भिड्यांच्या आंब्याने पुत्रप्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:27 AM2018-06-20T00:27:45+5:302018-06-20T00:27:45+5:30

अंधश्रद्धा हा अडाणी माणसांचा गुणविशेष मानला तर साक्षर, सुशिक्षित व सुसंस्कृतांचा तो अधिकार समजला पाहिजे.

Daughter of the Bhadki maternal grandfather | भिड्यांच्या आंब्याने पुत्रप्राप्ती

भिड्यांच्या आंब्याने पुत्रप्राप्ती

googlenewsNext

अंधश्रद्धा हा अडाणी माणसांचा गुणविशेष मानला तर साक्षर, सुशिक्षित व सुसंस्कृतांचा तो अधिकार समजला पाहिजे. नाहीतर ‘माझ्या बागेतील आंबे खा आणि पोरे (पोरी नाहीत) जन्माला घाला’ असा साधिकार आदेश संभाजी भिडे या गुरुजीने आपल्या अनुयायांसह महाराष्ट्राला दिला नसता. हे गुरुजी भीमा-कोरेगावातील दंगलीनंतर व तीत झालेल्या हत्याकांडानंतर साऱ्या महाराष्ट्राला एकाएकी ठाऊक झाले. त्याआधी ते आणि त्यांच्या शिष्यांचा समूह पश्चिम महाराष्ट्राच्या कुठल्याशा कोपºयातील लोकांनाच काय तो ठाऊक होता. कधी शिवाजी महाराजांचे तर कधी संभाजी राजांचे नाव घेणाºया या गुरुजींच्या मागे काही राजकारणी नेतेही आहेत आणि ते कट्टर हिंदुत्ववादी असल्याने संघ परिवारालाही आपले वाटणारे आहेत. पाठीशी पुढारी, हाताशी सत्ताधारी आणि सोबतीला अनुयायांचे तांडे असले की माणसांना कुठलेही ताळतंत्र उरत नाही. मग ती गुरुजी म्हणविणारी का असेना. त्यांची दलितविरोधी वक्तव्ये प्रसिद्ध आहेत. धर्मनिरपेक्षतेविरुद्धचा त्यांचा प्रचारही सर्वविदित आहे. अशी माणसे स्वाभाविकपणे विज्ञानविरोधीही असतात. त्यातून त्यांच्यावर भीमा-कोरेगावाच्या दंगलीतील ‘दूरस्थ’ सहभागाचा आरोप आहे. मात्र ते ‘आपले’ म्हणून सरकार त्यांना हात लावीत नाही आणि सरकार पक्षाचे खासदार ‘त्यांना हात लावून तर दाखवा’ अशा जाहीर धमक्याही देतात. अशा माणसाला आपल्या बुवाबाबांची वा बापूंसारख्या कधीतरी समाजाला उपदेश करीत पैसे गोळा करणाºयांची दैवीशक्ती आपल्यातही असल्याचे वाटू लागले तर तो त्याचा मानसशास्त्रीय गुणविशेष मानला पाहिजे. अशा गुणांनी पछाडलेली माणसे मग विनोदी बोलली वा मनाला येईल ते बरळली तरी त्यांच्या शिष्यांना तो गुरूचा संदेश वाटू लागतो. ‘अमूक बाबाने मला काठी मारली’ किंवा ‘तमूक बाबाने माझ्यावर थुंकी उडवली म्हणूनच माझे कल्याण झाले’ असे श्रद्धेने सांगणारी मूर्ख माणसे आपण नेहमीच पाहतो. तसेच काहीसे या संभाजी भिड्यांचे गुरुपण उन्नत झाले असणार. त्याचमुळे ‘माझ्या बागेतील आंबे खाऊन पोरे करून घ्या’ असा धर्मोपदेश त्यांना आपल्या शिष्यांसोबत महाराष्ट्राला करावासा वाटला. त्या शिष्यांनी त्याचा प्रतिवाद केला नाही. उलट आता त्याचे समर्थन करीत ‘आंबा हे वीर्यवर्धक व शक्तीवर्धक फळ आहे’ असे ते समाजाला सांगू लागले आहेत. गाव-खेड्यात गंडे-दोरे विकून व बायाबापड्यांना फसवून आपले गुरुपण वा साधुत्व मिरविणारी असंख्य माणसे समाजाला ठाऊक आहेत. गावोगाव सापडावी एवढी त्यांची संख्या मोठी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम अपुरे पडावे आणि सरकारचा अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीचा कायदाही परिणामकारक ठरू नये एवढा या माणसांचा वावर मोठा व उपद्रवकारी आहे. त्यांच्या उपद्रवाने अडचणीत आलेली माणसेही आपली फसवणूक गिळून गप्प राहतात. त्यांच्या गप्प राहण्यात यांचे जगणे व टिकणे उभे असते. अशी माणसे व त्यांचे वेडाचार पाहिले की दाभोलकर आणि पानसरे यांचे खून का झाले व ते कोणत्या वृत्तीतून झाले हे कळू लागते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे. भिडे गुरुजींचे वक्तव्य त्याचा भंग करणारे आहे. परंतु एखादा अध्यात्म गुरू वा स्वत:ला समाजाचा शिक्षक म्हणविणारा इसम नुसता अशा वक्तव्यापाशी थांबतो तोवर त्याला हाता लावायचा नाही असे बंधन या कायद्यातच आहे. आतापर्यंत जे सद्गुरु तुरुंगात गेले व ज्यांना दंड भरावा लागला ते एक तर बलात्काराच्या आरोपातून कारावासात गेले वा त्यांनी यमुनेसारख्या पवित्र नदीचा प्रवाह नासविल्यामुळे दंडित झाले. ‘नवसाने पोरे झाली तर नवरे कशाला हवेत’ हा समर्थ रामदासांचा उपदेश मनात असलेल्यांना भिडे गुरुजींचे ‘आंब्याने पोरे होतात’ हे वचन वाचून त्यांचे गुरूपण कोणत्या लायकीचे आहे हे कळावे. असो, पण अशा माणसांची ज्ञानी महाराष्ट्रात सध्या चलती आहे. त्यांना अनुयायी मिळतात, सरकारचे संरक्षण मिळते, विरोधकांच्या व सुधारकांच्या टीकेपासून ते सुरक्षित राहतात आणि प्रसिद्धी माध्यमे त्यांचे असले चाळेही आनंदाने प्रकाशित करताना दिसतात. अशावेळी आपण कोणत्या शतकात जगत आहोत एवढाच प्रश्न आपल्याला पडावा.

Web Title: Daughter of the Bhadki maternal grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.