दक्षिणायन : मंगलमय यशासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:27 AM2018-01-30T00:27:03+5:302018-01-30T00:28:00+5:30

लोकशाही ही केवळ राज्यपद्धती नाही. ती सामाजिक प्रवृत्तीही आहे. लोकशाहीतील सरकार सहिष्णु असावे लागते आणि त्याला टीका समजून घेऊन तीनुसार आपल्या कार्यशैलीत बदल करणेही जमावे लागते. लोकशाही समाजही त्याच्या दोषांवर होणारी टीका सहन करणारा व तीनुसार आत्मपरीक्षण करणारा असावा लागतो.

 Dakshinayan: For a Successful Success ... | दक्षिणायन : मंगलमय यशासाठी...

दक्षिणायन : मंगलमय यशासाठी...

Next

- सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)

लोकशाही ही केवळ राज्यपद्धती नाही. ती सामाजिक प्रवृत्तीही आहे. लोकशाहीतील सरकार सहिष्णु असावे लागते आणि त्याला टीका समजून घेऊन तीनुसार आपल्या कार्यशैलीत बदल करणेही जमावे लागते. लोकशाही समाजही त्याच्या दोषांवर होणारी टीका सहन करणारा व तीनुसार आत्मपरीक्षण करणारा असावा लागतो. सरकारचे नेतृत्व अहंमन्य असेल तर संवैधानिकदृष्ट्या ते लोकशाही असले तरी प्रत्यक्षात हुकूमशाहीच असते. तसेच धर्म व जातींसारख्या अस्मितांनी ग्रासलेला समाजही असहिष्णु व प्रसंगी हिंस्र होत असतो. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी यांच्या हत्यांमागे अशाच आत्मग्रस्त व हिंस्र प्रवृत्ती आहेत. अंधश्रद्धा जावी, समाजाने वैज्ञानिक दृष्टी स्वीकारावी, त्याची इतिहासगामी दृष्टी वर्तमान व भविष्याकडे वळावी आणि सत्याला सामोरे जाण्याचे धाडस राजकारणात व समाजकारणात यावे यासाठी आयुष्य पणाला लावणारी ही माणसे होती. त्यांच्या खुनाला जबाबदार असणाºया असहिष्णु प्रवृत्ती समाजकारणासारख्याच राजकारणातूनही जाव्या या हेतूने सुरू झालेली चळवळ म्हणजे दक्षिणायन. डॉ. गणेश देवी या भाषाप्रभू प्राध्यापकाने त्याच्या सर्वस्वावर पाणी सोडून तिचा आरंभ केला. त्यासाठी सरकारने दिलेले सारे सन्मान परत केले. पुढे तसे करणारी ज्ञान व विज्ञानाच्या क्षेत्रातील अधिकारी माणसे एकत्र आली आणि त्यांनी या चळवळीला बळ दिले. गांधी आणि आंबेडकरांनी दिलेली अहिंसक वृत्ती व कायद्याविषयीचा आदर ही मूल्ये घेतलेली ही चळवळ दांडी या गांधींनी मिठाचा सत्याग्रह केलेल्या जागी सुरू झाली आणि आता ती गोवामार्गे महाराष्ट्रात पोहोचली आहे. लेखक, कवी, कलावंत व सांस्कृतिक क्षेत्रात जगणाºया माणसांचे प्राण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्याशी जुळले असतात. ते स्वातंत्र्य नसेल तर या कला जन्मालाच येत नाहीत. या क्षेत्रातील संवेदनशील प्रवृत्तींना आवाहन करून व त्यातील सहयोगी एकत्र आणून ही लोकशाही यात्रा गेली दोन वर्षे वाटचाल करीत आहे. या यात्रेत आता राजमोहन गांधी व प्रकाश आंबेडकर यासारखी समाज व राजकारण या क्षेत्रातील वजनदार माणसेही भाग घेऊ लागली आहेत. हा सहभाग असाच वाढला तर आज कला क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली ही चळवळ उद्या लोकचळवळीत परिवर्तीत होऊ शकेल व तसे होणे गरजेचेही झाले आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हा कुणा एका वर्गाचा विशेषाधिकार नाही, तो समाजाचा हक्क आहे. किंबहुना त्यातील वंचितांच्या वर्गांची ती गरजही आहे. धनवंतांची कामे टेलिफोनवरूनही होतात. या वर्गांना मात्र त्यांच्या प्रश्नांसाठी संघटित होऊन आक्रोशच करावा लागतो.
