जालन्याच्या मैदानात दानवे-खोतकरांची खडाखडी

By सुधीर महाजन | Published: November 17, 2018 01:31 PM2018-11-17T13:31:07+5:302018-11-17T13:35:29+5:30

खोतकरांनी दंड थोपटले आता दानवे शड्डु ठोकणार की जमीन घट्ट पकडून खेळणार? 

Danav-Khotkar's dispute for Jalna Lokasabha | जालन्याच्या मैदानात दानवे-खोतकरांची खडाखडी

जालन्याच्या मैदानात दानवे-खोतकरांची खडाखडी

googlenewsNext

- सुधीर महाजन

सोन्याचा पाळणा असलेल्या जालन्यावर वर्चस्व कोणाचे हा प्रश्न येत्या लोकसभेच्या मैदानात निकाली निघणार आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी थेट भोकरदन मध्ये जावून दंड थोपटत खा. रावसाहेब दानवेंना आव्हान दिले. भाजपसाठी प्रदेशाध्यक्षाचा मतदारसंघ प्रतिष्ठेचा तर खोतकरांसाठी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न म्हणून ही कुस्ती झालीच तर रंगतदार निश्चित होईल. दानवे-खोतकर हे दोघेही युतीचे असले तरी त्यांनी युतीधर्म कधीच पाळलेला नाही आणि दोघांमध्ये एकमेकांना आजमावयाची खूमखूमी जुनीच आहे.

या दोघांमधील राजकीय संघर्षांचे कारण जिल्ह्याचा एकमुखी नेता कोण हाच मुद्दा अगदी मागेच जायचे ठरवले तर २००३ साली झालेल्या जि.प. निवडणुकीच्या वेळी जागावाटपावरून जि.प. अध्यक्षांच्या निवास्थानी या दोघांमध्ये हाणामारी झाली होती. पुढे २०१३-१४ साली झालेल्या बाजारसमितीच्या निवडणुकीत जागावाटपावरून वाद झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जालन्यात सेनेला मदत केली नाही असा आरोपच खोतकर करतात. त्याच पार्श्वभूमीवर आता खोतकरांनी आव्हान दिले हे काही नवीन नाही. 

खोतकरांची सध्याची परिस्थिती पाहता ते पर्यायाच्या शोधात आहेत. २०१४ साली काँग्रेस विरोधी लाट असतांना खोतकर केवळ २९६ मतांनी निसटते विजयी झाले होते. आता त्यांना पर्याय हवा आहे. लोकसभा मतदारसंघात सिल्लोड-सोयगावचा समावेश आहे; पण यावेळी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे दानवेंशी बिनसले तिकडे टोपे, गोरंट्याल ही विरोधात आहे. भोकरदनमध्ये खासदार, आमदार, जि. प. सदस्य अशी पदे दानवेंच्या घरातच असल्याने सुप्त असंतोष आहेच. बदनापूर, अंबड मध्ये दलित मुस्लीम मतावर डोळा ठेवत खोतकरांनी बेगमी केलेली दिसते. पैठण ही त्यांची सासुरवाडी तर फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि दानवे यांच्यातील बेबनाव सर्वश्रृत असल्याने एवढ्या दृश्य शिबंदीवर खोतकर मैदान मारण्याचा इरादा ठेवतात. शिवाय भाजपमधील लोणीकर गट, दिलीप तौर, विलास नाईकांसारखे भाजपमधील निष्ठावान, संघ परिवार यांच्याशी दानवेंचे पटत नाही. भोकरदनमध्ये चंद्रकांत दानवेंसारखी मंडळी रसदपुरवायला तयार आहेत. खोतकर मैत्रीपुर्ण लढण्याऐवजी काँग्रेसच्या वाटेवर दिसतात. जालन्यात गोरंट्याल यांना विधानसभा सोडायची. सत्तार यांच्यासोबत वाढलेली उठबस ही थेट काँग्रेसप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांशी तार जुळणारी आहेत. शिवाय देशभरातील ‘मोदी बुखार’ उतरला आहे. अशा गणिताच्या जोरावर या हालचाली दिसतात.

खा. दानवेसाठी खोतकरांची डोकेदुखी नवी नाही; पण घराणेशाहीचा मुद्दा मतदारसंघापेक्षा भोकरदनमध्ये चर्चेचा विषय आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी काही सुधारणा केल्या. पूर्वी जालना शहरात त्यांची उपस्थिती फारशी नसायची ही त्यांनी जाणीवपूर्वक वाढविली. जालन्यातील उद्योजकांना त्यांनी खोतकरांपासून दूर केले. मतदारसंघात निधी आणून कामे सुरू केली. शहरावर विशेष लक्ष दिले. या जमेच्या गोष्टी असल्यातरी लोणीकरांशी त्यांचे सूर जुळलेले नाहीत. भाजपमधील निष्ठावान आणि संघही त्यांच्याशी अंतर ठेवून आहेत. शेजारी अब्दुल सत्तारांची डोकेदुखी आहेतच. सगळीच सत्तेची पदे घरात विकास कामांची कंत्राटे नातेवाईकांना यामुळे पक्षातही नाराजी आहे; पण ती सध्या कोणी बोलून दाखवत नाही. त्यांच्या तंबूत सारेच काही आलबेल आहे. असे म्हणता येणार नाही. खोतकरांनी दंड थोपटले आता दानवे शड्डु ठोकणार की जमीन घट्ट पकडून खेळणार? 

Web Title: Danav-Khotkar's dispute for Jalna Lokasabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.