‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ की, ‘विठ्ठल नामाचा रेटा हो..?’

By अतुल कुलकर्णी | Published: March 12, 2023 08:41 AM2023-03-12T08:41:36+5:302023-03-12T08:42:08+5:30

विठूराय म्हणाले, ‘‘रखमाबाई ‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ असं नाही आताचं गाणं. आता गाणं बदललं, आता ‘विठ्ठल नामाचा रेटा हो...’ असं म्हणायला हवं...’’

current political situation in maharashtra and irony | ‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ की, ‘विठ्ठल नामाचा रेटा हो..?’

‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ की, ‘विठ्ठल नामाचा रेटा हो..?’

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

पुजाऱ्याने रात्रीची आरती करून मंदिराचा दरवाजा बंद केला. काही वेळ चाहूल घेऊन विठोबारायाने कमरेवरचे हात खाली घेतले. एक आळस दिला. हळुवारपणे ते रखुमाईच्या गाभाऱ्याकडे निघाले. इकडे रुखुमाईने कपाळावर लावलेलं कुंकू नीट केलं. तेवढ्यात विठुराय आले. विठुराय म्हणाले, ‘‘चला चंद्रभागेच्या तीरी जरा पाय मोकळे करून घेऊ...’’ अवघ्या वाळवंटात निरव शांतता पसरलेली... दोघे शांतपणे चंद्रभागेच्या वाळूतून चालू लागले. मध्येच रखुमाई म्हणाली, ‘‘काय हो, आज सगळे पांढरे कपडे घातलेले लोक तुमच्याकडे आले होते. मोठ्या तोऱ्यात दर्शन घेत होते. कोणाच्या हाती सोन्याचं कडं, बोटात चार-चार अंगठ्या दिसत होत्या. तुम्ही गालातल्या गालात हसत होतात त्या भक्तांवर... असं काय मागितलं त्या भक्तांनी तुमच्याकडे..?’’ 

काही न बोलता हात पुढे करत, ‘‘तिथे घाटावर बसू...’’ असं म्हणत पांडुरंग पुढे चालू लागले... घाटावर दोन-चार लोक गप्पा मारत होते. रखुमाई म्हणाल्या, ‘‘तिकडे नको, दुसरीकडे बसू...’’ पांडुरंग म्हणाले, ‘‘चला तर... एवढ्या रात्री ते लोक काय बोलतात ते ऐका... तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील...’’ रखुमाईने विठुरायाकडे पाहिलं. दोघेही घाटावरच्या एका पायरीवर विसावले... (त्यांच्या गप्पा आता दोघांच्याही कानावर स्पष्टपणे ऐकू येत होत्या)

माधवराव तुम्हाला सांगतो, पार वात आणला बघा या निवडणुकांनी... पाण्यासारखा पैसा खर्च होतोय... पण तुमची सरळ लढत असताना कशाला पैसा खर्च केला तुम्ही... लोकांना भावनिक आवाहन करायचं... हल्ली नाही तरी सगळे राजकारण भावनेच्या भरावरच चालू आहे... तसं नाही माधवराव, दिवस बदलले... कालपर्यंत जो रोज माझ्याकडे येऊन माझे पाय धरायचा, तो आज माझ्यासमोर उभा राहिलाय... काय करणार..? सगळ्यांना खाली बसवता बसवता पाच पन्नास पेट्या खर्च झाल्या. वरतून उपकार केल्यासारखे फिरतात... म्हणतात आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षासाठी शामरावांना पाठिंबा देतोय... आणि रात्री अमुक जातीची मतं मला मिळू नयेत म्हणून बैठकही घेतात... कसला धर्मनिरपेक्षपणा आणि कसलं काय....

