लोटू पाटलांचे सुसंस्कृत सोयगाव
By admin | Published: January 4, 2017 04:27 AM2017-01-04T04:27:38+5:302017-01-04T04:27:38+5:30
सोयगाव लोटू पाटलांचे, महानोरांचे, त्यामुळेच ते रसिकांचे. या गावाची सुसंस्कृतपणाची परंपरा आहे आणि एवढ्या पडझडीत ती टिकून राहिली हेच संमेलनाच्या यशाचे कारण.
- सुधीर महाजन
सोयगाव लोटू पाटलांचे, महानोरांचे, त्यामुळेच ते रसिकांचे. या गावाची सुसंस्कृतपणाची परंपरा आहे आणि एवढ्या पडझडीत ती टिकून राहिली हेच संमेलनाच्या यशाचे कारण.
आडमार्गावरच्या सोयगावमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने ३८ वे साहित्य संमेलन घेतले. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ‘गैरसोय गाव’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोयगावने या संमेलनाचे नेटके आयोजन केले आणि संमेलनामागचा हेतूही सफल केला, तो या अर्थाने की ते उत्सवी होऊ दिले नाही. ‘देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे’ असा हा सोहळा होता. सोयगाव हे खऱ्या अर्थाने रसिकांचे, मोठी सांस्कृतिक परंपरा असणारे अजिंठा लेणीच्या कुशीतील गाव. महानोरांचे सोयगाव त्याही अगोदर लोटू पाटील नावाच्या अवलियाचे सोयगाव. लोटू पाटील हे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात अजरामर. पाऊणशे वर्षापूर्वी ज्याने अशा आडवळणाच्या गावात रंगभूमीची सेवा केली; नव्हे पुण्या-मुंबईच्या बरोबरीने नाट्य चळवळ राबविली. आजही हे गाव आडवळणाचे वाटत असले तर त्या काळी तेथे पोहोचणे किती अवघड असेल, पण अशाही परिस्थितीत लोटू पाटलांनी येथे उत्तमोत्तम नाटके केली. स्थानिक लोकांमधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना रंगमंचावर उभे केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार, दामू अण्णा मालवणकर, नूतन पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर या त्या काळच्या रंगभूमीवरील बिनीच्या शिलेदारांनी सोयगावात हजेरी लावली. या नटांचा अभिनय पाहून सोयगावातील कलाकारांना काही शिकता येईल ही त्या मागची दूरदृष्टी लोटू पाटलांची होती. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘प्रेमसंन्यास’, ‘कवडी चुंबक’, ‘पुण्यप्रभाव’ ही त्या काळची गाजलेली नाटके सोयगावात झाली. लोटू पाटलांनी ‘श्रीराम संगीत मंडळ’ स्थापन करून नाटकाद्वारे सांस्कृतिक चळवळच उभी केली. रंगभूमीचा एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांचा विवाह येथेच लोटू पाटलांनी लावून दिला. अगदी घरच्यासारखे कार्य झाले.
सोयगावकरांच्या सुसंस्कृतपणाचे हे लक्षण ही परंपरा आजही कायम आहे. या गावात शिक्षक म्हणून जीवन व्यतीत करताना गावाला संस्काराचे धडे देणाऱ्या नाईक गुरुजींचे त्यांच्या निधनानंतर येथे मंदीर बांधण्यात आले. एखाद्या गावाचे सांस्कृतिक असण्याचे यापेक्षा मोठे लक्षण काय असू शकते. ही घटना तर दोन वर्षांपूर्वीची; लोटू पाटलांची महाराष्ट्राला ओळख करून देताना सोयगावचे मोठेपणही माहीत होणे आवश्यक आहे. वर म्हटल्याप्रमाणे परवाच्या साहित्य संमेलनाचे नेटके नियोजन त्यांनी केले, कारण साहित्य, कला हे गावच्या गुणसूत्रातच आहे.
संमेलन यशस्वी झाले, कारण त्यातील साहित्यिक चर्चा, उद्बोधन, उपस्थित झालेले प्रश्न कालानुरूप होते. यात जे बारा ठराव मंजूर करण्यात आले, त्यात अंबाजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापण्याचा ठराव झाला. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी अशा विद्यापीठाची गरज आहेच; पण त्याहीपेक्षा मराठी शाळा कशा जिवंत राहतील हा खरा प्रश्न आहे. इंग्रजी शाळांनी आता ग्रामीण भागात धडक मारल्यामुळे खरा धोका मराठीला तेथेच निर्माण झाला आणि मराठीचा प्राधान्यक्रम घसरला, असे असतानाही मराठीतील सकस साहित्य निर्मितीही ग्रामीण भागात होते आहे. मराठी शाळांचा आग्रह एका ठरावानुसार केला असला तरी सरकारी धोरण मात्र वेगळेच आहे.
उत्तम नियोजन, साहित्यिकांची हजेरी, रसिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संमेलन यशस्वी झाले. ‘मसाप’च्या या पूर्वीच्या संमेलनांचा आढावा घेतला तर उदगीरचे साहित्य संमेलन नांदेडला हलवावे लागले. महिला साहित्य संमेलन यशस्वी झालेल्या जालन्यात मसापचे साहित्य संमेलन चटावरच्या श्राद्धाप्रमाणे उरकून घ्यावे लागले. याचा अर्थ आयोजक चांगले असतील तर संमेलन यशस्वी होते. संमेलनाच्या यशापयशाची जबाबदारी आयोजकांवर अवलंबून असेल, तर संमेलनाच्या आयोजनात ‘मसाप’ची नेमकी जबाबदारी काय असते? याचा उलगडा झाला तर पुढची सगळी संमेलने सोयगावसारखी होतील. भलेही गाव इतरांच्या नजरेने गैरसोयीचे का असेना.