धाडसाला कुर्निसात

By admin | Published: October 4, 2016 12:56 AM2016-10-04T00:56:12+5:302016-10-04T00:56:12+5:30

नादिया मुराद! इराकची एक जिद्दी अन् धाडसी कन्या! आपल्या अतुल्य साहसाच्या बळावर मरण यातनेतून स्वत:ची सुटका करून घेणारी आणि आपल्यावर झालेले

Dashasala Kurnishi | धाडसाला कुर्निसात

धाडसाला कुर्निसात

Next

नादिया मुराद! इराकची एक जिद्दी अन् धाडसी कन्या! आपल्या अतुल्य साहसाच्या बळावर मरण यातनेतून स्वत:ची सुटका करून घेणारी आणि आपल्यावर झालेले अगणित अत्याचार निमूटपणे सहन न करता त्या विरुद्ध आवाज बुलंद करणारी ही तरुणी आज संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव तस्करी विरोधातील विभागाची सदिच्छादूत झाली आहे. तिची ही निवड स्वागतार्ह असली तरी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी दुर्दैवाने इसिस (इस्लामिक स्टेटस् आॅफ सिरिया अ‍ॅन्ड इराक) या दहशतवादी संघटनेच्या तावडीत सापडल्यानंतर तिच्या वाट्याला आलेली लैंगिक गुलामगिरी साऱ्या मानवजातीची मान शरमेने खाली जावी, अशीच आहे. इसिस दहशतवाद्यांसोबतच्या या तीन महिन्यांच्या काळात आपल्यावर किती लोकांनी बलात्कार केले हे सांगता येणार नाही, असे नादिया म्हणते. तिची ही आपबिती अंत:करण विदीर्ण करणारी आहे. २०१४ साली इसिसने जो उच्छाद मांडला होता त्याने संपूर्ण जग हादरून गेले होते. हिंसाचारासोबतच हजारो महिलांचे अपहरण करून त्यांचे अतोनात हाल करण्यात आले. इराकमध्ये या संघटनेने गुलामांचा बाजाराच सुरू केल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या तपासकर्त्यांनी उघड केली होती. मोसुल लगतच्या अल- कुदस् आणि सिरियाच्या रक्का येथे हे बाजार आहेत. संघटनेत नवीन भरतीसाठी तरुणांना आकर्षित करण्याकरिता इसिसकडून हा हिणकस प्रकार केला जातो. या बाजारात १०-१५ डॉलर्समध्ये इसिसच्या दहशतवाद्यांना महिलांची विक्री केली जाते. २०१४ च्या आॅगस्ट महिन्यात इसिसने पाच हजार याझिदी महिलांना गुलाम बनविले होते. नादिया त्यापैकी एक होती. तिच्या डोळ्यादेखत तिची सहा भावंडे आणि आईस ठार मारण्यात आले. एकाच दिवशी तिच्या गावातील ३०० लोकांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यावेळी नादिया फक्त १९ वर्षांची होती. तब्बल तीन महिने दहशतवाद्यांचे हे पाशवी अत्याचार सहन केल्यावर तिने कशीबशी स्वत:ची सुटका करुन जर्मनीत आश्रय घेतला. प्राणांतिक अवस्थेतही हतबल न होता धैर्याने परिस्थितीचा सामना केला. जगण्याची इच्छा तर सोडली नाहीच शिवाय या नरकातून बाहेर पडल्यावर भयभीत न होता या दहशतवाद्यांविरुद्ध उभे ठाकण्याचे साहस दाखविले. या अतिरेक्यांना दंड झाल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही, अशी भावना तिने व्यक्त केली आहे. ही संघटना नेस्तनाबूत व्हावी अशी तिची मनीषा आहे.

Web Title: Dashasala Kurnishi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.