कट्ट्यावरचं दैनिक

By admin | Published: December 19, 2014 03:46 PM2014-12-19T15:46:49+5:302014-12-19T15:46:49+5:30

दादरचा आमचा शिवाजी पार्कचा कट्टा म्हणजे एक न छापले जाणारे दैनिक आहे. दैनिक तर आहेच; पण शिवाय त्याचे विशेषांकही निघत असतात.

Daily on Katta | कट्ट्यावरचं दैनिक

कट्ट्यावरचं दैनिक

Next

दादरचा आमचा शिवाजी पार्कचा कट्टा म्हणजे एक न छापले जाणारे दैनिक आहे. दैनिक तर आहेच; पण शिवाय त्याचे विशेषांकही निघत असतात. सणवारी निघणारे अंक, निवडणुकीच्या आधी व दरम्यान आणि नंतर निघणारे विश्लेषणात्मक खास अंक (यात फक्त विविध पक्षांच्या पाठीराख्यांच्या टीकाटिपण्या असतात. खरं म्हणायचं तर प्रत्येक म्हणणं हे सर्व दैनिकांच्या अग्रलेखासारखं अपुऱ्या ज्ञानावर; पण तरीही दणकून सांगितलेलं असतं आणि प्रत्येक अग्रलेखाचा सूर हा दुसऱ्या कोणीतरी काहीतरी हालचाल केली नाही तर आपल्या बुद्धिजीवी वर्गाचे हाल कुत्रा खाणार नाही हा असतो. हे म्हणणारे बरेचसे जीवी असतात; पण त्यांच्या त्या सतत किरकिर करणाऱ्या देहात बुद्धीचा वास असतो की नाही, हा संशोधनाचा विषय आहे) शिवाय क्रिकेटच्या सामन्यांच्या आधी निघणारे खास क्रीडाविषयक अंकही असतात. या आमच्या मौखिक दैनिकाला वर्गणी नाही. कुणीही यावं कट्ट्यावर दोन घटका बसावं आणि दैनिक ऐकून जावं. या दैनिकात जाहिराती आहेत; पण दिसत नाहीत. माझा मुलगा आता अमेरिकेतल्या अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणी गेला, असं सांगणारा माणूस आपल्या कौटुंबिक सुखी आणि यशस्वी जीवनाची जाहिरातच करत असतो. एखादा अचानक तीन-चार महिन्यांनंतर पुन्हा सकाळी फिरायला येतो, तेव्हा त्याच्या अंगावर अत्यंत महागडा, तलम असा फिरायचा पोषाख असतो. ती; बघा! मी आताच परदेशातून मुलाकडून वा मुलीकडून आलो आहे, अशी जाहिरातच असते. एखादा माणूस जर अचानक इथल्या सगळ्या व्यवस्थेबद्दल तिणकून बोलायला लागला की समजावं याला आपल्या मुलामुळे किंवा मुलीमुळे नुकताच परदेश प्रवास घडला आहे. अर्थात आमच्या पार्कात खटास महाखटही मुबलक आहेत. ते लगेच, चला! आता परदेश पुराण खूप झालं, जाऊन रस्त्यावर भाजी घ्यायची आठवण ठेवा. तिथे इथल्यासारखा भैया नाहीये, असं म्हणून अमेरिकेचं विमान खाली उतरवतात. इथल्या कट्ट्यावरच्या शंभर मीटरच्या परिसरात तुम्हाला फार विद्वान लोक आपलं ज्ञान फुकटात वाटताना दिसतील. मोदींनी देश कसा चालवला पाहिजे, हे सांगणाऱ्या माणसाला भले आपला स्वत:चा जीर्ण देह चालवता येत नसेल; पण त्याने काही बिघडत नाही, तो त्याचं मत ठणकावून मांडणार. तुम्ही जर एका जागी न बसता फिरायचं ठरवलंत तर मग एक-दोन फेऱ्यांनंतर