दादांच्या सांगलीचे नवे वळण! -रविवार विशेष-- जागर
By वसंत भोसले | Published: August 5, 2018 01:03 AM2018-08-05T01:03:49+5:302018-08-05T01:04:39+5:30
राजकीय, सामाजिक ऐतिहासिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक, क्रीडा, आदी क्षेत्राचा देदीप्यमान वारसा असताना गेल्या तीन दशकांतील सांगलीचा प्रवास सकारात्मक नाही. नव्या वळणावर ही जबाबदारी भाजपवर येऊन पडली आहे, असे समजायचे का ? त्यांना ही जबाबदारी ओळखावी लागेल...
- वसंत भोसले
राजकीय, सामाजिक ऐतिहासिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक, क्रीडा, आदी क्षेत्राचा देदीप्यमान वारसा असताना गेल्या तीन दशकांतील सांगलीचा प्रवास सकारात्मक नाही. नव्या वळणावर ही जबाबदारी भाजपवर येऊन पडली आहे, असे समजायचे का ? त्यांना ही जबाबदारी ओळखावी लागेल...
सांगली आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाचा विजय आश्चर्यकारक वाटण्यापेक्षा सांगलीत कॉँग्रेस आघाडीचा आणि जळगावमध्ये ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या गटाचा (सध्या ते शिवसेनेत आहेत, पण सुरेशदादा जैन यांचा गट हाच त्यांचा खरा पक्ष आहे.) पराभव होणे, याला अधिक वार्तामूल्य प्राप्त झाले आहे. सांगलीत निकालाची बातमी देताना ‘लोकमत’ने जे शीर्षक दिले होते, यावरही असंख्य प्रतिक्रिया उमटल्या. ते शीर्षक होते की, ‘‘दादांच्या सांगलीत कमळ!’’ याचे आश्चर्य नाही तर धक्कादायक असेच अनेकांनी वर्णन केले.
सांगली आणि सांगली जिल्हा म्हणजे दिवंगत ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचा जिल्हा. त्यांची सांगली असाच गौरवात्मक उल्लेख स्वातंत्र्योत्तर काळात केला जात असे. वसंतदादा पाटील यांचा निर्णायक दबदबा राजकारणावर अखेरपर्यंत राहिला. याचा अर्थ इतर नेते नव्हे किंवा त्यांच्या कार्याचा ठसा उमटलाच नाही, असे नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी, प्रा. एन. डी. पाटील, राजारामबापू पाटील, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, एस. व्ही. पाटील, गुलाबराव पाटील, आबासाहेब खेबुडकर, विजयसिंह डफळे-सरकार, आबासाहेब शिंदे-म्हैशाळकर, शालिनीताई पाटील, संपतरावनाना माने, दिनकार आबा पाटील, हनुमंतराव पाटील, विश्वासराव नाईक, आदी असंख्य नेत्यांची फळी होती की, ज्यांचा सांगलीच्या राजकारणात दबदबा होता. मात्र, अखेरपर्यंत चढत्या क्रमाने वसंतदादा पाटील यांचा दबदबा कायम राहिला. त्यांनी राज्याची सर्व महत्त्वाची पदे भूषविली. शिवाय महाराष्ट्र राज्याचे चारवेळा मुख्यमंत्रिपद भूषविले. १९७३ मध्ये प्रथम राज्य मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर पुढे दादांचा गट म्हणून सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुमारे सोळा वर्षे सातत्याने केंद्रबिंदू ठरला. १९८५ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कॉँग्रेस पक्षाने लढविली आणि प्रचंड बहुमताने जिंकली. त्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्रात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तो वसंतदादांच्या राजकीय जीवनातील उच्चत्तम राजकीय बिंदू होता. मात्र, त्यांची बंडखोरवृत्ती कायम जागृत होती. पक्षश्रेष्ठी असोत की, स्वकीय पक्षातील गटबाजी असो, त्यांनी राजीनामा फेकून देण्याची तयारी कायम ठेवली. एकही पद त्यांनी पूर्ण वर्षे (पाच वर्षे) भूषविले नाही. काही ना काही तक्रारी झाल्या, अटीतटीची भूमिका घेण्याचे प्रसंग आले, तेव्हा तडजोड न करता राजीनामा दिला. एकदा तर त्यांनी राजकीय संन्यास घेऊन महाराष्ट्राला धक्का दिला होता. त्यानंतर परत सक्रिय होऊन मुख्यमंत्रिपद भूषविले. खासदार झाले. कॉँग्रेसचे सरचिटणीस झाले. उत्तर प्रदेश आणि बिहारचे पक्षाचे प्रभारी झाले. किसान सेलचे नेतृत्व केले. पुन्हा मुख्यमंत्री झाले. राज्यपाल झाले.
