रोज परीक्षा, रोज निकाल!

By admin | Published: February 3, 2017 06:57 AM2017-02-03T06:57:58+5:302017-02-03T06:57:58+5:30

आयुष्याची शाळा रोज भरते. दिवस उजाडला की ती सुरू होते आणि दिवस मावळला की बंद होते. तिथे दांडी मारायला संधी नसते. आयुष्याच्या शाळेत मधली सुट्टीही नसते.

Daily exams, daily results! | रोज परीक्षा, रोज निकाल!

रोज परीक्षा, रोज निकाल!

Next

- प्रल्हाद जाधव

आयुष्याची शाळा रोज भरते. दिवस उजाडला की ती सुरू होते आणि दिवस मावळला की बंद होते. तिथे दांडी मारायला संधी नसते. आयुष्याच्या शाळेत मधली सुट्टीही नसते. तिथे फक्त एकदाच सुट्टी मिळते आणि तीसुद्धा सर्वात शेवटी ! आणि ती एकदा मिळाली की पुन्हा शाळेत जाण्याची वेळ येत नाही.
एकदा माणूस जन्माला आला की, आयुष्याची शाळा त्याला कंपल्सरी असते. त्याच्या मनात असो किंवा नसो रोज त्याला त्या शाळेत जावेच लागते. इतकेच नाही तर आयुष्याच्या या शाळेत रोज परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचा निकाल रोज लागतो आणि त्यात प्रत्येकाला रोज पास व्हावे लागते. एखाद्याला नापास व्हायचे असेल तर तो जगण्याऐवजी मरणाला शरण गेला आहे असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात, असा माणूस जगण्याची आव्हाने पेलण्यास असमर्थ म्हणजेच पळपुटा ठरतो. जगात त्याची नाचक्की होते. मात्र आयुष्याच्या या शाळेची गंमत ज्याला कळते त्याच्यासारखा सुखी तोच ! रोजच्या जगण्यात एकदा का तो आनंद घेऊ लागला की त्याचे सारे जीवन सुखकर होऊन जाते.
आयुष्याच्या शाळेत सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र हे प्रहर, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू वेगवेगळे अनुभव घेऊन येतात. या साऱ्या अनुभवाना समान आनंदाने सामोरे जाण्याची माणसाची तयारी माणसाला ठेवावी लागते. इतकेच काय, सुख आणि दु:ख किंवा गरिबी आणि श्रीमंतीसारख्या स्थितीतही उतमात न करता किंवा खचून न जाता आनंदाने आणि धीराने सामोरे जाण्याची तयारी त्याला ठेवावी लागते. सारे प्रहर, सारे ऋतू, आनंद, दु:ख हा आयुष्याच्या शाळेतील अभ्यासक्र माचा भाग असतो. त्यावर आधारित त्याची परीक्षा नेहमी सुरू असते. उन्हाळ्यातील घामाच्या धारा, हिवाळ्यातील थंडीचा कडाका, पावसाळ्यातील जलधारांचे तांडव... सारे काही माणसाने मनापासून अनुभवले पाहिजे, त्याला दाद दिली पाहिजे, त्यापासून शिकले पाहिजे. अडचणी आणि दु:ख वाट्याला आले तर त्याचेही स्वागत करून त्यापासून शिकले पाहिजे. देवाची मूर्ती घडताना त्यालासुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात, तर माणसाची काय कथा ?
जो माणूस ह्या परीक्षेत पास होतो त्याच्यावर आयुष्य भरभरून प्रेम करते, त्याच्या स्वप्नातही नसेल असा त्याचा फायदा करून देते. असा माणूस इतरांचा आदर्श ठरतो, लोक त्याचा सल्ला घेण्यासाठी जातात, त्याच्यासमोर विनम्र होतात. मात्र एकदाच पास होऊन त्याला थांबता येत नाही, रोज नवी परीक्षा होणार आहे हे त्याला माहीत असते, आणि त्यासाठी तो हसतमुखाने, आनंदाने तयार असतो.

Web Title: Daily exams, daily results!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.