मुक्या काळविटांचा शाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:41 AM2018-04-06T00:41:30+5:302018-04-06T00:41:30+5:30
चिंकारा प्रजातीच्या दोन काळविटांची अवैध शिकार केल्याबद्दल दोषी ठरवून जोधपूरच्या न्यायालयाने बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याला पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. सेलिबे्रटींभोवती घिरट्या घालणाऱ्या माध्यमांनी जणू एखाद्या संतपुरुषाला सुळावर चढविल्याच्या आविर्भावात दिवसभर या बातमीचे चर्वण केले.
चिंकारा प्रजातीच्या दोन काळविटांची अवैध शिकार केल्याबद्दल दोषी ठरवून जोधपूरच्या न्यायालयाने बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याला पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. सेलिबे्रटींभोवती घिरट्या घालणाऱ्या माध्यमांनी जणू एखाद्या संतपुरुषाला सुळावर चढविल्याच्या आविर्भावात दिवसभर या बातमीचे चर्वण केले. चंदेरी पडद्यावर दिसणारा हीरो खºया आयुष्यातही तसाच असतो अशा भाबडेपणाने चाहत्यांनी सल्लूने असे काही केले असावे यावर अविश्वास व्यक्त केला. आगामी अनेक चित्रपटांमध्ये शेकडो कोटी रुपये गुंतले असल्याने बॉलिवूडही सलमान खानच्या बाजूने उभे राहणे स्वाभाविक होते. ज्येष्ठ अभिनेत्री व राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी सलमानच्या शिक्षेने धक्का बसल्याचे सांगितले व सलमानने केलेली असंख्य मानवतावादी कामे पाहता त्याला दया दाखवायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्याकडे धर्मराज्य नाही व न्यायालये ही चित्रगुप्ताचा दरबार नाही, याचे भान नसले की अशी गल्लत केली जाते. यमदूतांनी आणलेल्या व्यक्तीने आयुष्यभरात केलेल्या पापपुण्याचा हिशेब करून त्या व्यक्तीला स्वर्गात पाठवायचे की नरकात याचा फैसला चित्रगुप्त करतो, असे मानले जाते. न्यायालये अशी आयुष्यभराच्या पापपुण्यावर चालत नाहीत. मुुळात सेलिब्रेटींवर असे काही किटाळ आले तर ते लवकरात लवकर दूर व्हायला हवे. मात्र सेलिब्रेटींची प्रवृत्ती खटले लांबविण्याची दिसते. परंतु यातून अपराधीपणाची भावनाच व्यक्त होत असते. काळवीट शिकारीचे एकूण तीन खटले सलमानविरुद्ध चालले. शिकारीच्या या तिन्ही घटना जोधपूरजवळच्या गावांमध्ये २६ सप्टेंबर ते १/२ आॅक्टोबर १९९८ या आठवडाभरातील आहेत. एकूण पाच काळवीट या अवैध शिकारीत मारली गेली. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गेलेले सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू या इतर नटनट्याही या खटल्यात आरोपी होते. त्यांना निर्दोष सोडले गेले. आठवडाभरात तीन वेळा शिकारीला जाऊन पाच काळविटांची शिकार केली जावी यावरून आपण काहीही करू शकतो, याची बेफिकीरीही दिसते. आधीच्या दोन खटल्यांमध्ये झालेल्या अनु्क्रमे एक व पाच वर्षांची शिक्षा अपिलांत हायकोर्टाने रद्द केल्या. या तिसºया खटल्याचे कवित्वही अनेक वर्षे सुरु राहील. याआधी सलमान खानविरुद्धच्या मुंबईतील ‘हिट अॅण्ड रन’ खटल्याचा निकाल व्हायला १३ वर्षे लागली. काळवीट शिकारीचे खटले २० वर्षे चालले. यातून कायद्याचे हात अशा मंडळींपुढे तोकडे पडतात, असा उलटा संदेश जातो. ‘हिट अॅण्ड रन’ खटल्यात निर्दोष ठरवून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाºया सलमान खानने त्यातील पाच पीडितांना १९ लाख रुपये भरपाई स्वत:हून दिली. आता तशीच नोटांची पुडकी काळविटांच्या कळपापुढे फेकण्याचा शहाजोगपणा सलमानने केला नाही. मुक्या जीवांविषयीच्या उदात्त भूतदयेतून वन्यजीव संरक्षण कायद्यासारखे कायदे केले गेले. पण त्याच माणसाने हे कायदे बोथट केले. हरीण वर्गातील काळवीट हा रुबाबदार व लाजराबुजरा प्राणी अवैध शिकार आणि नैसर्गिक अधिवासाचा संकोच यामुळे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. काळविटांचं नैसर्गिक आयुष्य १५ ते १८ वर्षे असते. म्हणजे माणसाने केलेला कायदा अवैध शिकारीस बळी पडलेल्या काळविटांच्या त्या पिढीला न्याय देण्यास अपयशी ठरला असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. सलमान या सर्व खटल्यांमधून उद्या कदाचित बाइज्जत निर्दोष ठरेलही. पण यातून लागणाºया वन्यजीवांच्या अभिशापाचे परिणाम समस्त मानवजातीस भोगावे लागणार आहेत, हे विसरून चालणार नाही.