अस्वस्थ काळाचे वर्तमान: डोक्यात घंटा वाजल्या पाहिजेत, लोकहो!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 06:35 AM2021-01-09T06:35:28+5:302021-01-09T06:37:14+5:30

अरेच्चा, स्पर्श कळत नाही? गंध येत नाही? दिसत नाही? चवच लागत नाही? असे असेल, तर मुकेपणाचा बथ्थड ‘मास्क’ ओरबाडून काढावा लागेल! 

The current of turbulent times: Bells should ring in the head, folks! | अस्वस्थ काळाचे वर्तमान: डोक्यात घंटा वाजल्या पाहिजेत, लोकहो!

अस्वस्थ काळाचे वर्तमान: डोक्यात घंटा वाजल्या पाहिजेत, लोकहो!

Next

- अतुल पेठे , प्रयोगशील रंगकर्मी
अतिशय  अस्वस्थ  काळात  आपण जगतो आहोत, तुमच्या मनाशी काय चालू आहे? 
सध्याची स्थिती ही महाभयंकर आहे. आपण कुठल्या अवास्तवात आणि आभासी जगात जगत आहोत, हे कळेना झाले आहे. पूर्वीची (म्हणजे सहा महिन्यांपूर्वीची) गोष्ट आता भूतकाळात जमा झाली आहे. आता सर्वकाही नव्याने पाहण्याची अभूतपूर्व गरज निर्माण झाली आहे. 
कोविडच्या काळात अनेक कारणांनी वातावरण निर्भय  उरलं नाही, प्राधान्यक्रम बदलले. अशा वेळी देशातल्या कलेसंदर्भातल्या व्यासपीठांची काय जबाबदारी आहे, असं तुम्हाला वाटतं?


सद्यस्थितीविषयी सतत उतावीळ प्रतिक्रिया लगेच न देता, वर्तमानाला व्यापक पटलावर पाहायला हवे. कोरोनामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला, जगणे पूर्णतः बदलत गेले. येता काळ कसा असेल, याचा काडीमात्रही अंदाज मला तरी येत नाही. जगणे हीच पहिली अट झाली आहे. कोरोना हा अवघ्या मनुष्यप्राण्याला मोठा धडा आहे. हा आघात मला रूपकात्मक वाटतो. मुळात एकमेकांपासून अंतर राखले जाण्याचे राजकारण देशात धर्म, जात आणि आर्थिक स्थितीमुळे होतेच. त्यात आता कोरोनाने भर घातली आहे. या दुर्बळ स्थितीचा विघातक फायदा लाटणे किंवा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे हे अहितकारक होईल. अशा नाजूक परिस्थितीत मानसिक आणि सामाजिक पातळीवर जेव्हा माणसे पंचेंद्रियांची ताकद गमावतात, तेव्हा भवतालाचे भान हरपते. मुकेपणा लादणारी ही अजब ‘मास्क’ लावलेली स्थिती तयार होते आहे. अशा परिस्थितीत कलेशी संबंधित संस्था राजकीय-सामाजिक विचारांच्या, खुल्या वातावरणाचा आग्रह धरणाऱ्या असतील, तरच ‘कलासंस्कृती’ नावाची गोष्ट बहरत जाईल आणि समाज बौद्धिक पातळीवर समृद्ध होईल. कलेच्या माध्यमातून प्रश्‍न विचारणे, वेगळ्या जगाचे दर्शन घडविणे आणि दृष्टिकोन देणे हे कलाकाराचे काम असते. कवी व काव्य हा शब्द पूर्वी व्यापक अर्थाने वापरला जाई, तोच वापरून म्हणतो, कवी हा भविष्यवेत्ता असतो. तो समाजात घडणाऱ्या व घडू शकणाऱ्या अनिष्ट गोष्टींच्या घंटा वाजवत असतो. संकटांची नांदी गात असतो. नाटक, कविता, साहित्यासारखे क्षेत्र कुठल्याही जोखडापासून मुक्त होत बंधनमुक्त वातावरणात निपजले, तर आणि तरच कलेत नवनवोन्मेष घडतात. ते आणण्यासाठी अशा संस्थांना प्रयत्नपूर्वक सखोल विचार आणि व्यापक दृष्टिकोन जोपासावा लागतो. मगच कला व्यवहार विस्तीर्ण होऊ शकेल. 