तुम्हाला संपूर्ण महादैनिक ऐकायला मिळतं. मागून येणारी एखादी बाई आपल्या सुनेबद्दल म्हटलं तर कौतुक म्हटलं तर टीका, अशा भाषेत बोलताना ऐकू येते. एखादा व्यायामपटू धावधाव धावून शेवटची फेरी चालत असताना एखाद्या नवीन भावी व्यायामपटूला त्याचं व्यायाम करताना नेमकं काय चुकतंय, हे सांगताना दिसतो. तीन ते पाच जणांची फळी करून अख्खा रस्ता अडवत सगळ्या जगाची भाषा गुजराती आहे, असा समज पक्का करून त्या भाषेत मोठमोठ्याने, वेगवेगळया कंपन्यांची नावं घेत, लाखो करोडो रुपयांचे आकडे एकमेकांच्या आणि लोकांच्या तोंडावर फेकत जात असतात. काही मध्यमवयीन स्त्रिया अजून आपल्यात तरुणपणातलं काही उरलंय असं इतर फिरणाऱ्यांना वाटतंय का, याचा अंदाज घेत फिरत असतात, आणि गेली अनेक वर्षे अशा नवनवीन भगिनी येत आहेत याचा अर्थ त्यांच्या मनातल्या शंकांचं त्यांना हवं तसं समाधान करणारे बंधू फिरत असतात, आहेत असाच होतो. (आपण भगिनी आणि बंधू म्हणावं, तेवढाच आपला स्वच्छ हेतू दिसून येतो) ही अशी काही छुपी दैनिकं आहेत, जी ऐकू येत नाहीत; फक्त त्याची जाणीव होते. काही जोडपी येतात; त्यातले पुरुष हे जरा चतुर असतात. त्यांना बरोबर मानेचे व्यायाम कधी करावेत यांची जाणीव असते. अर्थात त्यांच्या बायकाही विलक्षण चतुर असतात, जिच्यासाठी व्यायाम करायचा ती दूर गेली की त्या लगेच आपल्या नवऱ्यांना आता पुरे! मलासुद्धा आता वेळ नाही तुमच्याकडे बघायला उगाच कोण बघणार? असं ठणकावून त्यांच्या स्वप्नांचा रथ जमिनीवर आणतात. हे दैनिक वाचायचं असेल तर कान तीक्ष्ण हवेत आणि स्वभाव भोचक हवा. आमचा एक फिरायचा दहा-बारा जणांचा एक गट होता. आज त्यातले बरेच जण नाहीत. पण लोणकर आणि नंदू जुकर हे दोन अर्क. त्यांच्या स्वभावात काय होतं माहीत नाही; पण सगळे जण आपल्या मनातल्या गोष्टी ‘तुुम्हाला म्हणून सांगतो..’ असा स्टार्टर मारून सांगायचे. (खरं तर ‘तुुम्हाला म्हणून सांगत्ये..’ हेच बरेचदा असायचं).. तुम्हाला म्हणून असं बऱ्याच जणांना सांगितलं की त्याची बातमी होऊन सगळ्यांपर्यंत आली की ऐकणारा चकित व्हायचा; पण हे दोघे निराकार असायचे....हो! आम्हांला माहीत होतं.. एवढंच त्यांचं म्हणणं असायचं. आज नंदूशेठ हयात नाहीत आणि लोणकर पुण्याला असतात. त्यामुळे एका जागी बसून महादैनिकाची रोजची कॉपी आम्हाला मिळत नाही. त्यासाठी फिरावं लागतं; परंतु नेमकं काय ऐकायचं आणि काय नाही हे तारतम्य आम्हाला नाही. त्यामुळे सगळी कॉपी ऐकली तरी ऐकल्याचं समाधान मिळत नाही आणि दिवस अपुरा वाटतो.

संजय मोने
प्रसिद्ध अभिनेते व लेखक

Web Title: Daily on Katta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.