साहित्य क्षेत्रातील दमदार ‘दमसा’

By admin | Published: January 15, 2016 03:01 AM2016-01-15T03:01:21+5:302016-01-15T03:01:21+5:30

विभागीय, ग्रामीण साहित्य संमेलनांची प्रेरणास्थान आणि साहित्यक्षेत्रातील एक दमदार संस्था दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे (दमसा) २७वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन कोल्हापुरात

Damsa 'Damsa' in literature sector | साहित्य क्षेत्रातील दमदार ‘दमसा’

साहित्य क्षेत्रातील दमदार ‘दमसा’

Next

- वसंत भोसले

विभागीय, ग्रामीण साहित्य संमेलनांची प्रेरणास्थान आणि साहित्यक्षेत्रातील एक दमदार संस्था दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे (दमसा) २७वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन कोल्हापुरात तितक्याच दमदार पद्धतीने पार पडले.

साहित्य क्षेत्रात दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (दमसा)ही एक दमदार संस्था आहे. प्रादेशिक किंवा ग्रामीण साहित्य संमेलनाची ती पे्ररणासंस्थाच म्हणायला हवी कारण १९८२ पर्यंत साहित्यिकांना आपला साहित्य उत्सव साजरा करण्यासाठी केवळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हेच एकमेव व्यासपीठ होते. या साहित्य संमेलनावर पुण्या-मुंबईच्या साहित्यिक-लेखकांचे वर्चस्व असायचे त्यामुळे अन्य शहरातील तसेच ग्रामीण भागातील साहित्यिकांना आपल्या साहित्यकृतींचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी तसेच आपले विचार मांडण्यासाठी स्वतंत्र असे व्यासपीठच नव्हते. कोल्हापूर, सांगली साताऱ्यातील १९६० च्या दशकानंतर लिहिते झालेल्या साहित्यिकांना याची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली. ती भरुन काढण्यासाठी चंद्रकुमार नलगे, प्रा. देवदत्त पाटील, शंकर पाटील, कृ. गो. सूर्यंवशी, शाम कुरळे प्रभुतींनी एकत्र येवून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा स्थापन करण्याचा आणि या सभेच्या वतीने साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. याला पुण्या-मुंबईतील साहित्यिकांनी जोरदार विरोध केला. मात्र माजी उपमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पाठबळामुळे ही साहित्य सभा तर स्थापन झालीच. शिवाय तिने स्थापनेच्या वर्षीच म्हणजे १९८२मध्येच पहिले दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन भरवले. या संमेलनाच्या यशस्वीतेनंतर अन्य भागातील साहित्यिकांनाही बळ मिळाले आणि साहित्यिकांच्या विभागवार संघटना स्थापन झाल्या. साहित्य संमेलनेही भरू लागली. आज तर ग्रामीण जिल्हा, तालुकास्तरावरील तसेच ग्रामीण साहित्य संमेलनांची मांदियाळीच झाली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षाच्या विधानावरून तिकडे रण पेटलेले असतानाच इकडे कोल्हापुरात दमसाचे २७ वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन रंगले होते. साहित्य रसिकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या संमेलनात सहिष्णुता आणि असहिष्णुता हा विषय प्रामुख्याने वक्त्यांच्या भाषणात चर्चेला येत राहिला. कारण सध्या देशातीलच तो एक चर्चेचा मुद्दा आहे. याशिवाय संयोजकांनी ‘महाराष्ट्र सहिष्णू आहे का?’ या विषयावर एक स्वतंत्र परिसंवादही ठेवला होता. केवळ जातीय, धार्मिक असहिष्णुताच नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिकसह वेगवेगळ्या क्षेत्रातील असहिष्णुतेवर या परिसंवादात चर्चा झडली.
या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अमेरिकेतील भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे होते. ‘दमसा’च्या मूळ संकल्पनेचा विस्तार म्हणजे त्यांची निवड असेही वाटते. कारण मुळे मुळचे कोल्हापुरात शिकलेले, लिहिते झालेले आहेत. त्यांच्या साहित्याचा बाज खास कोल्हापुरीच आहे. ज्या उद्देशाने प्रादेशिक विभागातील साहित्य आणि साहित्यिकांना मानाचे स्थान मिळावे, त्याची चर्चा व्हावी ही अपेक्षा केली गेली होती. त्याला न्याय तर संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांनी दिलाच, शिवाय मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुलभूत सूचनाही केल्या. बदलत्या भारतात आणि जगात मराठी भाषेचे आजचे स्थान काय? हा त्यांचा सवाल विचार प्रवर्तक तर आहेच शिवाय मराठी... मराठी अशी केवळ ओरड करून अस्मितेचा डांगोरा पिटत असताना बदललेल्या जागतिक वातावरणात मराठी अस्मितेचीच नव्याने व्याख्या करायला हवी, हेदेखील स्पष्टपणे त्यांनी सांगितले. वास्तविक कोल्हापुरच्या मातीत घडलेला लेखक आणि राजदूत म्हणून जगभर काम करणारा मराठी मनाचा माणूस म्हणून त्यांनी ‘दमसा’ च्या वैचारिक कक्षाच रूंदावून ठेवल्या आहेत. म्हणनू ‘दमसा’ ची सुरूवात ज्या परिस्थितीत झाली, त्या हेतूला न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. हीच तर ‘दमसा’ला नवी वाट चोखाळण्याची गरज वाटत होती, तो हेतू कोणताही साहित्यिक वाद न करता या संमेलनाने यशस्वी झाला आहे. त्याचा आदर्श इतरांनी घ्यायला हरकत नाही. जेणेकरून मराठी भाषेच्या समृद्धीत भरच पडेल.

 

Web Title: Damsa 'Damsa' in literature sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.