डार्विन, माकड आणि माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:58 AM2018-01-23T00:58:18+5:302018-01-23T00:59:56+5:30

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले.

 Darwin, Monkey and Man | डार्विन, माकड आणि माणूस

डार्विन, माकड आणि माणूस

googlenewsNext

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे, हे केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे विधान वाचून हायसे वाटले. आपण मर्कंटवंशाचे दिवे आहोत, हे शालेय पाठ्यपुस्तकात वाचल्यापासून आमच्या लीलांना सुमारच उरलेला नव्हता. गुरुजींनी एकदा ‘वानर आणि टोपीविक्रेता’ या गोष्टीचे तात्पर्य काय, असे विचारले असता, ‘आपल्या पूर्वजांना अशी टोपी घालणे योग्य नव्हे’, असे उत्तर दिल्याने आम्हांस उठाबशाची शिक्षा मिळाली होती. रामायण काळात हनुमंतासह समस्त वानरसेना प्रभू रामचंद्रांच्या मदतीसाठी धावून आली, सीतेच्या शोधासाठी त्यांनी रामेश्वरमपासून लंकेपर्यंत रामसेतू बांधला. हे त्यांनी भक्तीपोटी नव्हे, तर पितृक प्रेमातून केलं असावं, असा आमचा डार्विन वाचल्यामुळं गैरसमज झाला होता. सत्यपालांनी खरं काय ते सांगून आमच्या मानगुटीवर बसलेलं हे डार्विनचं भूत उतरवून टाकलं ते बरंच झालं. सत्यपाल हे द्रष्टेपुरुष वाटतात. मानवी उत्पत्तीबरोबर भाषेच्या उगमावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, ‘पशू, पक्षी आणि प्राण्यांचे आवाज ऐकून मनुष्य भाषा शिकला हे मानववंश शास्त्रज्ञांचे विधान साफ खोटे आहे. ‘वस्तुत: चंद्र, सूर्य, पृथ्वीच्या निर्मितीनंतर भगवंतांची वेदवाणी झाली आणि मनुष्याच्या तोंडून पहिल्यांदा वेदोच्चारच बाहेर पडला!’ असं असेल तर मग वेदवाणी जाणणारे सप्तर्षी (सात ऋषी) हेच पृथ्वीवरचे प्रथम नागरिक आणि आपण वंशज ठरतो. त्यामुळे सत्यपालांच्या या संशोधनाची दखल घेऊन संयुक्त राष्टÑ संघाने समस्त भारतीयांना वैश्विक नागरिक मानून जगभरचा व्हिसा मंजूर करायला हरकत नाही!
भाजपशासित प्रदेशातील अनेक मंत्री सध्या संशोधनकार्यात भलतेच मग्न दिसतात.
भगवान गणेशाचे रूप हे अवयव प्रत्यारोपाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानवरून प्रेरणा घेत राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनीही एक संशोधन समोर आणले आहे. त्यांच्या मते, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनच्याही हजारो वर्षे आधी द्वितीय ब्रह्मगुप्ताने मांडला होता. न्यूटनने फक्त कॉपी केली! हे खरं असेल तर नजीकच्या काळात याच देशी तंत्रज्ञानावर आधारित ब्रह्मगुप्त नावाने उपग्रहांची मालिकाच ‘इस्रो’ने अवकाशात सोडली तर जगाला आश्चर्य वाटायला नको!
विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हेही तसे मिथकच. कारण, जगद्गुरू तुकारामांच्या वैकुंठ गमनासाठी आलेल्या पुष्पक विमानावरूनच राईट बंधूंना विमानाची कल्पना सुचली, असा दावा उ.प्र.तील एका मंत्र्याने केला आहे. हा तर सरळ सरळ कॉपीराईट कायद्याचा भंगच की! राईट बंधूंवर दावा ठोकायला काय हरकत? हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी केलेले संशोधन तर नोबेलच्या तोडीचे आहे. त्यांच्या मते, गाय ही एकमेव अशी पशू आहे, जी श्वासोच्छवास घेताना आॅक्सिजन सोडते आणि कार्बनडायआॅक्साईड शोषून घेते. शिवाय, गोमूत्र प्याल्याने मुनष्यास कुठलीही व्याधी उद्भवत नाही! तर मग बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे शुद्ध गोमूत्र दवाखान्यात ठेवूया का? भारतातील या नवसंशोधनाच्या वार्ता ऐकल्यानंतर खात्रीच पटते की, डार्विनचा सिद्धांत पूर्णत: खरा नसावाच. अन्यथा, सगळीच वानरं माणसाळली असती!
- नंदकिशोर पाटील
Nandu.patil@lokmat.com 

Web Title:  Darwin, Monkey and Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.