सरकार असिहष्णु व त्याला साथ देणारा समूह अहंमन्य असेल तर त्यांना वठणीवर आणणे हे केवळ कलाक्षेत्राचे उत्तरदायित्व नाही, ती समाजाचीही जबाबदारी आहे. १९७४ मध्ये सरकार न्यायालयांसह जनआक्रोशाकडे दुर्लक्ष करताना दिसले तेव्हा जयप्रकाशांनी जी सप्तक्रांतीची चळवळ उभारली तीत त्यांनी केवळ साहित्यिक व कलावंतांचे सहकार्य मागितले नाही. त्यासाठी त्यांनी सहविचारी राजकीय पक्षांनाही सहभागाचे आवाहन केले. त्यासाठी संघाच्या व्यासपीठावरही ते सहकार्याचे आमंत्रण घेऊन गेले. कोणतीही चळवळ जोवर जनआंदोलनात विकसित होत नाही तोवर ती परिणामकारक होत नाही व ज्यांनी तिचा आक्रोश ऐकायचा ती सत्तेतली अहंमन्य माणसे तो ऐकूनही घेत नाहीत.
दक्षिणायनचे स्वागत करताना नेमका हा विचार मनात येतो. या चळवळीचे मागणे राजकीय नाही. ते कुणा एका वर्गाला सवलती मागण्यासाठीही नाही. अभिव्यक्ती हा व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यावर समाजाचा ताबा नाही आणि सरकारचेही नियंत्रण नाही. माणसाला माणूस म्हणून जगायचे आणि विकसित व्हायचे असेल तर त्याचा हा अधिकार जपणे हीच खºया लोकशाहीची मागणी आहे. दक्षिणायन या मागणीमागे उभे आहेत. व्यक्तीचा विकास हीच समाजाच्या विकासाची खरी कसोटीही आहे. गांधीजींनी त्यांच्या आणि मार्क्सच्या विचारातील अंतर सांगताना म्हटले ‘मार्क्स समाजापाशी सुरू होतो आणि व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, मी व्यक्तीपाशी सुरू होतो आणि तिच्याचसाठी काम करतो’. माणसे विकसित झाली की समाजाच्या विकासाची वेगळी व्यवस्था करावीही लागत नाही. समूहांना हाताशी धरून आजवर झालेल्या चळवळींनी समाजात ऐक्य साधले की त्यात फूट पाडली? वर्गांचे वर्गांविरुद्ध, जातींचे जातींविरुद्ध आणि धर्मांचे धर्मांविरुद्ध झालेले व होत असलेले संघर्ष माणसांना जवळ आणतात की त्यांची विभागणी करून त्यातील अंतरात विष पेरतात? आपल्या घटनेने न्याय, स्वातंत्र्य व समता या मूल्यांसोबत बंधुता या मूल्याचाही गौरव केला आहे. दुर्दैव याचे की न्याय, स्वातंत्र्य व समतेसाठी झालेले लढे बंधुतेकडे दुर्लक्ष करतानाच आजवर दिसले. द्वेष ही ममत्वाहून सामर्थ्यशाली वृत्ती आहे काय? आणि ती तशी असली तरी तिचे शमन करायचे की नाही?
धर्मांधता, जात्यंधता आणि संकुचित अहंता जोवर समाजात असतात तोवर त्यात बंधुत्वाची भावना विकसित होत नाही व ती झाल्याखेरीज राष्टÑ-निर्माण होत नाही आणि माणुसकीचा धर्मही विकसित होत नाही. माणूस हा माणूस म्हणून मोठा व्हायचा असेल तर त्याला त्याचा विचार, मत व प्रसंगी लहरही सांगता आली पाहिजे. बालादपि सुभाषितम् ग्राह्यम् हे विधान तोच संदेश देणारे आहे. शिवाय अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यही अमर्याद वा बेजबाबदार नसते. त्यावरील विवेकाच्या मर्यादा आंबेडकरांनी घटनेतच नोंदवून ठेवल्या आहेत. त्या सांभाळणारा प्रत्येकजण त्याचे मत, मग ते एखाद्या पक्षाला, वर्गाला, समूहाला, धर्माला व जातीला आवडणारे असो वा नसो, मांडू शकलाच पाहिजे. दक्षिणायनची वाटचाल अशी आहे व तशीच ती राहावीही.
एका गोष्टीची खबरदारी मात्र सगळ्याच लहान चळवळी लोकचळवळीत रूपांतरित होण्याआधीपासूनच घ्यायची असते. आपला लढा लोकलढा असला तरी तो शांततामयच राहील याची खबरदारी गांधीजी घेत. त्यासाठी नेत्यांचा हिरमोड करूनही ते आपल्या चळवळी थांबवीत. त्याचमुळे हिंसाचाराचे समर्थन व शस्त्राचाराला मूक मान्यता देणारी माणसे आपल्या चळवळीत येणार नाहीत याची काळजी तिच्या नेत्यांनी घ्यायची असते.
चळवळ मोठी व्हावी म्हणून येतील ते सारे चालतील ही वृत्ती चळवळीचे यश डागाळणारी ठरते. सरदार पटेलांनी त्यांच्या पक्षात घुसलेली अशी माणसे १९४६ मध्ये केवढ्या कठोरपणे काढून दूर केली याची आठवणही या चळवळीला शुभेच्छा देताना करून देणे आवश्यक आहे. ही चळवळ वाढावी आणि तिने समाजाची नैतिक ताकद एवढी उभी करावी की तिच्यापुढे सत्तांधांनाही नमते घ्यावे लागेल.

Web Title:  Dakshinayan: For a Successful Success ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.