करी लाभाविण प्रीति

By Admin | Published: December 29, 2016 03:32 AM2016-12-29T03:32:40+5:302016-12-29T03:32:40+5:30

विश्वसाहित्याचे एक मोठे भांडार ‘आई’ नावाच्या प्रासादिक दालनाने समृद्ध झाले आहे. ‘आई’ हा वैश्विक साहित्याचा स्फूर्तीस्त्रोत आहे. निर्हेतुक प्रेम, वात्सल्य, मार्दव, जिव्हाळा, धृती

Curry laabhbhini love | करी लाभाविण प्रीति

करी लाभाविण प्रीति

googlenewsNext

- डॉ. रामचंद्र देखणे

विश्वसाहित्याचे एक मोठे भांडार ‘आई’ नावाच्या प्रासादिक दालनाने समृद्ध झाले आहे. ‘आई’ हा वैश्विक साहित्याचा स्फूर्तीस्त्रोत आहे. निर्हेतुक प्रेम, वात्सल्य, मार्दव, जिव्हाळा, धृती, या सद्गुणाने नटलेली ‘आई’ ही एक सात्विक मूर्ती आहे. जगातील सर्व भाषांमध्ये आई या विषयावर विपुल साहित्य निर्मिती झाली आहे व मातृत्वाचा आदर्श उभा राहिला आहे. भारतीय संस्कृतीने देव, आई, आणि गुरू किंवा संत यांच्या ठायी आपला श्रद्धाभाव समर्पित केला आहे आणि मानवी जीवनात त्यांना सर्वोच्च स्थान दिले आहे.
प्रेमवात्सल्याचे ज्ञानरुप म्हणजे देव, प्रेमवात्सल्याचे बोधरुप म्हणजे संत किंवा गुरू तर प्रेमवात्सल्याचेच भावरुप म्हणजे आई होय. मराठी साहित्यात महाकाव्यापासून कवितेपर्यंत तत्वज्ञांच्या तत्वचिंतनापासून लहान मुलाने लिहिेलेल्या निबंधापर्यंत, प्रदीर्घ कादंबरीपासून ललित-कथेपर्यंत संतांच्या अभंगवाणीपासून जात्यावरच्या ओवीपर्यंत, पुराणकथांपासून कहाण्यांपर्यंत, सर्व वाङ्मय प्रकारात आईचे दर्शन उदात्तपणे डोकावते आहे.
आईचे अंत:करण संतांनी जेवढे जाणले, तेवढे इतर कोणीही जाणले नाही. संत आईच्याच वृत्तीने जनमानसावर वात्सल्यभावाचा नित्य वर्षाव करीत आले. आचार्य अत्र्यांनी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या पुस्तकातील आजची आषाढी या चिंतनात्मक लेखात मातृभावाने ओथंबलेल्या संतवाणीचे यथार्थ विवेचन केले आहे. ते म्हणतात ‘देवाची भक्ती आणि आईची प्रीती यात संतांना मुळीच फरक दिसत नाही’.
संतांनी आपल्या जीवनात भक्तीरसाला महत्वपूर्ण स्थान दिले पण या भक्तीरसाला त्यांनी वात्सल्यभावाचे स्वरुप दिले आहे. देव भेटावा यापेक्षाही देव समजावा, देव कळावा ही संतांची धारणा आहे. अडाणी माणसांना देवाची ओळख कशी करून द्यायची? माणूस महापंडित झाला म्हणून का तो देवाला ओळखू शकेल? पण आईला कोणीही ओळखतो म्हणून मातेच्याच रुपाने देवाला कल्पून संतांनी त्याला आळविले आहे.
देव आणि संत ओळखण्यासाठी आई हेच माध्यम वापरतो आहे. देवांची आणि संतांचे गुणवर्णन करण्यासाठी आईच्या वृत्तीतील सद्गुणांचे दाखले दिले आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे,
‘लेकुराचे हित। वाहे माऊलीचे चित्त।। ऐशी कळवळ्याची जाती।
करी लाभाविण प्रीती।।’
आई ही लाभावीण प्रीत करणारी कळवळ्याची जाती आहे. निर्हेतुक प्रेमाची उत्तुंगता म्हणजे आई. संतांनी कधी देवाची कधी संतांची, कधी श्रुतीची तर कधी सद्गुरुंची उपमा आईला देवून तत्वज्ञानाचे सिद्धांत आणि सदाचाराचे प्रबोधन घडविताना ठायीठायी आईचेच दृष्टांत दिले आहेत.

Web Title: Curry laabhbhini love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.