कला विशिष्ट विचारसरणीला बांधली गेली तर...?
सार्वकालिक विचार करता, कुठलीही विचारसरणी कलेला दावणीला बांधून तिच्या माध्यमातून आपले मुद्दे राबवू पाहतेच, पण सर्जनशील कलाकाराने असे कोणाच्या गोठ्यात बिल्ला लावून उभे राहू नये, असे मला वाटते. आपल्याला जाणवणाऱ्या प्रश्‍नाच्या खोल मुळाशी जाऊन, व्यक्तिगत फायद्या-तोट्याचे राजकारण न बघता अभ्यासपूर्ण जबाबदार विवेकी विधान करणे गरजेचे असते. सॉक्रेटिस, चोखामेळा, ज्योतिबा, आगरकर, गालिब, फैज आणि दाभोलकरांचा लढा हा मूल्यव्यवस्थेबाबतचा लढा होता. त्यांच्यामुळेच समाजाची नैतिक विचारधारण शक्ती बळकट होत असते. भ्रमिष्ट कालखंडातही ती उराशी जपता येते.


मग अशा स्थितीत कसे जगावे, असे तुम्हाला वाटते?
या कालखंडाला आपण ‘भ्रमितयुग’ म्हणू या. अशी परिस्थिती भीषण असते आणि ती वारंवार उद्भवत असते. मात्र, नाहीशीही होत असते. हे आकलन माणसांना लढ्यातून आणि अनुभवातून येत जाते. ज्ञानेश्‍वरांचा कालखंड-तेरावे शतक आणि तुकारामाचा कालखंड-सतरावे शतक. यातील मधल्या वर्षांना महाराष्ट्रात ‘अंधारयुग’ असेच म्हणतात. त्या काळात महाराष्ट्रात एकनाथ सोडले, तर द्रष्टा कवीच नव्हता. मात्र, अशा दुर्दैवी काळात ‘लव्हाळ्यां’सारखी साधी-साधी माणसे काहीतरी करत राहातात, ते महत्त्वाचे आहे. माती पकडून ठेवायची हे त्याचे काम. महापुरात वृक्ष कोसळतात, वाहून जातात, पण लव्हाळी तग धरून राहू शकतात. जी मूल्ये आपल्याला महत्त्वाची वाटतात, ती गंभीरपणे टिकवायचा प्रयत्न या काळात आपण लव्हाळ्यांनी करायचा असतो. अशा काळात जिथे डोळे वटारले जातात, तिथे आपल्या मनात निदान काही प्रश्‍न तयार होतात का, हे तपासावे. अशा स्थितीत आपल्या विचार आणि कल्पनाशक्तीवर बंधने घालता येणे कोणाला तरी शक्य असते का? सूक्ष्म पातळीवर तरी का होईना, अशी व्यक्ती व्यक्त होणारच. माणसे सदासर्वकाळ अशा तऱ्हेने मुकी, बहिरी, आंधळी जगू शकत नाहीत.

प्रत्येकाला आपली पंचेंद्रिये वापराविशी वाटतात. काही काळ ती गंजून पडतात अथवा गंजाची जाणीव हरपते, पण एक दिवस आपल्याला लक्षात येते की अरेच्चा, आपल्याला स्पर्श कळत नाहीये, गंध येत नाहीये, दिसत नाहीये, चवच लागत नाहीये आणि आपल्याला कोरोना झालाय! मग उपाय करावे लागतात, प्रतिकारशक्ती कामाला लावावी लागते. ‘इम्युनिटी’ वाढविण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी ‘गेली तर गेली चव!’ असे आपण म्हणत नाही, ती परत यावी, म्हणून प्रयत्न करतो. हेच सारे राजकीय, सामाजिक, मानसिक परिस्थितीबद्दल असते, असे मला वाटते. अशा अवघड कालखंडातच तुमचा कस लागतो. कोरोना हे रूपक म्हणून बघितले, तर जे व्यक्तिगत पातळीवर अनुभवायला येते, तेच सामाजिक पातळीवर ताडता येते. आता समाजाला विचार करावा लागेल की, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा गेले कुठे? तुकाराम गेले कुठे? त्यांचा समाजाच्या पातळीवर उपयोग आहे की नाही? आपल्याला तुकारामबुवा टिकवता येतो की नाही? यात आपलीही लायकी जोखली जाणार. समाजाचे लक्ष कशावर आहे आणि उद्दिष्ट्य काय आहे, ते निर्णायक ठरेल. त्यासाठी प्रत्येकाला काही किंमत मोजावी लागेल. त्याकरिता ‘आयसोलेशन’ झालेल्या या काळात अधिक मोठी कामे एकेकट्याने करायचा प्रयत्न करायला हवा. नव्या पिढ्यांकरिता या विश्‍वातील ऑक्सिजन मजबूतपणे शाबूत ठेवणे हे आजच्या जिवंत माणसांचे काम आहे,  नाही? का?


मुलाखत : सोनाली नवांगुळ

Web Title: The current of turbulent times: Bells should ring in the head, folks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.