पूर्ववैभवासाठी कॉंग्रेसचे दक्षिणायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:48 AM2021-03-10T00:48:41+5:302021-03-10T00:49:08+5:30
मिलिंद कुळकर्णी स्वातंत्र्यपूर्व काळी स्थापन झालेला कॉंग्रेस हा पक्ष सध्याच्या अवस्थेत सगळ्यात बिकट परिस्थितीत आहे. या पक्षाला पूर्ववैभव मिळवून ...
मिलिंद कुळकर्णी
स्वातंत्र्यपूर्व काळी स्थापन झालेला कॉंग्रेस हा पक्ष सध्याच्या अवस्थेत सगळ्यात बिकट परिस्थितीत आहे. या पक्षाला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी राहुल गांधी यांनी दक्षिणायन सुरु केले आहे. जाणीवपूर्वक त्यांनी केरळ, तामिळनाडू या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांची उक्ती आणि कृती ही दक्षिणेतील कॉंग्रेसचा पाया मजबूत करण्याकडे दिसत आहे. भगिनी प्रियंका गांधी यांचीही त्यांना चांगली मदत मिळत आहे.
भाजपच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य असलेल्या राहुल गांधी यांनी अलिकडच्या काळात उपस्थित केलेल्या मुद्यांनी, कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपला वेळोवेळी अडचणीत आणल्याचे दिसून आले. लोकसभेत पंतप्रधान मोदी यांना दिलेले आलिंगन आणि त्यानंतरचा नेत्रकटाक्ष अचंबित करणारा तसेच चर्चेचा विषय ठरला होता. जानवे घालून मंदिरांमध्ये पूजा करण्याच्या त्यांच्या कृतीने पक्षाला उजव्या विचारसरणीचे वावडे नसल्याचे दाखवून दिले. कोरोनाचे संकट देशावर घोंगावत असल्याचे भाकित करणारा हा देशातील पहिला नेता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकार हे अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतात गुंतले असताना राहुल गांधी यांनी कोरोनासंबंधी उपाययोजना करा, असे आवाहन केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी तर भारताला कोरोनापासून धोका नाही, असे विधान केले होते. हाथरस येथील दलित तरुणीवर झालेला अत्याचार, शेतकरी आंदोलनात घेतलेला सक्रीय सहभाग, लोकसभेत कृषी कायदे व शेतकरी आंदोलनाविषयी भाषण करताना ‘हम दो, हमारे दो’ ची केलेली फोड, आणीबाणी ही आजी (स्व. इंदिरा गांधी)ची चूक होती ही दिलेली कबुली हे सारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेला आमूलाग्र बदल दर्शवत आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुद्दुचेरी वगळता कोणत्याही राज्यात कॉंग्रेस सध्या सत्तेवर नाही. अर्थात तेथील सत्तादेखील शेवटच्या टप्प्यात गेली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी तामिळनाडू व केरळ या दोन राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
तामिळनाडू, केरळात वाढता जनाधार
कॉंग्रेस आणि गांधी घराण्याला दक्षिणेने अधिक प्रेम दिले, या राहुल गांधी यांच्या विधानाने चर्चा घडवून आणली. बहुदा त्यांचा अंगुलीनिर्देश हा अमेठीतील पराभव आणि वायनाडमधील विजयाकडे असेल. त्यांच्या आजी स्व. इंदिरा गांधी यादेखील १९७८ मध्ये चिकमंगळूर (कर्नाटक) येथून पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. आणीबाणीमुळे जनतेत कॉंग्रेसविषयी असलेली नाराजी आणि जनता पक्षाचे केंद्रात स्थापन झालेले सरकार या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीतील विजय कॉंग्रेसजनांसाठी प्रोत्साहक ठरला. १९८० मध्ये पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत परतल्या. माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची हत्या तामिळनाडूतील श्री पेरुम्बुदूर येथे झाली. त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या आरोपींविषयी कालांतराने गांधी परिवाराने संवेदना प्रकट केली. या बाबी दक्षिणेतील कॉंग्रेसच्यादृष्टीने जमेच्या बाजू आहेत. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारताकडे राहुल गांधी यांचे अधिक लक्ष का आहे, याची कारणमीमांसा केली जात आहे. उत्तर भारतात भाजपचे प्राबल्य हा कॉंग्रेसच्यादृष्टीने अडचणीचा मुद्दा आहे, तो दक्षिणेत नाही. २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये एकमेव आमदार तर तामिनळनाडूत भोपळादेखील भाजपला फोडता आला नव्हता. केरळमध्ये पाच वर्षांने आलटून पालटून कॉंग्रेस आणि डावे पक्ष सत्तेत येत असतात. तामिळनाडूमध्ये द्रमुक यांच्यासोबत कॉंग्रेसची आघाडी असून यंदा विजयाची अधिक शक्यता आहे. दक्षिणेतील आणखी एक राज्य म्हणजे कर्नाटकात कॉंग्रेस तुल्यबळ आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत त्यांनी सत्ता राबविली आहे. सिध्दरामय्या यांच्यासारखा नेता पक्षाजवळ आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना राज्यसभेतील नेतेपद देऊन पक्षाने सन्मान दिला आहे.
वायनाड लोकसभा मतदारसंघामुळे राहुल गांधी यांचा केरळात संपर्क वाढला आहे. ज्येष्ठ नेते ए.के.ॲंटोनी, शशी थरुर, माजी मुख्यमंत्री ओमान चांडी, रमेश चेन्नीथला, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मुलापल्ली रामचंद्रन, खासदार के.सुधाकरन, माजी खासदार के.सी.वेणुगोपाल अशी नेत्यांची फौज कॉंग्रेसकडे आहे. या राज्यातील ४७ टक्के जनता ख्रिश्चन व मुस्लिम आहे. इंडियन युनियन मुस्लीम लीग ही अनेक वर्षांपासून कॉंग्रेस आघाडीतील घटक पक्ष आहे. सर्वेक्षण डाव्या पक्षाला पुन्हा संधी असल्याचा दावा करीत आहे. या पार्श्वभूमीवर १९८० पासून आलटून पालटून सत्तेचा खेळ यंदा कायम राहतो काय, याची उत्सुकता राहणार आहे.
(लेखक लोकमतच्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)