दर्शन सुखकर व्हावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 08:38 PM2019-05-08T20:38:49+5:302019-05-08T20:39:21+5:30
मिलिंद कुलकर्णी एकविसाव्या शतकात दळणवळण अधिक सुखकर झाले आहे. महामार्गाचे चौपदरी, सहापदरी, आठपदरीकरण, रेल्वेमार्ग आणि गाड्यांमध्ये वाढ, विमानसेवेत विस्तार ...
मिलिंद कुलकर्णी
एकविसाव्या शतकात दळणवळण अधिक सुखकर झाले आहे. महामार्गाचे चौपदरी, सहापदरी, आठपदरीकरण, रेल्वेमार्ग आणि गाड्यांमध्ये वाढ, विमानसेवेत विस्तार यामुळे देशांतर्गत दळणवळणात दर्जात्मक सुधारणा झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. आपल्या देशातील एकूण पर्यटन विश्वाचा आढावा घेतला तर धार्मिक पर्यटनाकडे मोठा ओढा आहे. मुळात भारतीय माणूस श्रध्दावान असल्याने तीर्थाटन हे त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठे, दत्ताची स्थाने, संत रामदासांनी स्थापन केलेले अकरा मारुती मंदिरे, त्यांचे जन्मस्थळ ते सज्जनगड, पंढरपूर, शेगाव, शिर्डी, शनिशिंगणापूर, तिरुपती बालाजी, वैष्णोदेवी, मानसरोवर, पशुपतीनाथ मंदीर, अयोध्या, मथुरा, काशी विश्वनाथ, नर्मदा परिक्रमा अशा तीर्थस्थानांना भेटी देण्यासाठी भाविक आतुर असतात. श्रावण, महाशिवरात्र, अंगारिका चतुर्थी अशा दिनविशेषांना तर तीर्थक्षेत्री मोठी गर्दी उसळलेली असते. हे महत्त्वाचे दिवस आणि दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये धार्मिक पर्यटनासाठी भाविक बाहेर पडतात. एस.टी, रेल्वे आणि विमान कंपन्यांनी धार्मिक स्थळे आपल्या सेवांनी जोडल्याने भाविकांची अधिक सोय झाली आहे.
तीर्थक्षेत्री भाविकांचा ओढा वाढत असताना तेथील प्राथमिक सुविधांवर पडणारा ताण आणि सुखरुप दर्शनासाठी संस्थान, प्रशासन यांचे प्रयत्न हा विषय अलीकडे ऐरणीवर आला आहे. देवस्थानाचे पावित्र्य राखत असताना एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना किमान सुविधा द्यायला हव्यात. काही ठिकाणी चांगल्या सुविधांचा आदर्श घालून दिलेला आहे. शिर्डी आणि शेगावचा विशेष उल्लेख करायला हवा. या संस्थांनांनी दर्शनव्यवस्था, निवासव्यवस्था आणि भोजनव्यवस्थेसाठी काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे. शेगाव येथे तर सेवा देण्यासाठी भाविक पुढाकार घेत आहेत. सेवेकऱ्यांची प्रतीक्षा यादी त्याठिकाणी तयार आहे. अशी स्थिती सर्वठिकाणी झाल्यास आबालवृध्द भाविकांना सुखकर असे दर्शन घेता येईल.
महत्त्वाचे दिनविशेष आणि सुट्टयांमध्ये केवळ गर्दी होते, इतरवेळी फारशी गर्दी नसते. नियोजनाच्यादृष्टीने नेमके किती लोक येतील, याचा अंदाज घेणे अवघड असते, त्यामुळे संस्थानच्यादेखील अडचणी असतात, ही बाजू निश्चित लक्षात घेण्यासारखी आहे. परंतु, किमान प्राथमिक सुविधा त्याठिकाणी असतील, याची काळजी सर्वच संस्थानांनी घ्यायला हवी, असे आवर्जून वाटते. रांगा मोठ्या असतात, त्याठिकाणी स्वच्छता असावी. पंखे लावून वातावरण हवेशीर ठेवावे. लहान मुले, वृध्द यांना बसण्यासाठी रांगेत बाके असावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. अलीकडे सशुल्क दर्शनाची व्यवस्था अनेक ठिकाणी असते. त्यामुळे दर्शन लवकर होते, हे चांगले आहे. परंतु, हे शुल्क सगळ्यांनाच परवडेल असे नाही, त्यामुळे सामान्यांसाठी सुविधांवर अधिक भर द्यायला हवा.
ही देवस्थाने ज्या गाव, शहरांमध्ये आहे, तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी देशभरातून येणाºया भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. काही ठिकाणी असे चित्र निर्माण होते की, देवस्थान आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात वाद आहेत. या वादाचा त्रास भाविकांना होतो. गावात प्रवेश करताच स्थानिक संस्थेकडून प्रवेश कर, देवस्थानाकडून वाहनतळ शुल्क अशी वसुली केली जाते. शुल्क आकारायला हरकत नाही, त्याची आवश्यकता आहेच, पण त्यात सुसूत्रीकरण हवे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण व्यवस्थांवर मोठा ताण येतो, हे मान्य करायला हवे. परंतु, भाविक येत असल्याने त्या गावाची आर्थिक उलाढाल मोठी वाढलेली आहे, याकडे कानाडोळा करु नये. देवस्थानानेदेखील उत्पन्नाचा काही वाटा हा स्थानिक स्वराज्य संस्थेला, शहराच्या विकासासाठी, प्राथमिक सुविधांसाठी द्यायला हवा. शिर्डी देवस्थानने हा आदर्श घालून दिलेला आहे. असे परस्पर सामंजस्य राहिले तर दर्शनासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होणार नाही. दर्शन सुखकर होईल.
आम्ही भाविकदेखील इतके सोशीक, समजूतदार असतो, की होणाºया गैरसोयी, त्रासाबद्दल अजिबात तक्रार करीत नाही. देव आपली परीक्षा पाहतोय, यापूर्वी किती त्रास व्हायचा, आता किती सोयी झाल्या आहेत, असे म्हणून स्वत:चे समाधान करुन घेतो. हा खरा सश्रध्द भक्त म्हणावा लागेल.