त्यांच्या बंडखोर वृत्तीनेही सांगलीचे नाव सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत राहिले. वास्तविक पश्चिम महाराष्ट्राचे राज्याच्या राजकारणावर वर्चस्व राहिले. त्या पश्चिम महाराष्ट्रात सांगली नेहमीच आघाडीवर राहिली. म्हटले तर सांगली ही कायमच महाराष्ट्राची राजकीय राजधानीच्या रूपात झळकत राहिली. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा अनेकवेळा येथूनच ठरत राहिली. या सर्वांचा परिणाम म्हणजे काँग्रेसचा दबदबा कायमच राजकीय क्षितिजावर राहिला. विरोधी पक्षांना फारसे स्वतंत्र स्थान किंवा त्यांचा दबदबा निर्माण करता आला नाही. इतका सर्वांगीण प्रभाव या पक्षाचा आणि वसंतदादा पाटील यांचा होता. तसे ते नेहमीच अपराजित राहिले.
अशा पार्श्वभूमीवरील सांगली जिल्ह्याच्या राजकारणाने आता त्यांच्या निधनाला तीन दशके होत असताना नवे वळण घेतले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर १९५७च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पहिला पराभव झाला; पण त्यानंतर २०१४ पर्यंत दोन पोटनिवडणुकांसह झालेल्या पंधरा लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा एकतर्फी विजय होत राहिला. अनेकवेळा वसंतदादांचे खंदे कार्यकर्ते खासदार झाले. १९८० नंतर वसंतदादांच्या घरातच खासदारकी राहिली. २०१४ मध्ये प्रथमच निर्णायक पराभव झाला. ते तसे पहिलेच वळण होते. पुढे विधानसभेच्या निवडणुकीतही पराभव झाला. एक खासदार आणि चार आमदार भाजपचे निवडून आले. १९९५ पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत भाजपचे चिन्ह घेऊन जाण्याचे धाडसही कोणी करत नव्हते. कारण त्या पक्षाच्या चिन्हाला सांगली जिल्ह्यात मते मिळत नव्हती. आता जिल्हा परिषदेवरही म्हणजे ग्रामीण भागातूनही भाजपला बहुमत मिळाले. महानगरपालिकेत प्रथमच बहुमताने भाजप सत्तेवर आला. यापूर्वी दोन आकडी नगरसेवकही निवडून यायचे नाहीत. मागील जिल्हा परिषदेच्या सभागृहापर्यंत भाजपचा पन्नास वर्षांत एकही सदस्य निवडून आला नव्हता. आता या पक्षाची सत्ता आहे. या पक्षाचे नेतृत्व करणारे अनेक पदाधिकारी आणि त्यांची पार्श्वभूमी पूर्वाश्रमीचे काँगेसवासीय अशीच आहे; पण पक्ष बदलला आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपतर्फे लढणारे मूळ भाजपवाले नाहीत. मात्र, आता त्या पक्षाची सत्ता आली आहे.
हा सर्व लक्षणीय बदल आहे. असा बदल होईल असे या निवडणुकीचे वार्तांकन करणाऱ्या एकाही पत्रकारास वाटले नव्हते. राजकीय अभ्यासकांना वाटले नव्हते. त्याची कारणे सांगलीच्या राजकीय वाटचालीत आणि वारशात आहेत. त्यामुळेच ‘दादांच्या सांगलीत कमळ!’ हे शीर्षक अनेकांना धक्कादायक बातमीप्रमाणे वाटले. हा बदल आहे. त्या बदलास काँग्रेसने वसंतदादा पाटील आणि वर उल्लेख केलेल्या अनेक बड्या नेत्यांच्या निधनानंतर जी वाटचाल केली, ती कारणीभूत आहे. याचे सर्वांत जवळचे उदाहरण वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचा आधार घेत राजकारण करणाºया त्यांच्या नातेवाइकांचेच द्यावे लागेल. त्यांच्यापैकी एकजणही कर्तृत्व दाखवू शकले नाहीत. लोकांचे प्रचंड प्रेम, पाठिंबा, सदिच्छा होत्या. त्या अनेकवेळा व्यक्तही झाल्या; पण त्या कायमच राहणार आहेत, असे त्यांनी गृहित धरले. आपण काहीही केले नाही तरीही त्या राहणार आहेत, असाच त्यांचा व्यवहार राहिला. दादांनी एवढे करून ठेवले आहे की, त्याच्याच आधारावर अनेक पिढ्या पोसल्या जाणार आहेत, असाच त्यांचा समज झाला. मात्र, समाज बदलला, गरजा बदलल्या, अपेक्षा बदलल्या, मागण्या बदलल्या, त्या पूर्ण करण्यासाठीची धडपड काही निर्माण होऊ शकली नाही. एवढेच नव्हे, तर राज्याच्या विकासात एक मॉडेल म्हणून उभ्या केलेल्या वसंतदादा यांच्या संस्थाही टिकविता आल्या नाहीत. यात सामान्य माणसांचा काय दोष? त्यांनी किती एकतर्फी प्रेम व्यक्त करीत राहावे?
