच्या कुटुंबियांना गोळ्यांनी टिपण्यात आले. पाठलाग करुन झालेल्या खुनाच्या मालिकेनंतरही भुसावळ शांत झालेले नाही. महिन्यातून दोन-तीन निर्घृण खून होत आहेत.
सत्ताबदल झाला, पण खुनाचे सत्र काही थांबत नाही. सत्ताधाऱ्यांनी कठोर होऊन कारवाई करायला हवी. पोलीस दलाने याठिकाणी आयपीएस पोलीस अधिकारी नियुक्त करायला हवा. चाळीसगाव येथे अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आहे, ते तातडीने भुसावळ येथे हलविण्यात यावे. दुर्देवाने कोणत्याही जिल्हा नेत्याला, पालकमंत्र्याला या मागणीचे गांभीर्य लक्षात येत नाही. दीपक जोग यांच्यासारखा पोलीस अधिकारी परीविक्षाधीन काळात भुसावळात कार्यरत असताना गुंडगिरीचा बिमोड झाला होता. गावगुंडांनी भुसावळ सोडून पलायन केले होते. तो दरारा, धाडस नंतरच्या मोजक्या अधिकाºयांचा अपवाद वगळता कोणालाही जमले नाही, हेदेखील तितकेच खरे आहे.