दादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:09 AM2018-05-28T01:09:29+5:302018-05-28T01:09:29+5:30
प्रत्येक पिढीत एक दादा असतात. म्हणजे ते सगळ्या वयात दादा असतात. लहानपणी आजी कौतुकाने हा माझा दादा म्हणते. मग तो दादाच होतो. आजोबा झाला तरी तो दादाच
- किशोर पाठक
प्रत्येक पिढीत एक दादा असतात. म्हणजे ते सगळ्या वयात दादा असतात. लहानपणी आजी कौतुकाने हा माझा दादा म्हणते. मग तो दादाच होतो. आजोबा झाला तरी तो दादाच असतो. असे दादा समाजाचं पोरपण आणि प्रौढपण सांभाळतात. त्यांच्या वागण्यातही असंच एक समंजसपण असतं. त्यांचा एक परवलीचा शब्द असतो. काहीही घडो.. ‘ही प्रभूची इच्छा’ किंवा ‘ही त्याचीच इच्छा’ असं दादा कायम म्हणतात. पण मग एक प्रश्न असतो.
ही जर प्रभूचीच इच्छा असते तर मग दादांचं काय काम? तर कायम हे आपलं नाही, हे त्याचं देणं आहे. ज्याची होती त्याने नेली ही भावना. कितीही वाईट घडो वा कितीही चांगलं घडो, ते कायम त्याच्या इच्छेवर सगळं सोपवून मोकळे होतात. तो आहे ना मग काळजी कशाला? ही सोपवण्याची भावना प्रत्येक माणसात असते.
खादे लहान मूल आई कुणाकडे तरी सोपवते. पण ते कायमचे नसते. ते नक्की जबाबदारी निश्चित करते पण आई येताच ते मूल तिच्याकडेच येते. संसारात अशी सोपवासोपवी कायम चालू असते. मला पूर्ण परमेश्वर नको तर त्याची कृपा हवी. म्हणजे त्याच्यावर पूर्ण भरोसा टाकूनच कृपा हवी. एकदा ती कृपा मिळाली की झाला पूर्णवाद. माझे सगळे कर्म नीट करून त्याची उपासना करणे, सेवा करणे, पूर्ण श्रद्धावान होणे, जिथे पूर्णत्वाचा वाद मिटतो तो पूर्णवाद. मी त्या पूर्णत्वाचा अधिकारी असतो. मग मी आणि प्रभू वेगळे नाहीत.
कबीर म्हणतो, ‘प्रेम गली अति संकरी, दूजा नही समाये । एक प्रभू तो मैं नही, एक मैं तो प्रभू नाय’ ही प्रेमाची गल्ली इतकी निमुळती आहे की एकच माणूस जाऊ शकतो. एक तर प्रभू किंवा मी. मग कसं जायचं, एक व्हायचं, हे एक होऊन प्रवास करणं ज्याला जमतं तो दादा होतो. त्याने सगळे खांद्यावर घेतलेले असतात. हा खरा दादा जग आणि घर चालवतो. तो निरिच्छ, निष्प्रेम, निष्काम असतो. कृपया गल्लीतला दादा, राजकारणातील दादा हा तसा दादा समजू नये. हे सगळे खोटे, भित्रे, स्वार्थी, क्रूर, खाऊ दादा असतात. ते काहीच करू शकत नाहीत. आपल्याला असा एकच दादा मिळावा की तो सर्व भार त्याच्यावर टाकून आपल्याला निर्भय करतो. हा खरा दादा नाही तर हे खरे दादा हे संसार चालवतात... ही त्याची इच्छा !