निवडणुका म्हणल्यावर हे येणारच शामराव... तुम्ही तुमच्या गावात विठोबा रखुमाईचे देऊळ बांधतो, असं बोलला होतात. चार - दोन कामं तरी केली असतील ना तुम्ही... शेवटी लोक कामे बघतात. नाही असं नाही...
काय सांगू माधवराव... मंदिर बांधतो म्हणालो होतो. मात्र, जी जागा मंदिरासाठी निवडली त्या जागेवर पोराला क्लब काढायचा होता. मी विरोध करतोय म्हटल्यावर त्याने थेट मंत्र्याच्या पोरालाच पार्टनर केलं... वरती मला म्हणतो, मंदिरासाठी बघा कुठेतरी कोपऱ्यातली जागा... आता ही गोष्ट सगळ्या मतदारसंघात झाली... पाच वर्ष मंदिराच्या आश्वासनावर काढली होती. म्हणून तर आज इथे विठुरायाकडे आलो...

याचा अर्थ शामराव तुम्ही साक्षात विठ्ठलाला फसवलं... हे काही बरोबर नाही केलं... आता कोणत्या तोंडाने तुम्ही पांडुरंगाचे दर्शन घेणार..? बाकी सगळ्यांना जाऊ द्या, निदान पांडुरंगाला तरी घाबरत जा... अहो म्हणून तर इथे आलो... दुपारी दर्शन घेतलं. सोबत दहा पाच कार्यकर्ते होते. त्यांच्यासमोर पांडुरंगाचे दर्शन घेतानाचे फोटो काढले... आता पहाटेची काकड आरती पण करणार... त्याचा व्हिडीओ बनविणार... पांडुरंगाला साकडं घालणार... फोटो आणि व्हिडीओ मतदारसंघात व्हायरल करणार... मी पांडुरंगाला शरण आलेलं बघून लोक भावनिक होतील... मी पांडुरंगाची माफी मागितली हे त्यांना कळलं तर थोडीबहुत मतं मला मिळतील...
तुमचं काही खरं नाही शामराव... पांडुरंगाला मागितलं तरी काय... आणि सांगितलं तरी काय...?

म्हणालो, बाबा रे चुकलो... माफ कर... तुझ्या मंदिरासाठी चांगली जागा शोधून काढीन... मंदिर बांधीन... पण निवडणुकीत यश दे... पोराचा क्लब पण नीट चालू दे... पुढच्या वेळी सोन्याचा टिळा लावतो... आता हा फोटो मतदारसंघातल्या पेपरात छापून आणतो, विठ्ठल भक्त तेवढेच प्रसन्न होतील... पांडुरंगाने हलकेच स्मितहास्य करत रखुमाईकडे पाहिलं... सगळ्या प्रश्नांची उत्तर रखुमाईला मिळाली... त्याही गालातल्या गालात हसल्या. पांडुरंग म्हणाले, ‘‘अहो, जे दिसतं त्यावर विश्वास ठेवून चाललो असतो, तर आपल्याला फिरायला वाळवंटही मोकळं उरलं नसतं... रखमाबाई, हे कलियुग आहे... लोक येतात... मनातील इच्छा बोलून दाखवतात... त्यात त्यांचा स्वार्थ जास्त असतो... जे श्रद्धेनं येतात त्यांची इच्छा पूर्ण करतो की, आपण... चला आता, काकड आरतीची वेळ झालीय... पुजारी मंदिरात यायच्या आत विटेवर उभं राहावं लागेल...’’ रखमाई पदराआड चेहरा करून छान लाजल्या... दूरवर पहाटेची भक्तिगीतं कानावर येत होती...

‘‘नामा म्हणे तरलो पाही
विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल,
विठ्ठल नामाचा रे टाहो... प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव...’’

विठूराय म्हणाले, ‘‘रखमाबाई ‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ असं नाही आताचं गाणं. आता गाणं बदललं, आता ‘विठ्ठल नामाचा रेटा हो...’ असं म्हणायला हवं...’’ आणि दोघेही हसत हसत मंदिराकडे रवाना झाले...

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: current political situation in maharashtra and irony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.