दशकपूर्तीतही मनसे हताशच!

By admin | Published: March 12, 2016 03:41 AM2016-03-12T03:41:43+5:302016-03-12T03:41:43+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात आगलावू भाषा करीत पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असताना

Dasaraapasapureo MNS! | दशकपूर्तीतही मनसे हताशच!

दशकपूर्तीतही मनसे हताशच!

Next

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात आगलावू भाषा करीत पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असताना, दुसरीकडे या पक्षाला राज्यात ज्या शहरात प्रथम सत्ता मिळाली त्या नाशकात मात्र दशकपूर्तीचा काडीमात्रही आनंद वा उत्साह दिसून येऊ नये, हे त्या पक्षातील हताशा दूर झालेली नसल्याचेच लक्षण म्हणायला हवे. पक्षातील ‘बडवेगिरी’चा प्रत्यय, सुस्पष्ट धोरणांचा अभाव व प्रारंभिक शिलेदारांची गळती यासारख्या कारणातून हे हबकलेपण ओढवले असून, त्यासंबंधीचा ‘उतारा’ केवळ तोडफोडीच्याच कार्यशैलीत शोधला जाणार आहे का, असा प्रश्नही यातून उपस्थित होणे स्वाभाविक ठरले आहे.
कोणत्याही राजकीय पक्षासाठी दशकभराची वाटचाल ही काही लहान बाब नसते. कारण हा कालावधी त्या पक्षाच्या जडणघडणीचा काळ असतो. त्यातल्या त्यात जेव्हा एखाद्या ठिकाणची सत्ता मिळते तेव्हा त्या पक्षाची जबाबदारी अधिकच वाढून जाते. अशा स्थितीत काही करून दाखविता आले तर पुढील प्रगतीचे मार्ग आपोआप प्रशस्त होत जातात. पण ‘मनसे’ची याच बाबतीत नादारी आहे. या पक्षाला स्थापनेनंतर एकमेव नाशिक महापालिकेतील सत्ता लाभली. मात्र या सत्तेच्या माध्यमातून नवनिर्माणाचे प्रत्यंतर आणून देणे ‘मनसे’ला जमले नाही. म्हणायला राज ठाकरे लाख म्हणोत की, ‘सत्ता दिल्यास महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन’, पण येथे साधी नाशिक महापालिकेतील नोकरशाही त्यांना गेल्या चार वर्षात सरळ करता आलेली नाही. सध्याचेच उदाहरण घ्या, नाशकातील पाणीपुरवठ्याबाबत जनतेची ओरड वाढली आहे. पालिकेतील सत्ताधारी या नात्याने प्रशासनाला कामाला लावून यासंबंधीच्या तक्रारी दूर करणे अपेक्षित असताना, ‘मनसे’ने स्वत:च टँकर्स सुरू करून आपल्याच अपयशावर शिक्कामोर्तब करून घेतले आहे. पक्ष म्हणून असे करता येत असेल तर ते महापालिकेतील सत्ताधारी म्हणून का करता येऊ नये, असा यातील साधा सवाल आहे.
‘मनसे’च्या स्थापनेनंतर मुंबईपेक्षा नाशकात अधिक जल्लोष केला गेला होता. महापालिकेतील सत्तेखेरीज विधानसभेत शहरातून या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून गेले होते. पण कुणालाही नवनिर्माण साधता न आल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीनही जागा हातच्या गेल्या. त्यानंतर पक्षात ‘बडवेगिरी’ वाढल्याचा आरोप करीत पक्ष स्थापना काळातील शिलेदार वसंत गिते पक्ष सोडून चालते झाले. पक्षाच्या पहिल्या महापौरपदाचा फेटा ज्यांच्या मस्तकी बांधला गेला ते अ‍ॅड. यतिन वाघ हेदेखील अगदी अलीकडेच पक्षाबाहेर पडले. आणखीही बरीच पडझड झाली आणि त्यातूनच पक्षात सुन्नता आली. पण त्यासंदर्भात कुठे काय चुकते आहे याचे आत्मपरीक्षणच कुणी करायला तयार नाही. तेव्हा केवळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून व नव्या रिक्षांच्या जाळपोळीतून पक्षातील ही सुन्नता वा अस्वस्थता दूर करता येईल का हा खरा प्रश्न असून, या प्रश्नाच्या मुळाशी असणारी हताशा यातून समोर येणारी आहे. ‘राजगड’ म्हणविल्या जाणाऱ्या पक्षाच्या नाशकातील मुख्यालयात पक्षाच्या दशकपूर्तीचा मागमूसही आढळून न येण्यामागे तेच कारण आहे.
विशेष म्हणजे, राजकारणात आक्रमकता व सत्ता या नेहमीच आकर्षणाच्या बाबी ठरत आल्या आहेत. आज नरेंद्र मोदी व राज ठाकरे या दोघांकडेही वेगवेगळ्या संदर्भात त्या असताना, नाशकातील अनेकजण तुलनेने मवाळपंथीय म्हणविल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेने जात आहेत हे काहीसे अनाकलनीय व कुतुहलाचे असले तरी ते वास्तव आहे. राज्यातील सत्तेत शिवसेनेची स्थिती किती नाजूक आहे हे जगजाहीर असताना असे होते आहे. काही मनसैनिक थेट शिवसेनेत आले आहेत, तर काही ‘व्हाया भाजपा’ येऊ घातले आहेत. तेव्हा याही बाबतीत राज ठाकरे यांचे अपयश वा ‘मनसे’तील घसरगुंडी लक्षणीय ठरणारी आहे.
- किरण अग्रवाल

Web Title: Dasaraapasapureo MNS!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.