आजचा अग्रलेख: ड्रग्ज व पर्यटकांची गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 09:11 AM2022-10-06T09:11:01+5:302022-10-06T09:11:53+5:30

गोव्यात पर्यटक म्हणून जे देश-विदेशी पाहुणे जातात, त्यापैकी अनेक जण अधूनमधून काही गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आढळून येतात.

current situation of drugs and tourist crime in goa and its consequences | आजचा अग्रलेख: ड्रग्ज व पर्यटकांची गुन्हेगारी

आजचा अग्रलेख: ड्रग्ज व पर्यटकांची गुन्हेगारी

googlenewsNext

गोव्यात पर्यटक म्हणून जे देश-विदेशी पाहुणे जातात, त्यापैकी अनेक जण अधूनमधून काही गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आढळून येतात. वार्षिक सरासरी ८० लाख पर्यटक गोव्याला भेट देतात. यात देशी पर्यटक हे सर्वाधिक असतात. पूर्वी विदेशी पर्यटकच ड्रग्ज विक्री किंवा ड्रग्ज बाळगल्याच्या गुन्ह्याखाली पकडले जात होते. आता देशी पर्यटकही मोठ्या संख्येने पकडले जात आहेत. वेर्णा भागात अमली पदार्थ विकताना पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी एका ३३ वर्षीय युवकाला अटक केली. तो मूळचा बिहारमधील आहे. परप्रांतीय मजूर किंवा पर्यटक गोव्यात दंगामस्ती व गुन्हे करताना आढळून येतात ही गोष्ट चिंताजनक आहे. 

गोवा हा शांत प्रदेश अशी ख्याती जगभर होती व आहे. या राज्यातील धार्मिक सलोखा, अनुपम निसर्गसौंदर्य, रूपेरी वाळूचे किनारे, पांढरेशुभ्र चर्चेस आणि देखणी मंदिरे यांची तारीफ पूर्ण देशात होत असते. यामुळेच गोव्याप्रतीचे आकर्षण देशी पर्यटकांमध्ये गेल्या वीस वर्षांत जास्त वाढले. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, केरळ येथून चाळीस लाखांहून अधिक पर्यटक दरवर्षी गोव्यात येऊन जातात. पूर्वी देशी पर्यटक हे मद्य पिऊन गोव्यात मस्ती करताना आढळायचे. आता ते अमली पदार्थांचे सेवन करून मस्ती करतात. कळंगुट वगैरे भागात पर्यटक व स्थानिक असा संघर्ष व वाद अधूनमधून होत असतो. सार्वजनिक ठिकाणी बसून पर्यटक मद्य पितात, असे फोटो व्हायरल होतात. देशी पर्यटक ड्रग्ज विक्री करतानाही पकडले जात आहेत. गोव्याचा पर्यटन व्यवसाय बदनाम करण्यासाठी काही पर्यटकच हातभार लावत आहेत. 

परवाच पणजीतील एक फोटो खूप व्हायरल झाला. स्वच्छ अशा मांडवी किनाऱ्याकडे तोंड करून एक पर्यटक फुटपाथवर मूत्र विसर्जन करीत असल्याचे त्या छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येत आहे. एका बाजूने स्वच्छ भारत उपक्रम सगळीकडे राबविला जातो, दुसरीकडे देशी पर्यटक गोव्याला अस्वच्छ करीत आहेत. काही रस्त्यांच्या बाजूला आणि शेतातच स्टोव्ह किंवा गॅसचा वापर करून पर्यटक स्वयंपाक करीत बसले असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. अगदी मिरामार-दोनावालच्या पट्ट्यातदेखील पर्यटक अशा अवतारात दिसून येतात. सगळा कचरा मग तिथेच टाकला जातो. बीअरच्या बाटल्या तर पर्यटकांनी सगळीकडे टाकून दिल्याचे रोज आहायला मिळते. गोव्याला श्रीमंत पर्यटक हवेत, जास्त पैसा खर्च करणारे पर्यटक हवेत अशा प्रकारचे ढोल सरकार वाजवत असते. मात्र, मध्यमवर्गीय कुटुंबांमधूनही सर्वाधिक पर्यटक गोव्यात येतात, त्यांनी जबाबदारीने वागावे, सभ्यता व संस्कृती त्यांच्या वर्तनात दिसावी म्हणून सरकारने जागृती करणे गरजेचे आहे. 

अर्थात अशा प्रकारची जागृती करण्याची वेळ खरे म्हणजे सरकारवर यायला नको; पण ती वेळ पर्यटकांनीच आणली आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी रस्त्याकडेला खुल्या जागेत स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांसाठी वेगळ्या जागा आरक्षित करून दिल्या जातील, असे जाहीर केले होते. नंतर त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही, हा वेगळा विषय आहे. उत्तर गोव्याच्या किनारी भागात अलीकडेच सोनाली फोगाट या टिकटॉक स्टारचा खून झाला. आता याप्रकरणी सीबीआयने चौकशी काम सुरू केले आहे. मात्र, गोव्यात ड्रग्ज सहज मिळतात व सगळीकडे अमली पदार्थांचा व्यवसाय बोकाळलेला आहे, अशा प्रकारचा समज सोनाली प्रकरणामुळे देशभर नव्याने पसरला. अगोदर पाँडिचेरी व मग हैदराबाद येथील एक-दोन पर्यटकांना व विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या अतिसेवनाच्या त्रासापोटी इस्पितळात जावे लागले. पर्यटकांना किंवा परराज्यातून गोव्यात येऊन होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज कोण पुरवतात,  मुख्य डीलर कोण आहेत याचा शोध सहसा लागत नाही. 

अलीकडे गोवा पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई मोहीम सुरू केली. त्यात अनेकांना अटक झाली आहे; पण अमली पदार्थ व्यवसाय यातून थांबेल असे म्हणता येत नाही. हिमाचल प्रदेश, काश्मीर व अन्य ठिकाणांहून ड्रग्ज गोव्यात येत असतात. कोकेन वगैरे विदेशातूनही येते. याला पायबंद घालावा लागेल. एनडीपीएस कायदा अत्यंत कडक आहे. गोव्यात येऊन ड्रग्ज धंद्याचे बळी ठरणारे पर्यटक स्वत:लाही उद्ध्वस्त करीत आहेत व गोव्याचे नावही खराब करीत आहेत. मुंबईतील कुविख्यात असा विकी देशमुख हा गुंड अलीकडेच गोव्यात पर्यटनासाठी आला असता पकडला गेला. ३३ गंभीर गुन्ह्यांबाबत तो पोलिसांना हवा होता. गोवा हे गुन्हेगारांना लपण्याचे सुरक्षित ठिकाण वाटते हीदेखील चिंतेची बाब आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: current situation of drugs and tourist crime in goa and its consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा