माणसं जोडणारा कर्तव्यदक्ष माणूस : उमाकांत दांगट

By admin | Published: December 31, 2016 04:52 AM2016-12-31T04:52:46+5:302016-12-31T04:52:46+5:30

उमाकांत दांगट...या माणसाची प्रश्नांकडे बघण्याची वृत्ती सकारात्मक आहे व प्रश्न मार्गी लावावेत असाच त्यांचाप्रयत्न राहिला. याचे कारण हे की त्यांचे मन संवेदनशील आहे व माणुसकीचा

Dancer who joins the man: Umakant dagat | माणसं जोडणारा कर्तव्यदक्ष माणूस : उमाकांत दांगट

माणसं जोडणारा कर्तव्यदक्ष माणूस : उमाकांत दांगट

Next

- राजेंद्र दर्डा
(एडिटर इन चीफ लोकमत वृत्तपत्र समूह)

उमाकांत दांगट...या माणसाची प्रश्नांकडे बघण्याची वृत्ती सकारात्मक आहे व प्रश्न मार्गी लावावेत असाच त्यांचाप्रयत्न राहिला. याचे कारण हे की त्यांचे मन संवेदनशील आहे व माणुसकीचा ओलावा त्यांनी जपला आहे. मोठ्या पदावर गेल्यानंतर स्वभावातही फरक पडतो. विनयशीलता, नम्रता कमी होते. परंतु डॉ. उमाकांत दांगट हे सतत विनयशील, नम्र आणि प्रामाणिकच राहिले. हा त्यांचा मोठा गुण.

