दांडिया
By admin | Published: October 10, 2016 05:05 AM2016-10-10T05:05:59+5:302016-10-10T05:05:59+5:30
चला दांडिया खेळायला, असं कुणी म्हटलं की काहींचं रक्त सळसळू लागतं. हात शिवशिवू लागतात. पावलं थिरकू लागतात. कुणी काही म्हणा
चला दांडिया खेळायला, असं कुणी म्हटलं की काहींचं रक्त सळसळू लागतं. हात शिवशिवू लागतात. पावलं थिरकू लागतात. कुणी काही म्हणा, तरुण मुला-मुलींना ही संधी असते. ह्यात असतं काय तर मोकळं होण्याची प्रेरणा. कायम घरात जुंपलेली गृहिणी मोकळी होते. पोरांना जमेल तेवढी हुल्लडबाजी करता येते. माणसाची आनंद व्यक्त करण्याची एक पद्धत अगदी आदिमानवापासून म्हणजे नाचणे. माणसाच्या ह्या आदिम प्रेरणा प्रत्येकाच्या नसानसात असतातच. त्या यात प्रकट होतात. रास, गरबा यातला सुबक नृत्याविष्कार डोळ्यांना सुखावतोच. हे थिरकणं उच्छृंखल झालं की संपलं. हजारो भावनिक क्षण, विद्रोह, आनंद, दु:ख, राग, अंगार प्रकट करण्याचं अमोघ साधन म्हणजे नृत्य. अगदी शंकरापासून तर देवींनी हे प्रसंगानुरूप रुजवलं. काहींनी त्याला शास्त्रोक्त शैलीत गुंफून मनोहारी कथक, भरतनाट्यम, ओडीसी, कथकली वगैरे नृत्यशैलीत बांधलं. ज्यांना हे जमलं नाही त्यांनी शारीरिक हालचालींचा दांडिया केला.
शिस्त हवी असं सगळे म्हणतात पण पाळतं कोण? सैराटला फक्त वेग असतो, झिंग असते. नियम नसतात. गल्लीबोळात रंगीबेरंगी झालरी, डोळे दिपवणारी रोषणाई, रहाट पाळणे आणि नवनव्या निर्माण झालेल्या नेत्यांचे होर्डिंग्ज, अरे बाबा दादा, ताई, भाऊंच्या छब्या झळकताहेत. आता कळलं का, इलेक्शन आलंय म्हणून ! ...माझा मित्र मला नाचता नाचता समजावून सांगत होता. एक बुद्धीवादी म्हणाला, बंद करायला हवं हे सारं, नुस्ताच धिंगाणा असतो. बंद करायला हवं हे ! त्याचा कोरडाठक्क निरुत्साह मी समजू शकत होतो. किती ‘मॅनअवर’ यात खर्च होतात. काहीतरी नवं प्रॉडक्टिव्ह करायला हवं. हो हो ! करायला हवं ! देशाला याची गरज आहे !
पण या यात्रा, हे नाच मेळावे याकडे नीट पाहिलं तर हजारो विक्रीच्या वस्तूंमुळे काही हजारांना रोजगार मिळतो. हातावरची पोटं अशा उत्सवातच भरतात. एरवी दिवाळी नसती तर आकाशकंदील, पणत्या बनवून विकणाऱ्यांची पोटं भरली असती का? आपले उत्सव अशा रोजगारांशी बांधले गेलेत म्हणून प्रचंड गरिबी असूनही दीनवाणा नास्तिक म्हणतो देवाने काय दिलं? माणसांना एकत्र केलं. कामं दिली. लोक लांड्यालबाड्या करतीलही, ते तर चालूच आहे; पण यानिमित्त विविध जातीच्या व्यावसायिकांना पोटात टाकण्याची थोडीफार सोय केली हे तर जाणायलाच हवं. म्हणून या बेहोष नाचणाऱ्या, कधीकधी त्यांच्या हावभावावरून भावनेच्या शुद्धतेविषयी शंका येऊनही, कसं होईल या पिढीचं? अशी कोरडी काळजी बहाण्यापेक्षा हे नाचणे बघायला काय हरकत आहे. कारण हीच पोरंपोरी उद्या सकाळी, नोकरी, कामधंदा, अभ्यास, परीक्षा यासाठी वणवण भटकणार आहेतच. तेव्हा हे नाचणंच त्यांना कदाचित भटकण्यासाठी बळ देईल ! तेव्हा बघू या, खेळू या दांडिया !