गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार?; मनसे-भाजप-शिंदे युतीचं नवं सूत्र ठरणार?
By अतुल कुलकर्णी | Published: March 1, 2023 10:05 PM2023-03-01T22:05:16+5:302023-03-01T22:25:18+5:30
थांबलेल्या राजकीय नाट्याची स्क्रिप्ट राज ठाकरे यांची सभा पुढे नेण्याचे काम करेल असे सगळ्यांना वाटते.
अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई
आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आपण २२ मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क वरून बोलू, असे सांगत राज ठाकरे यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली आहे. दरवर्षी दसऱ्याला उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो. गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. यावर्षी गुडीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार? हा राज्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे. आज साचलेले राजकारण दिसत आहे. एकमेकांवर तेच ते आरोप होताना दिसतात. एवढ्यावरच थांबलेल्या राजकीय नाट्याची स्क्रिप्ट राज ठाकरे यांची सभा पुढे नेण्याचे काम करेल असे सगळ्यांना वाटते. त्यामुळेच ही सभा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून टाकणारी असेल.
गेले काही दिवस राज ठाकरे यांचे ट्विटर हँडल पाहिले तर त्यांनी अनेक विषयांना नियोजनबद्ध रीतीने स्पर्श करणे सुरू केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलताना देखील त्यांनी माध्यमांमधून, उद्धव यांना माझ्याशिवाय चांगला ओळखणारा माणूस देशात सापडणार नाही असे सांगितले होते. लोकमतच्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का..? असे विचारले तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर देणे टाळले होते. ज्यावेळी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिले त्यावेळी कोणतीही कॉमेंट न करता, राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा अवघ्या ३० सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला. आजपर्यंत तो ट्विट लाखो लोकांनी पाहिला आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात, "नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो... पण एकदा का नाव गेलं की ते परत येत नाही... ते येऊ शकत नाही... काळया बाजारात सुद्धा मिळायचं नाही... म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा..." असे विधान केले होते. चिन्ह आणि पक्षाचे नाव ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांना मिळाले त्याच दिवशी अचूक टायमिंग साधत, राज यांनी बाळासाहेबांच्या भाषणाचा हा भाग ट्विट केला. त्यामुळे उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या प्रश्नाला राज यांनी त्यांच्या परीने संपवून टाकले आहे.
गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली तयारी, त्यांची पुढची दिशा स्पष्ट करणारी आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापालिका निवडणूक सोपी नाही. कारण अनेक आमदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असे दिसत आहे. हे पहाता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे यांना भाजपकडून पडद्याआड सपोर्ट केला जाईल. त्याशिवाय ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार प्रभावी आहेत, त्या ठिकाणी देखील राज ठाकरे यांना सपोर्ट मिळेल. काट्याने काटा काढायचा अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे भाजपकडून एका ठाकरेंचा काटा दुसऱ्या ठाकरेंकडून काढण्याचे प्रयत्न केले जातील.
मात्र असे राजकीय युक्तिवाद राज ठाकरे यांना मान्य नाहीत. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली, आणि शिवसेनेची आजची जी अवस्था झाली त्याला जबाबदार कोण? असा सवाल राज ठाकरेंकडून केला जातो. पाडव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणातही हेच सूत्र त्यांच्याकडून मांडले जाईल असे सांगितले जात आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, किंवा आग लागल्याशिवाय धूर निघत नाही... या म्हणींची प्रचिती राज ठाकरे यांच्या भाषणातून येईल. तुम्ही चुका करायच्या. तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे. त्यांची विचारपूस करायची नाही, पक्ष सोडून लोक जाऊ लागले की आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडायचे. हे कसले राजकारण? असा सवाल किंवा अशी मांडणी राज ठाकरे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याचा दुसरा अर्थ, राज ठाकरे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना काही ठिकाणी उघड, काही ठिकाणी छुपी युती करून उद्धव ठाकरे शिवसेनेची उरलीसुरली मतांची पेटी फोडण्याच्या प्रयत्नात आहेत. अर्थात राज ठाकरे यांच्या भाषणानंतर या तिघांची राजकीय खेळी कशी असेल याचे अंदाज बांधता येतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम