दाऊदचे भूत
By admin | Published: May 7, 2015 04:11 AM2015-05-07T04:11:41+5:302015-05-07T04:11:55+5:30
भारतातील विविध संस्था, व्यक्ती आणि सरकार यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या बाबींवरदेखील एकवाक्यता नसेल आणि त्याचाच फायदा वा गैरफायदा पाकिस्तानसारखे मुळातीलच कांगावखोर राष्ट्र घेत असेल तर
भारतातील विविध संस्था, व्यक्ती आणि सरकार यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या बाबींवरदेखील एकवाक्यता नसेल आणि त्याचाच फायदा वा गैरफायदा पाकिस्तानसारखे मुळातीलच कांगावखोर राष्ट्र घेत असेल तर त्याचा दोष कोणाकडे जातो? बाबरी मशिदीच्या पतनानंतर देशात जे धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण झाले आणि उभय बाजूच्या धर्मान्ध शक्तीने आपले डोके वर काढले, त्याचीच परिणती सुमारे बावीस वर्षांपूर्वीच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात झाली. मुंबई शहराच्या विभिन्न भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे काम केल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती जे लागले, त्यांच्याविरुद्ध खटले दाखल झाले व त्यातील काहींना शिक्षाही झाली. पण पाकिस्तानस्थित झकीऊर रहमान लख्वी आणि भारतीय वंशाचे ईब्राहीम मुश्ताक ऊर्फ टायगर मेमन व दाऊद इब्राहीम या तिघांनीच खरे तर बॉम्बस्फोटाचे कारस्थान घडवून आणले, असा मुंबई पोलिसांचा तसेच भारतीय गुुप्तचर यंत्रणांचा वहीम आहे. यातील लख्वीवर पाकिस्तानी न्यायालयात लुटुपुटीचा का होईना खटला दाखल झाला आहे, पण टायगर मेमन आणि दाऊद यांचा अद्याप शोधच लागलेला नाही. मध्यंतरी टायगरचा भाऊ याकूब मुंबई पोलिसांना शरण आला व त्याच्याविरुद्ध खटला चालविला जाऊन त्याला फाशीची शिक्षा ठोठावली गेली व त्याचा दयेचा अर्जदेखील नाकारला गेला आहे. तरीही भारताला टायगरपेक्षा दाऊद हा महत्त्वाचा संशयित वाटतो. सत्तेत येताक्षणी आपण दाऊदला पाकिस्तानात घुसून मुसक्या आवळून भारतीय न्यायालयासमोर उभे करू अशा वल्गना महाराष्ट्राचे माजी आणि दिवंगत गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यापासून देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यापर्यंत साऱ्यांनी केल्या, पण त्या साऱ्या वल्गनाच ठरल्या. तरीही त्यांच्या या वल्गनांमध्ये एक गृहीतक होते व ते म्हणजे दाऊद पाकिस्तानात आहे व त्याला तेथील अतिरेकी जिहादी गट, सरकार आणि आयएसआय ही गुप्तचर संघटना यांनी आश्रय दिला आहे. पण या गृहीतकालाच मंगळवारी संसदेत देशाच्या गृह राज्यमंत्र्यांनी तडा देताना, दाऊदचा ठावठिकाणा ठाऊक नसल्याचे निवेदन केले. या निवेदनावर चिडून उठलेल्या काँग्रेस पक्षानेदेखील संपुआच्या सत्ताकाळात दोन वर्षांपूर्वी असेच उत्तर दिले होते, हे विशेष. दरम्यान, गुप्तचर विभागाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने दाऊद शरणागती पत्करण्यास एकेकाळी राजी झाला असल्याची थाप ठोकली व ती लगेच मागे घेतली आणि विद्यमान राज्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी दाऊदच्या कराचीमधील तीन घरांचे पत्ते जाहीर करून तो तिथेच असल्याचे छातीठोकपणे जाहीर केले. या असल्या भोंगळ, गचाळ आणि बऱ्याचशा निर्नायकी उक्तींचा लाभ घेऊन दाऊद पाकिस्तानात नसताना भारत उगाचच आमच्यावर खोटेनाटे आरोप करीत आहे, असा पवित्रा पाकिस्तान घेत असेल तर त्या राष्ट्राला कांगावखोर म्हणायचे की भारताने स्वत:च स्वत:ला दोष देऊन घ्यायचा?
टाळ्या नकोत!
पूर्वीच्या काळी एखाद्या वक्त्याच्या वक्तृत्वकलेचे वर्णन करताना, तो सुभाषिते पेरतो, विविध भाषेतील उद्धरणे देतो, श्रोत्यांना हसवत ठेवतो यासारख्या विशेषणांच्या जोडीलाच तो टाळीबाज वाक्ये ऐकविण्यात पटाईत आहे, असाही एक उल्लेख केला जाई. याचा अर्थ श्रोत्यांना टाळी वाजवून वक्त्याच्या विधानाला दाद देण्याची उपरती व्हावी, अशी क्षमता त्या वक्त्यामध्ये असे. पण हल्ली टाळी वा टाळ्या वाजविणे श्रोत्याच्या मर्जीवर राहिलेले नाही. काहीही झाले, कार्यक्रमात कोणाचाही नामोल्लेख झाला की व्यासपीठावरुनच कोणीतरी श्रोत्यांना टाळ्या वाजविण्याचा आदेश देतो आणि श्रोतेही मग नाईलाजास्तव हाताचे दोन्ही तळवे एकमेकास स्पर्शून वा घासून मोकळे होतात. तरीही काही श्रोत्यांचे हात मात्र नेहमीच टाळ्या वाजवायला शिवशिवत असतात. हाच प्रकार कडक गणवेशातील सैनिकी अधिकारी आणि सैनिकदेखील करतात असे देशाचे विद्यमान संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी या प्रकाराबात तीव्र नापसंती व्यक्त केली. संरक्षण मंत्र्यांचीच री ओढताना आता देशाचे लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनीदेखील जवानांना आणि अधिकाऱ्यांना तंबी दिली असून अंगावर गणवेश असताना टाळ्या वाजविणे अशोभनीय असल्याचे बजावले. अर्थात त्यांनी लष्कराला उद्देशून मार्गदर्शन केल्यानंतर सवयीप्रमाणे साऱ्यांनी टाळ्या वाजविल्यानंतरच त्यांनी ही तंबी दिली. आधीच दिली असती तर कदाचित त्यांच्या हुकुमाची तामिली होते अथवा नाही याची त्यांना लगेचच प्रचिती येऊन गेली असती. तरीही पर्रीकर यांचा मुद्दा रास्तच म्हणावा लागेल. काही विशिष्ट लोकांकडून विशिष्ट प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा असते. येथे टाळ्या वाजविणे चांगले की वाईट हा मुद्दा अप्रस्तुत ठरतो. पण गणवेशधारी संघटनांकडून ज्या वर्तनाची व ज्या संभावितपणाची अपेक्षा असते, त्यात टाळ्या वाजविणे बसत नाही, हे मात्र निर्विवाद.