३१ डिसेंबर रोजी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट हे सेवानिवृत्त होत आहेत. १९८४ ते २०१५ पर्यंतचा त्यांचा प्रशासकीय काळ नव्या पिढीला प्रेरणा देणारा खचितच असल्याने हा लेखनप्रपंच. माणसे पदावर असतात, त्यावेळी त्यांचे एक वलय निर्माण झालेले असते. त्यांच्यावर प्रसिद्धीचा झोत असतो. परंतु पद नसताना त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा व्हावा आणि हे काम पुढच्या पिढीला दिशादर्शक ठरावे, या प्रांजळ हेतूनेच डॉ. उमाकांत दांगट यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर लिहावे, असे मनापासून वाटले. डॉ. दांगट हे मूळचे शेतकरी कुटुंबात जन्मलेले. मराठवाड्याच्या केजचे. घरचा फारसा मोठा वारसा नसताना त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने अमीट ठसा उमटवला आहे. ज्या- ज्या वेळी दांगटजींबरोबर मंत्री म्हणून किंवा मंत्री नसतानाही अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली, त्या-त्या वेळी एक गोष्ट माझ्या मनात पक्की झाली की, या माणसाची प्रश्नांकडे बघण्याची वृत्ती सकारात्मक आहे व प्रश्न मार्गी लावावेत असाच त्यांचाप्रयत्न राहिला. याचे कारण हे की त्यांचे मन संवेदनशील आहे व माणुसकीचा ओलावा त्यांनी जपला आहे. मोठ्या पदावर गेल्यानंतर स्वभावातही फरक पडतो. विनयशीलता, नम्रता कमी होते. परंतु डॉ. उमाकांत दांगट हे सतत विनयशील, नम्र आणि प्रामाणिकच राहिले. हा त्यांचा मोठा गुण. याच गुणांमुळे ते यशस्वी होत गेल्याचे आणि प्रशासनात असूनही माणसे जोडत गेल्याचे किंबहुना जपत गेल्याचे बघावयास मिळते.
७ जुलै २०१५ पासून डॉ. उमाकांत दांगट हे औरंगाबादचे विभागीय आयुक्त म्हणून कार्य करीत होते. ते विभागीय आयुक्त झाले आणि मराठवाड्याला ‘एक हक्काचा अधिकारी’ भेटला. ‘मराठवाड्याचे मन’असलेला अधिकारी लाभला आणि त्यांची सारी कार्यशैली पाहिली तर मराठवाड्याचे हित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी काम केलेले दिसून येते.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दरवर्षी औरंगाबादला हुलकावणी देत होती. बैठकच होत नव्हती. परंतु ४ आॅक्टोबर २०१६ रोजी तो दिवस उजाडला. यामागे डॉ. उमाकांत दांगट यांनी पडद्यामागे राहून घेतलेले कष्ट, केलेले प्रयत्न कारणीभूत आहेत. सुमारे ५० हजार कोटींचे निर्णय या बैठकीत झाले. विविध ५० विषयांवर चर्चा झाली आणि आतापर्यंत सुमारे ३५ शासननिर्णयही निर्गमित झाले. प्रशासनाची मध्यवर्ती इमारत, विभागीय आयुक्त कार्यालयात सुसज्ज सभागृह यासारखे प्रस्ताव स्वत: डॉ. दांगट यांनी लक्ष घालून तयार करून घेतले. उद्या ही सारी कामे झाल्यानंतर डॉ. दांगट यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
वेरूळ- अजिंठा
महोत्सवाला चालना....
गेल्या अनेक वर्षांपासून नियोजित वेरूळ- अजिंठा सांस्कृतिक महोत्सव येनकेनप्रकारेण रखडला होता. हा महोत्सव यंदा करायचाच या जिद्दीने विभागीय आयुक्त म्हणून डॉ. उमाकांत दांगट कामाला लागले. शहरातील नामांकित स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन त्यांनी हा महोत्सव यशस्वी करून दाखवला.
डॉ. दांगट यांचा मूळ पिंड शेतकऱ्याचा. त्यांचा खरा आधारच शेती. राज्याचे कृषी आयुक्त म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी लाखमोलाची ठरली. बोगस बी- बियाणांवर त्यांच्याच काळात चाप बसला. डॉ. दांगट यांचे ‘शेतकरी मन’ त्यांना स्वस्थ बसू दिलेले दिसत नाही. शेतीविषयक उपक्रम राबविण्याकडे त्यांचा सतत कल दिसून आला. ‘मराठवाड्याची शेती’ या विषयावर त्यांच्याच पुढाकाराने दोन दिवसाची कृषी परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यमंदिरात भरली होती. अगदी दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या अ‍ॅग्रीकल्चरल महाएक्स्पोच्या आयोजनातही त्यांचा हिरीरीचा पुढाकार होता. नांदेड येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा त्यांच्याचमुळे आयोजित केल्या गेल्या. क्रांतीचौकातील दोनशे फुटांचा ध्वजस्तंभ अद्याप पूर्ण व्हावयाचा आहे. पण तो झाल्यावर डॉ. दांगट यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
अशी कारकीर्द.....
१९८४ पासून परिविक्षाधीन निवासी उपजिल्हाधिकारी, १९८६ साली सेलूचे उपविभागीय अधिकारी, १९८७ साली जालन्याचे उपविभागीय अधिकारी व नंतर जालना येथेच रोहयोचे उपजिल्हाधिकारी, १९९० साली परभणीचे जिल्हा पुरवठा अधिकारी, १९९२ साली लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी, १९९३ साली तत्कालीन गृह व पाटबंधारे मंत्र्यांचे खाजगी सचिव, १९९५ साली औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात रोहयोचे सहायक आयुक्त, १९९७ साली औरंगाबादलाच महसूल उपायुक्त, १९९९ साली शासनाच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव, २००० साली गृहनिर्माण विभाग व नगरविकास विभागाचे उपसचिव, २००२ साली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी, २००७ साली अहमदनगरचे जिल्हाधिकारी, पिंपरी- चिंचवड नवनगरविकास प्राधिकरण, निगडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, २००८ साली पुणे महापालिकेचे अतिरिक्त मनपा आयुक्त, २०१० साली संचालक, नागरी पुरवठा आणि सहसचिव अन्न, नागरी पुरवठा, २०११ साली राज्याचे कृषी आयुक्त आणि २०१५ पासून ते आतापर्यंत औरंगाबादचे विभागीय आयुक्त अशी डॉ. उमाकांत दांगट यांची कारकीर्द राहिली. जी जबाबदारी त्यांच्याकडे आली, त्यातून चांगले तर करावयाचेच पण वेगळे आणि गोरगरिबांच्या उपयोगी पडेल, असे काही करण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला दिसून येतो.
अहमदनगरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी राबविलेली पारधी विकास योजना उल्लेखनीय ठरली. ‘आदिवासी पारधी समाजाचा आर्थिक विकास : विशेष संदर्भ अहमदनगर जिल्हा’ हा आपला पीएच.डी.चा प्रबंध त्यांनी लिहिला आणि तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठास सादर केला. अहमदनगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा कार्यक्रमच त्यांनी आखला आणि ऐतिहासिक भुईकोट किल्ला नागरिकांसाठी खुला केला.
कृषी आयुक्त म्हणून त्यांनी केलेली कामगिरी फलदायी ठरली. कामाचा डोंगरच त्यांनी उभा केला. शासन जिथे पाठवील तिथे जायचे, आपली जबाबदारी प्रभावीपणे आणि चोखपणे पार पाडायची, हे जणू त्यांचे व्रतच. ‘देशसेवा, देशसेवा’ म्हणतात, ती यापेक्षा दुसरी काय असते? डॉ. उमाकांत दांगट आज शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. अत्यंत प्रभावी व चोखपणे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. शासनाने जिथे जिथे पाठविले तेथे तेथे ते गेले. या प्रत्येक ठिकाणी कामाच्या माध्यमातून त्यांनी विशेष छाप टाकली. सेवानिवृत्त होत असताना त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. भविष्यातही त्यांच्या हातून अशीच सेवा घडो ही शुभेच्छा!

निसर्गाच्या पर्यटन सहली...
त्यातल्या त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना निसर्गाचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. म्हणून डॉ. उमाकांत दांगट यांनी एक उपक्रम सुरू केला. उपक्रम साधा असला तरी तो दूरदृष्टीचा आणि किती निकोप आहे, हे लक्षात येईल. प्रत्येक महिन्यात एका रविवारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहकुटुंब खाजगी वाहनाने निसर्गाच्या सान्निध्यात न्यायचे. या सहलीत कोणीही दडपणाखाली येऊ नये म्हणून स्वत:चे मोठेपण विसरून अंताक्षरी खेळणे, भेंड्या म्हणणे, जमिनीवर बसून जेवणे, कचराकाडी उचलणे हा तो उपक्रम. साधा वाटत असला तरी खूप काही सांगून जाणारा आहे. गौताळा अभयारण्य सहलीच्या वेळी एकदा डॉ. दांगट यांच्यावर अंताक्षरीत ‘क’ या अक्षरापासून गाणे म्हणण्याची वेळ आली. तेव्हा त्यांनी ‘कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है, के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए’ हे गाणे म्हणताच सर्वांनी ‘अरे व्वा’ म्हटले आणि विशेषत: सौ. दांगट यांनी एवढ्या गोड शब्दातील गाणे ऐकून माझे सार्थक झाले, असे उद्गार काढले. हे सहजीवनही फार काही सांगून जाते.

Web Title: Dancer who joins the man: Umakant dagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.