आता सांगलीने एक पूर्ण नवे वळण घेतले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील हे एक मोठे वळण आहे. सांगलीने पश्चिम महाराष्ट्रावर दबदबा निर्माण करीत राज्याच्या राजकारणाचे वळण ठरविले. त्याच सांगलीचे हे वळण आहे. त्याची गांभीर्याने सर्वच राजकीय पक्षांनी नोंद घ्यावी लागणार आहे. कृष्णा नदीकाठावरचे एक समृद्ध शहर गेल्या काही वर्षांत मागे मागे राहत चालले आहे. ग्रामीण भागातील थोडीफार शेती विकसित झाली. सहकार चळवळ जिल्ह्यात बºयापैकी टिकून (सांगलीतील सोडून) राहिली. या जमेच्या बाजू सोडल्या तर सांगली हे न विकसित होणाºया शहरांपैकी एक ठरले आहे. शहराची रचना बदलली, पर्यावरण कोलमडले, अस्ताव्यस्त विस्तार झाला. पुण्याखालोखाल एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर ही ओळख पुसत आली. गेल्या तीस वर्षांत तरुण भारत व्यायाम मंडळाचे एक स्टेडियम वगळता नवे सार्वजनिक काम उभे राहिले नाही. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जेदार परिसरही राजकीय गुंडगिरीचे केंद्र ठरू लागला. नाट्यपंढरी सांगलीत सर्वसोयीनीयुक्त नाट्यगृह नाही. कलाप्रदर्शनासाठी दालन नाही. बाजारपेठा नव्या उभ्या राहिल्या नाहीत. औद्योगिक वसाहती खुंटल्या आहेत. गुंठेवारीच्या विस्ताराने असंख्य उपनगरे सुधारित झोपडपट्ट्यासारख्या वसाहती झाल्या आहेत. मिरजेसारखे सुंदर शहर सर्वसमावेश करता आलेले नाही. त्याचा सांस्कृतिक वारसा जपता आलेला नाही. त्याच्या वैद्यकीय वारशात भर घालता आली नाही. (डॉ. पतंगराव कदम यांनी एक भव्य वैद्यकीय संकुल उभे केले आहे, हे सर्वच राजकीय नेत्यांच्या तुलनेत सांगलीला नवे रूप देणारे ठरले आहे.) याची नोंद निश्चितच करावी लागते. अशा काही अपवादाची वजाबाकी केली की, नवी भर शहरात झाली नाही.
राजकीय, सामाजिक ऐतिहासिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक, क्रीडा, आदी क्षेत्राचा देदीप्यमान वारसा असताना गेल्या तीन दशकांतील सांगलीचा प्रवास सकारात्मक नाही. नव्या वळणावर ही जबाबदारी भाजपवर येऊन पडली आहे, असे समजायचे का? त्यांनी ही जबाबदारी ओळखावी
लागेल. अन्यथा इतर पक्षांतून घेतलेल्या उपऱ्या आणि उसन्या कार्यकर्त्यांच्या जिवावर सांगलीला सोडून दिले तर नवे वळण लोकांच्या अपेक्षांचा चुराडा करून सोडेल. हे नवे वळण खूप वेळाने घेतले आहे, त्याचा सकारात्मक वापर व्हायला हवा. सर्वसमावेश व्हायला हवा. कारण सांगली-मिरज-कुपवाड हे शहर सर्वसमावेश समाजमनाचे आहे. संकुचित विचाराचे नाही, ते नव्हते. त्यामुळे वसंतदादांच्या वारशाचा उल्लेख नेहमी करावा लागला आणि विरोधकांनाही दादांच्यानंतर सांगलीचे काही भले झाले नाही, अशी टीका करावी लागली. हा काळाचा महिमा आहे, तो स्वीकारावा लागेल.