प्याला अर्धा भरला आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 05:23 AM2018-08-15T05:23:10+5:302018-08-15T05:23:29+5:30

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

 The cup is half full! | प्याला अर्धा भरला आहे!

प्याला अर्धा भरला आहे!

Next

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. या शहरांच्या निवडीकरिता सर्वांत महत्त्वाचा निकष होता तो लोकसंख्येचा. प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा या चार निकषांवर ही क्रमवारी निश्चित केलेली आहे. गेली काही वर्षे गुजरातच्या आणि तेथील शहरांच्या विकासाच्या कहाण्या ऐकून महाराष्ट्रातील रहिवाशांना न्यूनगंड येऊ लागला होता. मात्र महाराष्ट्रातील शहरे यादीत अव्वल असताना गुजरातमधील एकाही शहराचा यादीत समावेश नाही हे आश्चर्यजनक आहे. आर्थिक विकास, रोजगार, गव्हर्नन्स, इज आॅफ डुर्इंग बिझनेस वगैरे निकषांवर महाराष्ट्रातील राज्यांनी सरस ठरणे अपेक्षित होते. महाराष्ट्राला श्रमाची व व्यापाराची, शिक्षणाची व सामाजिक चळवळींची उज्ज्वल परंपरा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था अशा अनेक बाबींमध्येही पुणे, नवी मुंबई, मुंबई तसेच ठाणे या शहरांमधील स्थिती अन्य राज्यांतील शहरांपेक्षा खूप चांगली आहे. केंद्र सरकारने ही स्पर्धा घेताना ढोबळमानाने चार निकष निश्चित केले. त्यातील कोणत्या निकषांना-त्या अंतर्गत बाबींना किती महत्त्व देऊन गुण दिले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. वानगीदाखल सांगायचे तर आर्थिक उलाढालीत मुंबई, नवी मुंबई ही शहरे स्पर्धेत आघाडी घेणे स्वाभाविक आहे. शैक्षणिक संस्थांचे जाळे हा निकष प्रधान असेल तर पुणे अव्वल ठरणे ही काळ्या दगडावरील रेघ असेल. याच स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, प्रदूषण या निकषांवर शहरांची निवड केली गेली असती,
तर कदाचित याच शहरांच्या पदरी निराशा आली असती. कचरा वर्गीकरणाबाबत ही शहरे अजून बरीच मागे आहेत. कचराकोंडीमुळे लक्षावधी लोकांची घुसमट होत आहे. या सर्वच शहरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था व वाहतूककोंडी या समस्या भीषण होत आहेत. मागील आठवड्यात मुंबई, ठाण्यात थोडेसे अंतर पार करण्याकरिता लोकांना तासन्तास कोंडीचा सामना करावा लागला. काही मोजके विभाग सोडले तर अनेक शहरांतील अनेक वस्त्यांमध्ये कचरा ही मोठी समस्या आहे. प्रदूषण ही तर या सर्वच शहरांची मोठी डोकेदुखी आहे. त्यातून श्वसनाचे, त्वचेचे व अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे ‘सुखावह’तेचे निकष कोणते त्यावर कोणते शहर बाजी मारणार ते ठरणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘अर्धा प्याला भरला आहे, असंदेखील म्हणता येतं. अर्धा प्याला सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की, भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा.’

Web Title:  The cup is half full!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या